तुरुंगसुरक्षेला सुरुंग (मर्म)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

पंजाबमधील पतियाळा जिल्ह्यातील नाभा तुरुंग फोडून ‘खलिस्तान लिबरेशन फोर्स’चा दहशतवादी हरमिंदरसिंग मिंटू याच्यासह सहा कैद्यांच्या पलायनाने तुरुंगांच्या सुरक्षाव्यवस्थेची अक्षरशः लक्तरे बाहेर आली आहेत. तुरुंगफोडीच्या या घटनेनंतर काही तासांतच मिंटूला पकडण्यात यश आल्याने कायदा-सुव्यवस्था यंत्रणांची लाज काही प्रमाणात राखली गेली, असे म्हणता येईल; परंतु या घटनेने अनेक गंभीर प्रश्‍न उपस्थित केले असून, ही घटना म्हणजे धोक्‍याची घंटा म्हणावी लागेल.

पंजाबमधील पतियाळा जिल्ह्यातील नाभा तुरुंग फोडून ‘खलिस्तान लिबरेशन फोर्स’चा दहशतवादी हरमिंदरसिंग मिंटू याच्यासह सहा कैद्यांच्या पलायनाने तुरुंगांच्या सुरक्षाव्यवस्थेची अक्षरशः लक्तरे बाहेर आली आहेत. तुरुंगफोडीच्या या घटनेनंतर काही तासांतच मिंटूला पकडण्यात यश आल्याने कायदा-सुव्यवस्था यंत्रणांची लाज काही प्रमाणात राखली गेली, असे म्हणता येईल; परंतु या घटनेने अनेक गंभीर प्रश्‍न उपस्थित केले असून, ही घटना म्हणजे धोक्‍याची घंटा म्हणावी लागेल. डझनभर व्यक्ती पोलिसांच्या वेशात शस्त्रास्त्रांसह तुरुंगात येतात काय, आपण कैदी घेऊन आल्याचे तेथील सुरक्षारक्षकांना सांगत प्रवेश करतात काय आणि आत घुसून बेफाम गोळीबार करीत सहा जणांसह पलायन करतात काय, साराच घटनाक्रम एखाद्या चित्रपटातला वाटावा असा. तुरुंगांमधील सुरक्षाव्यवस्था एवढी ढिसाळ असेल तर या बाबतीत अत्यंत कठोर आणि मूलभूत उपाययोजना करायला हवी. सुरक्षा यंत्रणेतील हे कच्चे दुवे आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाल्याशिवाय अशा प्रकारांना आळा बसणार नाही. वास्तविक हरमिंदरसिंग मिंटू हा ‘अतिधोकादायक’ या सदरात मोडणारा कैदी. यापूर्वी २९ मार्चला त्याला पोलिस सरकारी रुग्णालयात घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असतानाही त्याने पलायनाचा प्रयत्न केला होता. हा अनुभव पोलिस यंत्रणेला असताना तर त्याच्याबाबत विशेष काळजी घ्यायला हवी होती; पण तसे काहीही घडलेले दिसत नाही. तुरुंगात घुसलेल्यांनी गोळीबार सुरू केल्यानंतर त्याला तेवढेच तिखट प्रत्युत्तर का दिले गेले नाही, हाही प्रश्‍न उपस्थित झाला आहे.
 पंजाबात येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तेथे खलिस्तानवाद्यांना फूस देऊन अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न पाकिस्तान सरकार व ‘आयएसआय’ करणार, हे उघड आहे. त्यामुळेच सुरक्षा यंत्रणांची जबाबदारी आणखी वाढते. राज्यात मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल आणि त्यांचे पुत्र उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्या कारभाराविषयी अनेक तक्रारी आहेत. पंजाबातील ऐंशीच्या दशकात उफाळून आलेली खलिस्तानवाद्यांची हिंसक चळवळ मोठ्या प्रयासाने आणि जबर किंमत मोजून शमविता आली. ती पुन्हा डोके वर काढणे देशाला महागात पडू शकते. त्यामुळेच नाभा तुरुंगातील या घटनेची सखोल चौकशी करतानाच या मोठ्या धोक्‍याची शक्‍यता नजरेआड करता कामा नये.

Web Title: Nabha prison