आदबशीर असहमती (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

राष्ट्र, राष्ट्रवाद आणि देशभक्ती या संकल्पनांचा सध्याच्या काळात होत असलेला विपर्यास लक्षात घेता प्रणवदांनी मांडलेले विचार महत्त्वाचे ठरतात. संघाच्या व्यासपीठावर जाऊन हा विचार मांडण्याची त्यांची कृतीही संवादाची महती सांगणारी आहे.

राष्ट्र, राष्ट्रवाद आणि देशभक्ती या संकल्पनांचा सध्याच्या काळात होत असलेला विपर्यास लक्षात घेता प्रणवदांनी मांडलेले विचार महत्त्वाचे ठरतात. संघाच्या व्यासपीठावर जाऊन हा विचार मांडण्याची त्यांची कृतीही संवादाची महती सांगणारी आहे.

राष्ट्र, राष्ट्रवाद आणि देशभक्तीच्या पाठशाळा गल्लोगल्ली उघडलेल्या असतानाच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावरून ‘एक भाषा, एक धर्म आणि एक शत्रू ही भारतीय राष्ट्राची संकल्पना असू शकत नाही’, असे सांगण्याची माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची कामगिरी कुणाच्या कितपत ध्यानात असेल आणि कोण त्याचा कसा अर्थ काढेल, हे सांगता येत नाही. त्यांच्या भाषणाचे सोईस्कर अर्थ संघाकडून काढले जाणे स्वाभाविक म्हणावे लागेल आणि संघाला प्रणवदांनी धडा दिला, अशी काँग्रेसजनांची समजूत होणेही साहजिकच. घडतेही तसेच आहे. संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाचे पाहुणे म्हणून माजी राष्ट्रपती प्रणवदांनी उपस्थित राहावे की नको, यावर बरीच चर्चा झाली. काँग्रेसजनांचा विरोध होता. त्यांच्या कन्येचाही विरोध होता. पण प्रणवदा गेले आणि बोलले. तब्बल अर्धशतकी सार्वजनिक जीवनातील अनुभव आणि आकलनाचे गहिरे सार त्यांनी आपल्या चिंतनशील भाषणातून मांडले. त्यांच्या भाषणाचे शीर्षकच ‘राष्ट्र, राष्ट्रवाद आणि देशभक्ती’ असे होते. अलीकडच्या काळात या संकल्पनांचा ज्या पद्धतीने आपल्या सार्वजनिक जीवनात संकोच केला जातो आहे आणि राष्ट्रभक्तीच्या लेबलांची दुकाने लावली जाताहेत, त्याबद्दल ते विस्तारपूर्वक; पण कुणालाही थेट दोष न देता बोलले. भारतीय राज्यघटना ही या देशाच्या सामाजिक व आर्थिक परिवर्तनाची ‘महान सनद’ (मॅग्ना कार्टा) आहे, असे स्पष्ट करतानाच आमच्या राष्ट्रवादाचा स्रोत आमची राज्यघटना हाच आहे, हेही त्यांनी सांगून टाकले. उन्मादी मानसिकतेच्या लोकांकडून धर्माच्या आधारे केली जाणारी राष्ट्रभक्तीची व्याख्या त्यांनी पार निकालात काढली.

प्रणवदा राष्ट्रपती होते. ते काँग्रेसचे नेते असले तरी त्यांच्याकडून एखाद्या राजकीय पक्षाच्या वॉर्ड अध्यक्षाच्या पातळीवरची सवंग राजकीय टीकाटिप्पणी अपेक्षित नव्हतीच. त्यामुळे काँग्रेसजनांचा हिरमोड झाला असणार हे खरे; पण जे बोलायला हवे होते, तेच प्रणवदा बोलले हेही तेवढेच खरे. ते काय बोलतील, याचा अंदाज संघालाही होताच. त्यामुळे शिष्टाचाराचा भाग म्हणून का असेना, प्रणवदांच्या आधी बोलण्याची संधी घेऊन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केलेले सर्वसमावेशकतेवर भर देणारे भाषण जणू काही प्रणवदांच्या भाषणाची पार्श्‍वभूमी तयार करणारे होते. प्रणवदाही सर्वसमावेशकतेवर आणि वैविध्यातल्या सौंदर्यावरच बोलले. त्यामुळे आमच्याच विचारांवर प्रणवदांनी शिक्कामोर्तब केले, असे संघ म्हणू शकतो. वास्तवात तसे घडलेले नाही. प्रणवदांनी केलेली राष्ट्रवादाची मांडणी आणि संघाच्या राष्ट्रभक्तीची मांडणी यात मूलभूत फरक आहे तो घटनात्मक मूल्यांना दिल्या जाणाऱ्या स्थानाचा आणि जन्मदत्त निष्ठांकडून आधुनिक मूल्यनिष्ठांकडे करावयाच्या प्रवासाचा. जात, धर्म, वंश या साऱ्या जन्मदत्त निष्ठा आहेत. त्यासाठी काहीही करावे लागत नाही. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या आधुनिक व मानवतावादी समाजाच्या खऱ्या निष्ठा आहेत. या मूल्यांसाठी कष्ट करावे लागतात. अशा मूल्यांवर निष्ठा असलेला समाज निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्योत्तर काळात बरेच प्रयत्न झाले. त्या प्रयत्नांचे यश माफक असले तरी ते देशहिताचेच ठरले यात वाद नाही. आधुनिक भारताच्या संकल्पनेला ज्या थोरांनी आकार दिला, त्यांच्याकडून अशाच मूल्यांचा जयघोष राज्यघटनेत उमटणे अपेक्षित होते व ते तसे आहेही. संघाच्या विचार परंपरेत भारतीय राज्यघटनेला आणि त्यायोगे प्रवाहित झालेल्या वैविध्याप्रति आदर बाळगण्याच्या संस्कृतीचा कितपत विचार होतो, हे संघाने तपासले पाहिजे. आपले पूर्वज एक होते म्हणून आपण सारे एक आहोत, असे म्हणण्यापेक्षा आपल्या साऱ्या वैविध्यांचे सौंदर्य जपत आपण सारे एकत्र राहू शकतो आणि जन्मदत्त निष्ठा मागे सोडून नव्या मूल्यांचा मार्ग चोखाळू शकतो, असे पूर्वजांचे दाखले न देता सांगता येते ना!...आजच्या ऐक्‍यासाठी पूर्वज कशाला हवेत? त्यांनी जे काही चांगले करायचे होते, ते झाले. वर्तमानात चांगला समाज घडवायचा असेल तर आमचाच धर्म चांगला, आमचीच संस्कृती चांगली, असा आग्रह धरून कसे चालेल?...हेच प्रणवदांनी वेगळ्या शब्दांत मांडले. असहिष्णुतेचा, कट्टरतेचा स्पष्ट शब्दांत धिक्कार केला. त्यांच्या मांडणीचे वर्णनच करायचे तर ‘आदबशीर असहमती’ असे करता येईल. प्रणवदांची ही कृती कटुता, विखार आणि असहिष्णुतेच्या वातावरणात संवादाचे महत्त्व विशद करणारी आहे. त्याची आज फार निकड आहे.

Web Title: nagpur rss program and pranab mukherjee speech