परीसस्पर्श लाभलेला द्रष्टा अभियंता

एका द्रष्ट्या अभियंत्याने भारतीय उद्योग जगताची गरज ओळखून, डिझेलवरील तीनचाकी वाहन निर्मिती करण्याचा संकल्प केला.
Ravi Chopra
Ravi ChopraSakal
Summary

एका द्रष्ट्या अभियंत्याने भारतीय उद्योग जगताची गरज ओळखून, डिझेलवरील तीनचाकी वाहन निर्मिती करण्याचा संकल्प केला.

- नंदन भोजराज

एका द्रष्ट्या अभियंत्याने भारतीय उद्योग जगताची गरज ओळखून, डिझेलवरील तीनचाकी वाहन निर्मिती करण्याचा संकल्प केला. व्यवस्थापन कौशल्याने, कठोर परिश्रमाने आणि नेतृत्वगुणाने त्याने तो साकार केला. देशाच्या ग्रामीण आणि शहरी भागातील मालवाहतुकीसाठी अनेकांची पसंती असणाऱ्या ''पीआयजिओ''ची निर्मिती करणाऱ्या रविंदर सिंग चोप्रा यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला. त्यांच्या प्रेरक जीवनाचा आणि कर्तृत्वाचा हा अल्पसा आढावा.

तो काळ होता १९९२ चा. देशातील ऑटोमोबाईल क्षेत्रात तीनचाकी वाहन निर्मिती करणारी केवळ एकच कंपनी होती. कोणीही प्रतिस्पर्धी नसल्याने देशभरातील विक्रेता ते ग्राहक या संपूर्ण साखळीवर त्या कंपनीचे अक्षरशः अधिराज्य होते. अशा परिस्थितीत एका नव्या कंपनीने या क्षेत्रात पाऊल ठेवायचे ठरवले आणि त्या कंपनीचे नेतृत्व करत होते रवी चोप्रा. बारामतीमध्ये मोठ्या उत्साहात या कंपनीचा शुभारंभ झाला, ती कंपनी म्हणजे पियाजिओ डिझेल थ्री व्हीलर. त्याकाळी तीनचाकी वाहननिर्मिती क्षेत्रात उतरल्यास हमखास बुडणारच, अशी एक धारणा होती. याचे कारण एवढा मोठा प्रकल्प उभा करणे म्हणजे किमान तीनशे ते चारशे कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार. त्यामुळे भरपूर भांडवलासह पुष्कळ मनुष्यबळ असलेली कंपनीच या क्षेत्रात उतरू शकते, असे सगळ्यांना वाटत असे. या समजुतीला फाटा देत, कंपनीच्या उपाध्यक्षपदाची धुरा संभाळणाऱ्या चोप्रा सरांनी एक अभिनव संकल्पना राबवली. चासी, गिअरबॉक्स, सस्पेन्शन यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या भागांची निर्मिती कंपनीमध्ये करायचे ठरवून, वाहनाचे बाकीचे सर्व भाग हे अन्य पुरवठादारांकडून बनवून घेऊन, त्यांची केवळ जोडणी कंपनीत करायची, असे त्यांनी ठरवले. खरे तर हा क्रांतिकारी निर्णय होता. याचे कारण अशाप्रकारे थेट जोडणीकरता तयार असणारे भाग बनवण्याचा कोणत्याही पुरवठादारांना अनुभव नव्हता.

मुळात कंपनी नवीन असल्याने पुरवठादारांचा कंपनीवर पुरेसा विश्वास नव्हता. दुसरी बाब म्हणजे त्यांना थेट जोडणी करता येईल, असे भाग बनवण्याचा अनुभव नव्हता. परंतु यावर तोडगा काढत चोप्रा सरांनी कंपनीच्या तज्ज्ञांची एक टीम बनवली, जी पुरवठादारांना उत्पादनात आवश्यक ते बदल करण्यासाठी मार्गदर्शन करेल. प्रारंभिक जे भाग कंपनीमध्येच तयार केले जाणार होते, त्यांच्या निर्मितीसाठी चक्क भाडेतत्त्वावर यंत्रसामग्री घेऊन तीनचाकी वाहनाचे उत्पादन सुरु केले.

अल्पावधीतच, डिझेलवर चालणारे तीनचाकी वाहन बाजारात आले आहे, याची सर्वजण नोंद घेऊ लागले. मला अजूनही आठवतं, आमच्या तीनचाकी वाहनाच्या उत्पादनाच्या अगदी प्रारंभी काही तांत्रिक समस्या उभ्या राहिल्या होत्या. त्यावेळी चोप्रा सरांनी एक ‘टास्क फोर्स टीम’ तयार केली, आणि अवघ्या चार महिन्यांचा अवधी देऊन सर्व अडचणी सोडवण्यासाठी त्या टीमला सांगण्यात आले. चोप्रा सर आवश्यक तिथे मार्गदर्शन करत होते. त्यामुळेच दिलेल्या कालावधीत सर्व अडचणी सोडवण्यात आल्या. चोप्रा सरांनी बाजाराचा सखोल अभ्यास करून उत्पादनाच्या जाहिरातीची योजना आखली होती. ''सोने की चिडिया'' ही टॅगलाईन घेऊन चोप्रा सरांनी आखलेल्या या रणनीतीला चांगलेच यश येऊ लागले.

मार्गदर्शन आणि सहकार्य

चोप्रा हे सहकाऱ्यांना व्यावसायिक जीवनात यशस्वी होण्यासाठी जसे प्रोत्साहन देत, तसेच व्यक्तिगत जीवनामध्ये देखील कायम मार्गदर्शन करत. कर्मचाऱ्यांना उत्तम निवास व्यवस्था देण्यासाठी चोप्रा सरांनी बारामतीमध्ये गृहसंकुल बांधले. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. कंपनीतील कर्मचाऱ्यांना देश- विदेशातील उत्तमोत्तम प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवले. त्यासाठी सढळ हाताने पैसे खर्च केले.

''पीआयजिओ''शी तांत्रिक सहकार्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर त्यांच्याबरोबर संयुक्त प्रकल्प हाती घेतला आणि अखेर ''पीआयजिओ व्हेईकोली युरोप’ ही कंपनीच त्यांनी सुरू केली. एका लहानसा स्टार्टअप ते हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारी कंपनी असा प्रवास सरांच्या दूरदृष्टीमुळेच शक्य होऊ शकला. चोप्रा सरांनी आर्थिक व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर, जागतिक मंदीच्या काळातही यशस्वीपणे कंपनी सांभाळली. अथक परिश्रमाच्या जोरांवर आपल्या परिसस्पर्शाने ‘पीआयजिओ इंडिया’चा विस्तार केला. एक प्रशिक्षणार्थी अभियंता ते कंपनीचा संचालक हा त्यांचा प्रवास याची साक्ष आहे. एक यशस्वी उद्योजक असलेल्या चोप्रा सारांनी बारामतीमध्ये आरोग्य, शिक्षण यांसारख्या क्षेत्रातही अमूल्य योगदान दिले. मी माझे भाग्य समजतो की सरांबरोबर अगदी सुरवातीचा काळापासून मला काम करता आहे, शिकता आले समृद्ध होता आले. चोप्रा सरांनी २४ जून रोजी या जगाचा निरोप घेतला. पण ते त्यांच्या द्रष्टेपणामुळे, कामाप्रती असलेल्या समर्पणामुळे आणि असामान्य कर्तृत्वामुळे कायमच सर्वांच्या स्मरणात राहतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com