निर्बंधछायेतून सुटताना

प्रत्येक यशस्वी कामगिरीची सुरुवात होते, ती मनात उद्‌भवलेल्या इच्छेने
relaxation from restriction
relaxation from restrictionsakal

सार्वजनिक स्मृती क्षीण असते, असे म्हटले जाते. परंतु कोरोनासारख्या संकटाच्या संदर्भात मात्र हे आपल्याला अर्थात सरकारला आणि समाजालाही परवडणार नाही. त्यामुळेच दोन वर्षांच्या निर्बंधांच्या छायेतून मोकळे होत असताना गरज आहे, ती या संकटाने दिलेल्या धड्यांची उजळणी करण्याची. कोरोनासारख्या महासाथीने जगभर गेली दोन वर्षे ठाण मांडले आहे. साथीची तीव्रता ओसरत असली तरी अस्तित्व संपलेले नाही. याची नोंद घेत केंद्र सरकारने येत्या ३१ मार्चपासून कोविड प्रतिबंधक निर्बंध मागे घेण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयाबरोबरच सावधपणे जगण्याचा इशारेवजा संदेशही दिला आहे.

मुखपट्टीचा वापर, सुरक्षित अंतर, चाचण्यांच्या तुलनेत १४ टक्के रुग्ण आढळणे, ऑक्सिजन बेडच्या एकूण क्षमतेच्या ४० टक्क्यांचा वापर करावा लागणे अशा प्रसंगी त्या-त्या भागांत, जिल्ह्यात निर्बंध लावा, असेही निर्देश दिले आहेत. चाचणी, लसीकरण, नियमपालन, रुग्णशोध आणि उपचार ही कोरोनावर मात करण्याची पंचसूत्री. तिचा अंगीकार सोडू नका, हेही सांगितले आहे. सावधानतेने आणि लोकांची साथीबाबतची प्रतिक्रियात्मक मानसिकता जोखूनच सरकारने हा निर्णय घेतला आहे. मात्र, सध्या चीन, दक्षिण कोरिया तसेच युरोपच्या काही भागात कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. ओमिक्रॉनचा जुळा भाऊ वाटावा, असा ‘ओमिक्रॉन बीए-२’आपले अस्तित्व दाखवून देत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या निर्णयाचे सावधपणे स्वागत करावे लागेल.

जगभर दहशत माजवणाऱ्या कोरोनाला आवरण्यासाठी केंद्र सरकारने २५ मार्च २०२० रोजी अत्यंत कडक ठाणबंदी लागू केली. त्यानंतर अनुभवला तो कोरोनाचा हाहाकार होता. संसर्गजन्य कोरोनाशी सव्वाशे कोटींवर लोकसंख्येचा भारत कसा झुंजणार, असा प्रश्न होता. याचे कारण येथे लोकसंख्येची घनता मोठी, ग्रामीण भागात मर्यादित आरोग्य यंत्रणा, शिवाय कठीण आर्थिक परिस्थिती. त्यामुळेच भारताची कोरोनाशी लढाई हा जगभर कुतूहलाचा, अभ्यासाचा आणि व्यवस्थापन कौशल्य आजमावण्याचा मुद्दा होता. तथापि, जगातला अत्यंत कडक लॉकडाऊन प्रत्यक्षात उतरवून आपण कोरोनाच्या जीवघेण्या पहिल्या दोन्हीही लाटांना तोंड दिले. पहिली लाट धीराने परतवून लावली.

सुरवातीला धास्तावलेले चेहरे, पोटाच्या खळगीसाठी गावखेड्यातून आलेल्यांचे शहरातून गावाकडे स्थलांतर असे चित्र होते. औषधोपचारासाठी धावपळ, रुग्णालयांमधील सुविधांसह कर्मचारी, तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता अशी स्थिती होती. आर्थिक आघाडीवर किंमतही खूपच मोठी मोजली. बेरोजगारीने कळस गाठला होता, पण त्यावरही आता मात करून उभे राहात आहोत. दुसऱ्या, अत्यंत परीक्षा घेणाऱ्या जीवघेण्या लाटेतही अर्थचक्र सुरू ठेवून आपण वेगळा वस्तुपाठ घालून दिला. हे सगळे घडत असताना ऑक्सिजन, रुग्णालयातील बेड, प्रतिबंधात्मक औषधे यांच्यापासून ते स्मशानातील अंत्यसंस्कारासाठी लागलेल्या अपरिहार्य रांगाही अनुभवल्या. त्या सगळ्या अनुभवांनी आपल्याकडील सार्वजनिक आरोग्याची व्यवस्था सुधारण्याची आणि खासगी आरोग्यसेवेचे उत्तरदायित्व वाढविण्याची गरज ठळकपणे दाखवून दिली आहे. त्याकडे आता दुर्लक्ष नको. काही ठिकाणी प्रशासकीय गोंधळ, त्यामुळे झालेले उद्रेक असे प्रसंग घडले असले तरी अराजकी परिस्थिती निर्माण होऊ दिली नाही, हे यशही लहान नाही.

सर्वसाधारणपणे देश म्हणून एकजुटीने आपण महासाथीवर मात करून जगाला वस्तुपाठ घालून दिला, हे कोणीही मान्य करेल. कोरोनाचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या महाराष्ट्रातील; विशेषतः मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूरसारख्या शहरांनी नवे पायंडेही निर्माण केले. केंद्र सरकारने वीस लाख कोटींचे मदतीचे पॅकेज, रेशनचे मोफत धान्य, मनरेगा योजनेंतर्गत गावाकडे परतलेल्यांना रोजगार अशा उपायांनी लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या लाटेचा तडाखा अनेकांना बसला; पण ती दुसऱ्या लाटेएवढी जीवघेणी नव्हती, हीच समाधानाची बाब. या लढाईमध्ये व्यापक लसीकरण मोहीम खरोखरच वरदायी ठरली, असे म्हणावे लागेल. १६ जानेवारी २०२१ रोजी सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेद्वारे १८२ कोटींवर डोस दिले गेले. बारा वर्षांपासून ते रुग्णशय्येला खिळलेल्यांपर्यंत अनेकांच्या लसीकरणाने आपण आपत्तीचा मुकाबला करू शकलो, एवढेच नव्हे ९९ देशांना लसीचे लाखो डोसही आपण पुरवले, हेच खरे.

कोरोना कधी जाईल, पुढे काय होण्याची शक्यता आहे, याची उत्तरे आज कोणीच छातीठोकपणे देऊ शकत नाही. विषाणूतज्ज्ञांनीही हे स्पष्ट केले आहे. चुकत, शिकत वाटचाल करावी लागेल, हेच याचे सार आहे. विशेषतः जीवनावश्यक औषधे, ऑक्सिजनसह आवश्यक सामग्री यांच्यापासून ते डॉक्टरांची पुरेशी कुमक सज्ज ठेवली पाहिजे. ड्रग कोऑर्डिनेशन कमिटी (डीसीसी), कोविड ड्रग मॅनेजमेंट सेल (सीडीएमसी) यासारख्या विविध यंत्रणा सातत्याने कार्यरत राखल्या पाहिजेत. तीन लाटांमधून मिळालेल्या धड्यातून आरोग्य यंत्रणांतील त्रुटी दूर करण्यापासून ते अर्थकारणाच्या चक्राला गती देण्यापर्यंत अनेक गोष्टींचे आव्हान उभे आहे. त्याला सरकार आणि समाज कसे सामोरे जातात, यावरच आपली पुढची वाटचाल कशी होणार हे ठरेल.

प्रत्येक यशस्वी कामगिरीची सुरुवात होते, ती मनात उद्‌भवलेल्या इच्छेने.

- नेपोलियन हिल, लेखक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com