संसदेतील मैदानी लढाई (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 फेब्रुवारी 2019

आक्रमक भाषण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मैदानी लढाईचे रणशिंग संसदेतूनच फुंकले. निवडणुकीतील प्रचाराचे स्वरूप काय असणार, हे त्यामुळे स्पष्ट झाले आहे.

आक्रमक भाषण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मैदानी लढाईचे रणशिंग संसदेतूनच फुंकले. निवडणुकीतील प्रचाराचे स्वरूप काय असणार, हे त्यामुळे स्पष्ट झाले आहे.

पं तप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपेक्षेप्रमाणेच लोकसभा निवडणुकीच्या मैदानी लढाईचे रणशिंग थेट संसदेतून फुंकले आहे! राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना केलेल्या ९० मिनिटांच्या भाषणात त्यांनी विरोधी पक्ष आणि विशेषत: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गेले काही महिने सातत्याने लावलेल्या वरच्या पट्टीपेक्षाही चढा सूर लावला होता. मोदी वक्‍तृत्वाबद्दल प्रसिद्ध आहेतच; पण गुरुवारी लोकसभेत बोलताना, त्यांनी आजवरचे सारे कसब पणाला लावले होते आणि त्यांच्या हातात मजबूत आकडेवारीही होती. भारतीय जनता पक्षाला येत्या लोकसभा निवडणुकीत मुख्य भीती आहे ती विरोधकांच्या ‘महागठबंधना’ची आणि ती त्यांनी विरोधकांच्या या ऐक्‍याची ‘महाभेसळ’ अशी संभावना करून दाखवून दिली.

राहुल गांधी, तसेच विरोधक यांच्या हातात या वेळी दोन मुद्दे प्रमुख आहेत. राफेल विमान खरेदीतील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा राहुल गांधी सातत्याने मांडत असून, त्यांनी मोदी यांच्याशी थेट चर्चेचे आव्हानही दिले आहे. त्याचबरोबर रोजगारनिर्मितीत सरकारला आलेल्या अपयशाचा मुद्दाही विरोधकांनी लावून धरला आहे. विरोधकांच्या या आरोपांच्या चिंधड्या उडवताना, मोदी यांनी देशात गेल्या साडेचार वर्षांत असंघटित क्षेत्रात कोट्यवधी रोजगार निर्माण झाल्याचा दावा केला आणि त्यासाठी १५ महिन्यांत एक कोटी ८० लाख कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी योजनेचे खातेदार झाल्याचे निदर्शनास आणून दिले. मात्र, ‘राफेल’बाबत त्यांनी केलेल्या सर्व दाव्यांना नंतरच्या २४ तासांतच एका इंग्रजी वृत्तपत्राने केलेल्या गौप्यस्फोटामुळे मोठा हादरा बसल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे राहुल गांधी यांच्या भात्यात आणखी शस्त्रसामग्री जमा झाली आहे. मोदी यांचे हे बहुधा या लोकसभेतील शेवटचे भाषण असल्याने त्यांनी त्याचा पुरेपूर फायदा उठवत काँग्रेस, नेहरू-गांधी कुटुंब आणि घराणेशाही यांनाच लक्ष्य केले. मोदी यांचे हे भाषण बहुतेक वृत्तवाहिन्यांनी थेट प्रसारित केले आणि घराघरांत ते पाहिलेही गेल्यामुळे मोदी यांनी यानिमित्ताने भाजपच्या प्रचाराचा प्रारंभच केला, असे म्हणता येते. प्रचाराचा पोत आपण ठरवायचा आणि विरोधकांना ती पठडी स्वीकारायला लावायची ही मोदींची  रणनीती असते. यावेळची व्यूहरचनाही त्याला अपवाद नाही.  `व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आणि पक्षापेक्षा देश मोठा ’ असे सांगत राष्ट्रवादाचा राग त्यांनी आळवला आणि त्या मुद्यावरून विरोधकांवर;  विशेषत: काँग्रेसवर शरसंधान केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदी यांच्या ‘काँग्रेसमुक्‍त भारत’ या गेल्या काही वर्षांतील प्रचाराबद्दल नाराजी व्यक्‍त करून, सर्वसमावेशकतेचा मुद्दा अलीकडेच पुढे आणला होता. तरीही मोदी काँग्रेसमुक्त भारताची भाषा सोडायला तयार नाहीत, हेही दिसले. ‘काँग्रेस विसर्जित करा, असे महात्मा गांधींनीच सांगितल्याचा दाखला त्यांनी दिला. शिवाय ‘काँग्रेसमध्ये जाणे म्हणजे आत्महत्या करणेच आहे,’ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विधानही त्यांनी उद्‌धृत केले. याचा अर्थ स्पष्ट आहे. काँग्रेसला अलीकडल्या काळात मिळालेल्या संजीवनीमुळे भाजप भ्रांतचित्त झाला आहे, हे दिसून आले. ‘महामिलावट’ या शब्दातून त्यांनी इतरांनाही टोला लगावला असला तरी त्यांचा मुख्य रोख काँग्रेसवरच होता. निवडणुकीतही त्यांची हीच रणनीती असणार हे स्पष्ट झाले. भाजपच्या आगामी प्रचारमोहिमेची ही झलक म्हणायला हरकत नाही. ‘काँग्रेस हवाई दलासाठी अत्याधुनिक लढाऊ विमाने खरेदी करू शकली नाही. ती आम्ही केली. काँग्रेसने ५५ वर्षे सत्तेचा उपभोग घेतला, तर आम्ही ५५ महिने देशाची सेवा केली!’ आदी अनेक विधानांबरोबरच ‘बीसी’ म्हणजे ‘बिफोर काँग्रेस’ आणि ‘एडी’ म्हणजे ‘आफ्टर डायनॅस्टी’ असा नवा अर्थही त्यांनी लावला. आता आगामी काळात भाजपचे तमाम प्रवक्ते या साऱ्या विधानांचाच वापर करत राहणार, हे उघड आहे.

 राफेल विमानांच्या खरेदीत आपला काहीच सहभाग नव्हता आणि मोदी हे थेट यासंबंधात वाटाघाटी करत होते, अशा आशयाचे संरक्षण मंत्रालयाचे पत्र प्रसिद्ध झाले, त्याचा आधार घेऊन राहुल यांनी ही पत्रकार परिषद गाजवली. मात्र, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी तातडीने ते पत्र आणि संबंधित आरोप यांचा इन्कार केला आहे. मात्र, थेट उत्तरे देण्याऐवजी त्यांनी ‘काँग्रेसला हवाई दल दुबळे करावयाचे आहे!’ या पंतप्रधानांच्या विधानाचीच री ओढली. त्यामुळे आता निवडणुका होईपर्यंत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अशाच झाडल्या जाणार आणि निवडणूक प्रचाराच्या तोफा जोमाने धडधडू लागणार, हे स्पष्ट झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: narendra modi lok sabha speech and election in editorial