‘टाटाधर्म’ वाढवावा

natarajan-chandrasekaran
natarajan-chandrasekaran

एखाद्या उद्योगसमूहाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती होते, हा संपूर्ण समाजाच्या आस्थेचा, स्वारस्याचा विषय होण्याचे एरवी कारण नाही; पण टाटा समूहाची गोष्टच वेगळी आहे. देदीप्यमान परंपरा लाभलेला हा समूह भारताच्या राष्ट्रउभारणीच्या प्रयत्नांशी समरस तर झालाच; पण कमालीच्या स्पर्धात्मक वातावरणातही स्वतःची छाप उमटवत प्रगती करीत राहिला. विशिष्ट मूल्यांशी आणि समाजाशी बांधिलकी यामुळे टाटा समूह हा वेगळा ठरतो आणि तेथील घडामोडींविषयी उत्सुकता वाटते. तसेच रतन टाटांचे वारसदार म्हणून आलेल्या सायरस मिस्त्रींची गच्छंती, त्यावरून सुरू असलेले वाद या पार्श्‍वभूमीवर नवा वारसदार कोण याची उत्सुकता होतीच. नटराजन चंद्रशेखर यांची ‘टाटा सन्स’च्या अध्यक्षपदी नियुक्ती ही त्यामुळेच लक्ष वेधून घेणारी ठरली. टाटा समूहाचे ते पहिलेच बिगरपारशी अध्यक्ष असतील, अशी चर्चा सुरू झाली; परंतु मुद्दा ते ‘टाटाधर्मा’चे पाईक आहेत, हाच असायला हवा. प्रशिक्षणार्थी म्हणून या समूहात दाखल झालेले चंद्रशेखरन खऱ्या अर्थाने या समूहाच्या आतल्या गोटातील आहेत. केवळ औद्योगिक, व्यवस्थापकीय आणि तांत्रिकदृष्ट्या नव्हे; तर या उद्योगाच्या मूल्यप्रणालीशीही समरस झालेले असणे या अर्थानेही. त्यामुळेच त्यांच्या निवडीविषयी व्यापक प्रमाणात समाधानाची भावना व्यक्त झाली. सायरस मिस्त्री यांची चारच वर्षांत गच्छंती झाल्याने आणि तडकाफडकी घेतल्या गेलेल्या या निर्णयाचे कोणतेही कारण जाहीर करण्यात न आल्याने तर्कवितर्कांना उधाण आले होते. त्यातच मिस्त्री यांनी आक्रमक होत थेट रतन टाटांच्या विरोधात कायदेशीर संघर्षाचा पवित्रा घेतल्याने टाटा समूहाची प्रतिमा झाकोळळी गेली. त्यामुळे आता पहिल्यांदा चंद्रशेखरन यांची कसोटी लागेल ती समूहाची प्रतिमा उंचावण्यात. यापूर्वी त्यांच्यावर जबाबदारी होती, ती ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ची. ती त्यांनी किती उत्तमरीत्या पार पाडली, हे समजण्यासाठी काही आकडे बोलके आहेत. २००९-१० मध्ये टीसीएसचे उत्पन्न होते तीस हजार कोटी रुपये. २०१५-१६ या आर्थिक वर्षात ते एक लाख आठ हजार कोटी रुपयांवर जाऊन पोचले. चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वाचा, व्यवस्थापकीय कौशल्याचा या यशात मोठा वाटा होता. हे सगळे खरेच आहे; परंतु आता जी जबाबदारी आली आहे, ती अधिक व्यापक आहे. समूहातील विविध कंपन्यांना त्यांना प्रगतीच्या मार्गावर आणायचे आहे. पोलाद, ऊर्जा, दूरसंचार व वाहन या क्षेत्रातील टाटांच्या कंपन्यांना झगडावे लागते आहे. यामध्ये समूहाचे भांडवल मोठ्या प्रमाणावर गुंतलेले आहे. नफा मात्र टीसीएस, टायटन, व्होल्टास या कंपन्यांकडून मिळतो. चंद्रशेखरन यांना आता सर्वच क्षेत्रांत कंपनीची घोडदौड कशी होईल, हे पाहायचे आहे.

उद्योग क्षेत्रात विशिष्ट कौशल्ये, उच्च प्रतीचे तांत्रिक आणि व्यवस्थापकीय ज्ञान, बाजारपेठेचा अंदाज घेण्याची क्षमता अशा गुणसमुच्चयाची गरज असते. चंद्रशेखरन यांच्याकडे हे सर्व आहेच; परंतु कर्णधारपद सांभाळायचे असते, तेव्हा याच्याच जोडीने सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या क्षमतेचा कस लागतो. त्या त्या वेळच्या आर्थिक लाभहानीपलीकडे दीर्घकालीन व्हिजन आणि मूल्यप्रणालीशी सुसंगत व्यवहार हीदेखील तिथे कसोटी बनते. सुदैवाने याविषयी चंद्रशेखरन जागरूक आहेत. माणसे जोडण्याचे काम आपल्याला करायचे आहे, असे त्यांनी पहिल्याच भाषणात सांगितले. ते उत्तम धावपटू आहेत, आणि जगाच्या विविध भागांतील मॅरेथॉनही त्यांनी केल्या आहेत, हेही अर्थपूर्ण आहे. याचे कारण उद्योगजगतातील आजच्या स्पर्धेचे स्वरूप लक्षात घेतले तर तिथेदेखील धावण्याला पर्याय नाही, असेच चित्र आहे. रोज पळण्याच्या व्यायामाचा किती फायदा होतो, हे सांगताना चंद्रशेखरन यांनी अनेक महत्त्वाच्या कल्पना आपल्याला धावत असताना सुचल्या आणि त्यावर आधारित निर्णय यशस्वी ठरले, असे म्हटले आहे. कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह, गुंतवणूकदारांमध्ये विश्‍वास निर्माण करण्याचे आव्हान चंद्रशेखरन यशस्वीरीत्या पेलतील, ते तंत्रज्ञानावरील प्रभुत्वाबरोबरच सांघिक भावनेचे महत्त्व ओळखण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com