ठोको ताली! (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

मूलभूत प्रश्‍नांवरील चर्चेने निवडणूक प्रचार ढवळून निघेल, ही अपेक्षाच भाबडी ठरावी, असे सध्या पंजाबातील चित्र आहे. नवज्योतसिंग सिद्धूचा गाजावाजा करीत झालेला काँग्रेस प्रवेश हे याचेच एक लक्षण.

गोठ्यातून खुंट्यासकट पसार झालेले खोडकर खिलार कुठल्या सर्व्हे नंबरात तोंड घालील आणि गावात हकनाक भांडणे लावून देईल, याचा काही नेम नसतो. तसेच काहीसे सध्या पंजाबातले चित्र दिसते. गेले काही महिने कुठल्या ना कुठल्या पक्षाला झुलवत ठेवणारे माजी क्रिकेटपटू कम समालोचक कम खासदार नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या सुप्रसिद्ध ‘सिद्धूवाणी’सह अखेर पंजाब विधानसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर काँग्रेस पक्षाच्या तंबूत प्रवेश केला आहे. या पुढील किमान पंधरा-वीस दिवस त्यांच्या हाती काँग्रेसची डफली दिसणार आहे. इतकी वर्षे हेच सिद्धू भारतीय जनता पक्षाच्या गुणगानात कुठलीही कसर राहू देत नव्हते. पण गेल्या वर्षी सप्टेंबरातच त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. तेव्हापासून आतापर्यंत, ते कुठल्या पक्षात जाणार, याची पद्धतशीर चर्चा त्यांनी प्रदीर्घ काळ माध्यमांमध्ये घडवून आणली. भरपूर फुटेज खाऊन त्यांनी मध्यंतरी अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षालाही झुलवले. सिद्धूंनी ‘आप’च्या प्रचाराची धुरा जरूर सांभाळावी; पण निवडणूक मात्र लढवू नये, असा तिढा केजरीवालांनी टाकल्यावर त्यांनी दुसऱ्या सर्व्हे नंबराकडे मोर्चा वळवला. गेल्याच महिन्यात सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना ‘दो जिस्म है, लेकिन एक जान है हम’ अशी फिल्मी हिंट दिली होती; पण तरीही सिद्धू यांनी काँग्रेसलाही झुलवत ठेवलेच. अखेर दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांनी पक्षात प्रवेश केला व हे सिद्धूनाट्य संपले. सिद्धू यांच्या काँग्रेसगमनामुळे पंजाबातील राजकीयनाट्य रंगतदार झाले यात शंका नाही; पण त्यामुळे तेथील राजकीय समीकरणांवर लक्षणीय परिणाम होईल, असे मात्र काही नाही.

सिद्धू यांची प्रतिमा, माध्यमे आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांत मनोरंजनाच्या मर्यादा ओलांडून ना कधी गेली, ना जाण्याची शक्‍यता आहे. चमकदार डायलॉगबाजी, झकपक पोशाख आणि पराकोटीचा आत्मकेंद्रित स्वभाव या ‘सद्‌गुणां’च्या जोरावरच सिद्धू कायम प्रसिद्ध बटोरत राहिले. घट फोडून, पट भेदून प्रसिद्ध पुरुष होता येते; पण सिद्ध पुरुष होणे अवघड ही उक्‍ती या ‘सिद्धूपुरुषा’ला मानवणारी नव्हतीच. गेली दीड दशके हे गृहस्थ सक्रिय राजकारणात आहेत, पण नाव घेण्याजोगे एकही कार्यकर्तृत्व त्यांच्या खात्यात नोंदले गेलेले नाही. क्रिकेट कारकिर्दीतली उणीपुरी चार-पाच वर्षे हेच सिद्धू ‘स्ट्रोकलेस वंडर’ या उपाधीनिशी क्रिकेटरसिकांच्या टिंगलीचा विषय झाले होते, हे काहींच्या अजून स्मरणात असेल. सिद्धू यांची राजकीय कारकीर्दही ‘स्ट्रोकलेस वंडर’ म्हणावी अशी आहे.

निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या पंजाबात आज असंख्य प्रश्‍नांनी उग्र रूप धारण केलेले आहे. अकाली-भाजपच्या संयुक्‍त सरकारच्या कारभाराचे दिवसागणिक वाभाडे निघत आहेत. एकेकाळी मोहरी आणि गव्हाच्या शेतांसाठी ओळखल्या जाणाऱ्या उडत्या पंजाबात ‘चित्ता’ या बदनाम अमली पदार्थाने तरुणाईला विळखा घातला आहे. दशकभरात चित्र पार पालटले आहे. बादल-भाजपच्या सरकारला या निवडणुकीत जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे, हे तर दिसतेच आहे. प्रस्थापिताविरोधातील (अँटी-इन्कम्बसी) जनमताचा रेटा आपल्याकडे ओढण्यात मध्यंतरी केजरीवालांच्या ‘आप’ने आघाडी घेतल्याचे चित्र होते. तथापि, या गदारोळात काँग्रेसला मात्र पुरेसे बळ एकवटता आले नाही. पंजाबचे काँग्रेस प्रमुख आणि प्रमुख आव्हानवीर कॅप्टन अमरिंदरसिंग पंचाहत्तरीचे, तर विद्यमान मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल हे तर नव्वदीच्या उंबरठ्यावर आलेले. अशा परिस्थितीत नव्या दमाचा कोणी खेळाडू रिंगणात उतरला, तर पंजाबच्या जनतेला हवेच होते; पण सर्कशीच्या रिंगणात दमदार पावले टाकीत वनराज यावा, अशी अपेक्षा असताना विदूषकाने एंट्री घ्यावी, तद्वत सिद्धू यांनी उसळी घेतली आहे. गेल्या काही महिन्यांत सिद्धू यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहत बऱ्याच टोप्या ट्राय करून पाहिल्या. ‘पंजाबच्या राजकारणातून दूर करण्याचा कट करणाऱ्या’ भाजपला त्यांनी सोडचिठ्ठी दिली ती याच कारणाने. नंतर ‘आप’शी साटेलोटे जमवून मुख्यमंत्रिपदाचे काही जुळते काय, हेही चाचपून पाहिले. आता काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची हमी मिळवल्याची चर्चा अमृतसरमध्ये रंगू लागली आहे. एखाद्या बनेल व्यापाऱ्याप्रमाणे घासाघीस करण्याची सिद्धू यांची चाल मतदारांना कितपत रुचेल, ही शंकाच आहे. सिद्धू यांच्या काँग्रेस-प्रवेशानंतर समाजमाध्यमांतील पंजाबी तरुणाईने त्यांच्याविरोधात उठवलेली टीकेची झोड त्या दृष्टीने लक्षणीय मानायला हवी. चमकदार वाक्‍ये फेकून ‘ठोको ताली’ अशी मागणी करून टाळ्या वसूल होतीलही, पण मते वसूल करण्यासाठी वेगळे काही करावे लागते, याचे भान सिद्धू यांनी ठेवायला हवे होते. एकंदरीतच पंजाबातील निवडणूक प्रचाराचा स्तर हा खटकेबाज टोमणे, शेरोशायरी, जुमल्यांनी प्रदूषित झालाच आहे. थेट समस्यांना भिडण्याचा समंजसपणा एकाही पक्षाने आतापर्यत तरी दाखवलेला नाही. तेव्हा सारे जण करताहेत, तेच सिद्धू यांना येत्या ४ फेब्रुवारीपर्यंत करावयाची आहे- बॅटिंग! याहून अधिक त्यांच्याही हाती काही नाही आणि ते ऐकून मनोरंजन करून घेण्यापलीकडे मतदारांच्याही हाती काही नाही. ठोको ताली!

Web Title: Navjot Singh Sidhu enters congress