शरीफ यांचा कांगावा (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 सप्टेंबर 2016

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे आमसभेतील भाषण म्हणजे पाकिस्तानी कांगाव्याचा नमुना होता. दहशतवादाला चिथावणी देण्याच्या कृत्याबद्दल पाकिस्तानला जाब विचारला जात असतानाही शरीफ सभ्यतेचा जो आव आणत आहेत, तो निव्वळ कोडगेपणाच म्हणावा लागेल. 

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत काश्‍मीर प्रश्‍नावरून आळवलेला भारतविरोधी राग म्हणजे खोटेपणाचा, दांभिकतेचा कळस आहे. एखाद्या धूर्त वकिलाने ज्यूरींसमोर फक्त सोईचीच तथ्ये आणावीत आणि आपल्या विरोधात जाणाऱ्या वास्तवाचा उच्चारही करू नये, तशा पद्धतीचे हे भाषण होते. पाकिस्तानातील दहशतवादी घटनांबद्दल नक्राश्रू ढाळताना भारताच्या विरोधात "स्टेट पॉलिसी‘ म्हणून दहशतवादाचा वापर केला जातो, याविषयी ते मूग गिळून होते. अफगाणिस्तानातील निर्वासितांना पाकिस्तानने उदार मनाने सामावून घेतल्याचे सांगताना प्रत्यक्षात त्यांची स्थिती काय आहे, याविषयी ते मौन पाळतात. बलुच, शिया, हिंदू, ख्रिश्‍चन आदी अल्पसंख्याकांवर दिवसाढवळ्या अत्याचार होत असूनही सगळे आलबेल असल्याचे दाखविण्याची त्यांची केविलवाणी धडपड होती. अण्वस्त्रांच्या संदर्भात स्वतःची जबाबदारी झटकून टाकत भारताकडे बोट दाखवून ते मोकळे झाले. जणूकाही या प्रश्‍नावर दोन्ही देश एकाच पातळीवर आहेत, असा आव त्यांनी आणला. 

वास्तविक उरी येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर पाकपुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा केवळ भारताताच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही पुन्हा चर्चिला जात असताना आणि भारतात त्याबाबत तीव्र स्वरूपाचा जनक्षोभ असताना नवाज शरीफ मात्र काश्‍मिरींच्या स्वयंनिर्णयाबाबत आग्रह धरून भारताच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करतात, हे संतापजनक आहे. काश्‍मीर प्रश्‍न सुटल्याशिवाय भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित होणार नाही, हे शरीफ यांचे म्हणणे त्यांना शांतता नकोच असावी, हे दर्शवते. काश्‍मीर हा द्विपक्षीय विषय आहे. तो संबंधित दोनच राष्ट्रांनी चर्चेच्या माध्यमातून सोडवायचा विषय आहे, ही भारताची आजवरची स्पष्ट भूमिका आहे. त्यात तसूभरही बदल होण्याची शक्‍यता नाही, हे माहीत असूनही आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर या प्रश्‍नाचा वारंवार उल्लेख करणे ही पाकिस्तानची जुनी खोड आहे. आमसभेतील वीस मिनिटांच्या भाषणाचा बहुतांश भाग व वेळ ते काश्‍मीरवर बोलण्यात खर्ची करत असताना त्यातून सगळे अंतर्विरोध लख्खपणे समोर आले. उरीतील हल्ल्याचा साधा उल्लेखही त्यांनी केला नाही; पण त्याच वेळी काश्‍मीरमध्ये मारला गेलेला हिज्बुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुऱ्हाण वाणी याचा उल्लेख करताना त्याला "काश्‍मीरचा हीरो‘ असे संबोधले. उरीतील दहशतवादी हल्ल्याची भारताने अतिशय गांभीर्याने दखल घेतली आहे आणि योग्य ते प्रत्युत्तर देण्याची तयारी केली असल्याच्याही बातम्या आहेत. या प्रत्युत्तराचे स्वरूप आणि वेळ कोणती असेल हा धोरणात्मक भाग असतो; पण यातील गर्भित इशारा पाकिस्तानने गांभीर्याने समजून घ्यायला हवा. 

शरीफ महाशयांनी आमसभेतील त्यांच्या भाषणाची सुरवात शीतयुद्धोतर काळातील जागतिक स्थिती, बड्यांची सत्तास्पर्धा, युरोप व आखातातील स्थिती, जगापुढची आर्थिक आव्हाने अशा विविध मुद्यांना स्पर्श करत केली; पण तो केवळ देखावा होता. दहशतवादाचे चटके पाकिस्तानलाही बसताहेत हे खरे; परंतु त्यापासून पाकिस्तानी राज्यकर्ते काही बोध घ्यायला तयार नाहीत. दहशतवादाबाबत "गुड टेररिस्ट, बॅड टेररिस्ट‘ असली अत्यंत घातक मांडणी ते करताहेत. भारतद्वेषाची झापडे लावल्याने आपल्या पायाखाली काय जळत आहे, हे त्यांना दिसेनासे झाले आहे. हाफिज सईद, मौलाना मसूद अझहर, दाऊद इब्राहिम यांना आश्रय देणारे पाकिस्तानी राज्यकर्तेच आहेत; पण नवाज शरीफ यांनी त्याबद्दल मात्र चकार उल्लेख केलेला नाही. बुऱ्हाण वणीला हुतात्मा ठरवण्याची भाषा करण्याचे धाडस आमसभेसारख्या व्यासपीठावरून ते करूच कसे शकतात? भारताशी चर्चा करण्याची तयारी आहे; पण भारताकडून त्यासाठी सातत्याने अटी लादल्या जातात, असे म्हणणे हा तर ""...उलट्या बोंबा‘‘, असाच प्रकार आहे. काश्‍मीरमध्ये भारतीय लष्कराची दडपशाही चालू आहे, हजारो काश्‍मिरींवर अत्याचार सुरू आहेत, असा जावईशोध लावणारी अनेक विधाने शरीफ यांच्या भाषणात दिसून येतात; पण खुद्द त्यांच्याच देशातील बलुचिस्तानधील स्थितीवर भाष्य करण्याचेही ते टाळतात, ही तर चलाखीची कमाल आहे. अफगाणिस्तानातील स्थिती, अण्वस्त्रांचा वापर यांदर्भातील पाकच्या भूमिकेविषयी शरीफ यांनी मांडलेली भूमिका वास्तवाशी फारकत घेणारी आहे. 

शरीफ यांच्या आमसभेतील भाषणाचे तीव्र पडसाद भारतात उमटणे साहिजकच आहे. सोशल मीडियावर तर प्रतिक्रियांचा पाऊसच पडला आहे. त्यात शरीफ यांचा हुर्यो करणाऱ्या प्रतिक्रियाच अधिक आहेत. बुऱ्हाण वणीचा शरीफ यांनी महिमा वर्णन करणे म्हणजेच दहशतवादाला पाकिस्तानचा असलेला आश्रय स्पष्ट करतो, हे परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी लगेचच निदर्शनास आणून दिले आहे. पाकिस्तानच्या कपटी नीतीचा कोट्यवधी भारतीयांना आता तिटकारा आला असल्याची सार्वत्रिक भावना आहे, हे खरे असले तरी अशा प्रसंगी उतावीळपणा करण्यातही शहाणपणा नसतो, हेही समजून घेतले पाहिजे. शरीफ यांच्या भाषणाचा भारत सरकार योग्य तो समाचार घेईलच. प्रतीक्षा आणि संयमातही मुत्सद्देगिरी असू शकते, हे लक्षात घेतले पाहिजे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मुत्सद्देगिरीची मोहोर जागतिक समुदायावरही उमटवली आहे. त्यामुळेही पाकिस्तानी नेते बिथरले असू शकतात, हेही लक्षात घेतले पाहिजे.

Web Title: Nawaz Sharif repeats Kasmir Drama in UNGA