पर्यटनात निसर्गसंवर्धन हवेच

Nature
Nature

देव्हाऱ्यात देवच नसेल तर देव्हाऱ्याला काय अर्थ आहे? तसेच निसर्गाची शोभा नसलेल्या पर्यटनस्थळांचंही आहे. तेव्हा पर्यटनस्थळांचा विकास करताना निसर्गाचं संवर्धन करण्याला प्राधान्य देण्याची गरज आहे. 

दहा वर्षांपूर्वी कुटुंबीयांसोबत बंगळूर, म्हैसूर, उटी पाहायला गेलो होतो. मे महिन्यातील शेवटचा आठवडा होता. वळवाच्या पावसाच्या दोन-तीन सरी पडून गेल्या होत्या. त्यामुळे उटीला जाताना हवेत गारवा होता. डोंगराळ भागात काही ठिकाणी धबधब्यांना थोडफार पाणी होतं. जंगल चैत्रपालवीने पालवलं होतं. पुण्याच्या उकाड्यातून योग्य वेळी बाहेर पडल्याचं समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. भरदुपारी उटीला पोचलो, तर नाकाचा शेंडा लाल करणारी थंडी असल्याचं पाहून कोण मजा वाटली होती. उटीतल्या त्या तीन दिवसांच्या वास्तव्यातील गोड आठवणी आजही मनात ताज्या आहेत. त्या आठवणींची उजळणी करावी आणि पुन्हा एकदा थोडे दिवस का होईना पुण्याच्या असह्य उकाड्याला रामराम करावा, या उद्देशाने या वर्षी पुन्हा मे महिन्यात उटीला गेलो; पण या वेळी पाऊस हरवला होता. 

जंगल आणि धबधबे रुसले होते. थंडीनं अंग आखडून घेतलं होतं. उकाडा मात्र मोकाट सुटला होता. उटीला गेल्यावर चित्र बदलेल अशी आशा करत होतो; पण कसंच काय! उटीला पोचल्यावर आगीतून सुटून फुफाट्यात पडल्याचा अनुभव घेतला. गरमी थोडी कमी होती खरी; पण वाहतुकीच्या आणि पर्यटकांच्या गर्दीनं जीव मेटाकुटीला आला. सर्वत्र पडलेले कचऱ्याचे ढीग, त्यातून येणारी दुर्गंधी, त्यात भरीसभर म्हणून रस्त्यावरची सातत्यानं नाका-तोंडात जाणारी बांधकामाची धूळ अनुभवल्यावर या वेळच्या आठवणीही कायमच्या मनात घर करणार यात शंका राहिली नाही. एका दशकात उटीसारख्या नितांत सुंदर शहराची झालेली दुर्दशा खरंच बघवत नव्हती. असाच काहीसा अनुभव या वर्षी सिमला, कुलू, मनालीला गेलेल्या जवळच्या नातेवाइकांनीही घेतला. उन्हाळ्याच्या शेवटी ताम्हिणीच्या घाटातून कोकणात उतरल्यावर कोकणाची अवस्थाही फारशी वेगळी नसल्याचे प्रकर्षानं जाणवलं. मोठ्या प्रमाणावर झालेल्या वृक्षतोडीला शेतातल्या राबाच्या धुराची संगत होती. वाहतुकीची कोंडीही होती. सतत झालेल्या मातीच्या धुपीनं जमीन अक्षरश: पांढरीफटक पडल्याची दिसत होती. माशाच्या एका तुकड्यासाठी स्थानिक लोकांकडूनही 150-200 रुपयांची मागणी होत होती. 

देव्हाऱ्यात देवच नसेल तर देव्हाऱ्याला काय अर्थ आहे? तसेच निसर्गाची शोभा नसलेल्या पर्यटनस्थळांचंही आहे. हे अनेक पर्यटनस्थळांना पूर्वी आणि आता भेट दिल्यानंतर प्रत्यक्ष अनुभवलं. म्हणूनच महाराष्ट्र सरकारनं कोकण पर्यटन विकासासाठी स्वतंत्र पर्यटन महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली, तेव्हा अंगावर काटा आला होता. कारण या पर्यटन विकास महामंडळाच्या इमारतीची पायाभरणीच मुळी पर्यावरणाच्या अटी शिथिल करून करण्यात आली आहे. 

विमानतळ, पंचतारांकित हॉटेल, सर्वसामान्यांना न परवडणाऱ्या "सी वर्ल्ड‘ची उभारणी यासोबत इथला निसर्ग जपण्यासाठी त्याचं संवर्धन करण्यासाठी ठोस तरतूद करण्याची गरज होती. बहरलेली वृक्षराजी हा तर कोकण पर्यटनाचा आत्मा आहे. केरळमधील "कोकोनट लगून्स‘ पाहिले की त्याचे महत्त्व लक्षात येते. युती सरकारनं कोकण व मराठवाड्यात वृक्षतोडीवर बंधनं घालण्याच्या मोठ्या घोषणा केल्या होत्या. त्याचं पुढं काय झालं कोणास ठाऊक! पण अशा प्रकारे वृक्षतोडीवर बंधनं न घालता, वृक्ष लागवडीला प्रोत्साहन न देता कोकणातील पर्यटनाचा विकास होईल, असं कोणाला वाटत असेल, तर त्यांनी उटीसारख्या पर्यटनस्थळांना एकदा जरूर भेट देऊन यावं. शिवाय वाहतूक कोंडी आणि अस्वच्छता याकडे थोडंजरी दुर्लक्ष झालं, तर कोकणचा "कॅलिफोर्निया‘ झाल्याचे अनुभवणे कदापि शक्‍य होणार नाही, हेही ध्यानात ठेवावं. नुकत्याच देशभर साजऱ्या झालेल्या पर्यटन दिनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा सरकारनं कोकणात जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधा निर्माण करणार असल्याची घोषणा केली आहे. सरकारच्या उर्वरित कालावधीत हे काम पूर्ण करण्यात येईल, असंही सांगण्यात आलं आहे. या घोषणेचं स्वागतच करायला हवं. कारण कोकणचा "कॅलिफोर्निया‘ करण्याची घोषणा आजपर्यंत असंख्य वेळा करण्यात आली आहे; पण त्या प्रत्येक वेळी असं वेळेचं बंधन घालून घेण्यात आलं नव्हतं. पर्यटनाचा विकास एका ठराविक कालावधीत होणं आवश्‍यकच आहे. अन्यथा भविष्यात येणाऱ्या अडचणींमुळे योजना भरकटू शकते. 

उटी येथील आणखी एक अनुभव नमूद करणं महत्त्वाचं आहे. पर्यटन विकासामध्ये स्थानिक लोकांच्या सहभागाचं आणि निसर्गसंवर्धनाचं महत्त्व अधोरेखित करणारा असा हा अनुभव आहे. पर्यटनातून स्थानिक लोकांचा विकास व्हावा, असाच कोणत्याही सरकारचा उद्देश असतो. कोकणातही त्यासाठी काही प्रमाणात प्रयत्न झाले; पण अद्याप त्याला म्हणावं तसं यश आलेलं नाही. उटीला आम्ही महागड्या हॉटेलात राहण्याचा मोह टाळून एक दिवस स्थानिक मध्यमवर्गीय कुटुंबाच्या घरी राहिलो. पर्यटकांसाठी आवश्‍यक सर्व सुविधा तर तेथे होत्याच; पण तिथली स्वच्छता, माफक किमतीचे चविष्ट भोजन वाखाणण्याजोगं होतं. महत्त्वाचं म्हणजे ही सर्व व्यवस्था घर-संसार सांभाळून घरातील स्त्री आपल्या महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलीच्या मदतीनं बघत होती आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या घराभोवतीच्या छोट्याशा जागेत त्यांनी परिश्रमपूर्वक जोपासलेल्या झाडाझुडपांमुळे आमचं तिथलं वास्तव्य महागड्या हॉटेलमधील वास्तव्यापेक्षा अधिक सुखकर, आंनददायी झालं. कोकणातही हे सहज शक्‍य आहे, याचा कोकणात जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करणाऱ्यांना विसर पडू नये म्हणजे मिळवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com