नव्या भारतासाठी घेऊ 'सरदारां'कडून प्रेरणा!

एम. व्यंकय्या नायडू
मंगळवार, 1 नोव्हेंबर 2016

सरदार पटेलांनी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी असे प्रदेश कॉंग्रेसच्या पंधरापैकी बारा समित्यांचे मत होते. एकाही समितीने पंडित नेहरूंचे नाव सुचवले नसतानाही त्यांनी नेहरूंसाठी माघार घ्यावी असे गांधीजींनी पटेलांना सुचवले. गांधीजींच्या सल्ल्यानुसार पटेल यांनी माघार घेतली.

गुजरातमधील बारडोली येथे झालेल्या साराबंदी चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या वल्लभभाई पटेल यांना या चळवळीमुळे 'सरदार' ही उपाधी मिळाली; पण भारतीय नेत्यांच्या मांदियाळीत सरदार पटेल कुठे आहेत? स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान आणि त्यानंतरच्या काळात आधुनिक भारताच्या निर्मितीतील त्यांची भूमिका, याबद्दल त्यांना योग्य ते श्रेय मिळायला नको? 
 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाभिमुख धोरणांमुळे सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारत उदयाला येत आहे. मात्र, याचवेळी शेजारी देशाकडून पोसल्या जाणाऱ्या दहशतवादासारख्या अनेक अडचणींचाही सामना आपल्याला करावा लागतो आहे. देशाच्या प्रगतीच्या मार्गात अडथळे आणणाऱ्या शक्तींना पराभूत करण्यासाठी एकजूट दाखवणे हे या परिस्थितीत प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. स्वातंत्र्य मिळून सात दशके झाल्यानंतरही देशातल्या काही समाजघटकांना गरिबीला तोंड द्यावे लागते आहे; अनेक अनिष्ट सामाजिक चालीरीती आपल्याला अजूनही भेडसावत आहेत, हे आपले दुर्दैव आहे. या आव्हानांना तोंड देण्यासाठी सगळे उपलब्ध स्रोत वापरले जात असताना काही शक्ती मात्र हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी, फुटीरतावादाला उत्तेजन देण्याचा प्रयत्न करत आहेत. 

या पार्श्‍वभूमीवर मोदी सरकारने सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म दिवस 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून साजरा करण्याचे ठरवले. सरदार पटेल यांच्यासारख्या द्रष्ट्या, मुत्सद्दी नेत्याचे देशाच्या इतिहासातील मानाचे स्थान पुनर्स्थापित करणे, एवढेच कारण हा निर्णय घेण्यामागे नाही; तर सरदार पटेल यांचा वारसा आजही चालवण्याची गरज अधोरेखित करणे हा उद्देशही या निर्णयामागे आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच उद्‌भवलेल्या गोंधळाच्या परिस्थितीत केवळ त्यांच्या खंबीर आणि मुत्सद्दी भूमिकेमुळे देशभरात विखुरलेली 554 संस्थाने एका सूत्रात बांधली गेली आणि एकसंध भारत उदयाला आला. 

आधुनिक भारताच्या उभारणीत सरदार पटेलांनी बजावलेल्या भूमिकेचा गौरव करताना 'मॅंचेस्टर गार्डियन'ने लिहिले आहे ः ''पटेल हे केवळ स्वातंत्र्यलढ्यातले बिनीचे शिलेदार नव्हते. लढा संपल्यानंतर देश नव्याने उभा करण्यातही त्यांची भूमिका महत्त्वाची होती. एकच व्यक्ती एका बाजूला बंडखोर आणि दुसऱ्या बाजूला मुत्सद्दी राजकारणी या दोन्ही भूमिका क्वचितच वठवू शकते. पटेल असे अपवादात्मक व्यक्तिमत्त्व होते.'' 

15 ऑक्‍टोबर 1950 या दिवशी पटेल यांचे निधन झाले. 1991मध्ये त्यांना मरणोत्तर 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला. 

'चले जाव' चळवळीदरम्यान पटेल यांनी त्याकाळाच्या संदर्भाने मांडलेला एक मुद्दा किती समर्पक होता, हे मला यानिमित्ताने स्पष्ट करावेसे वाटते. ते म्हणतात, ''आपण किरकोळ कुरबुरी सोडून द्यायला हव्यात. उच्च-नीचतेच्या कल्पना सोडून समानतेची भावना जोपासली पाहिजे आणि अस्पृश्‍यता हद्दपार केली पाहिजे. ब्रिटिशांचं राज्य इथे येण्यापूर्वीचे स्वराज्य आपल्याला परत आणावे लागेल. आपल्याला सख्ख्या भावंडांसारखं राहावं लागेल.'' 

प्रत्येक काळात कोणीतरी एक तारणहार निर्माण होतो, अशा अर्थाचे एक इंग्रजी वचन आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच काही संस्थानिकांमध्ये आपली संस्थाने स्वतंत्रच ठेवण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण झाली, तर हैदराबादच्या निजामासह काहीजण पाकिस्तानात सामील होण्याच्या धोकादायक दिवास्वप्नात मश्‍गूल होते. नुकताच स्वतंत्र झालेला देश अशा अवघड परिस्थितीतून जात असताना सरदार पटेल यांच्या रूपाने भारताला एक तारणहार लाभला. 

सरदार पटेल यांची दूरदृष्टी आणि परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य यामुळे देश एकसंध राहिला. हैदराबाद वगळून भारताचा नकाशा डोळ्यांसमोर आणला तर त्यांच्या प्रयत्नांचे महत्त्व लक्षात येते. देशाच्या इतिहासातल्या या सगळ्यात अवघड काळात पटेल यांनी बजावलेल्या भूमिकेची दुर्दैवाने घ्यावी तशी दखल घेतली गेली नाही. यातून साहजिकच एक प्रश्‍न उभा राहतो, आपल्या शाळांतल्या इतिहासाच्या पुस्तकांतून इतिहासाचे आणि सरदार पटेल यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या नेत्यांच्या योगदानाबद्दल सम्यक ज्ञान मिळते का? महात्मा गांधींच्याबरोबर स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणाऱ्या अनेक मोठ्या नेत्यांनी स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या जडणघडणीत महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. सरदार पटेल यांपैकी एक महत्त्वाचे नेते होते. 

सरदार पटेलांवर मागच्या काळात झालेला अन्याय दूर करून, देशाच्या इतिहासात त्यांना त्यांचे योग्य स्थान मिळवून देणे हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा सरदार पटेलांची जयंती 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून साजरी करण्यामागचा हेतू आहे. याचा अर्थ त्यांना समकालीन असणाऱ्या अन्य नेत्यांचे कर्तृत्व कमी लेखावे असा अजिबात नाही. मागच्या सरकारांनी सातत्याने केलेली चूक दुरुस्त करण्याचा 'राष्ट्रीय एकता दिवस' हा एक प्रयत्न आहे. दुर्दैवाने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तीनच वर्षांत सरदार पटेलांचे निधन झाले. सरदार पटेल जर भारताचे पहिले पंतप्रधान झाले असते, तर इतिहास काही वेगळा झाला असता, असे अनेक भारतीयांप्रमाणे मलाही वाटते. पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांचे योगदान मोठे होतेच, त्याचे मोल यामुळे कमी होत नाही. आपल्या मुत्सद्देगिरीने संस्थानांचे सामिलीकरण घडवून आणण्याबरोबरच भारतीय प्रशासकीय सेवा आणि भारतीय पोलिस सेवा या दोन महत्त्वाच्या प्रशासकीय सेवा सुरू करण्यातही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. 'पोलादी चौकटी'बाबतच्या त्यांच्या दृष्टिकोनामुळे आज राष्ट्रीय पातळीवरच्या या दोन्ही सेवांनी एक मजबूत प्रशासकीय आणि सुरक्षा यंत्रणा उभी केली आहे. संविधान सभांमधल्या (कॉन्स्टिट्यूअंट ऍसेम्ब्ली) त्यांच्या भाषणांमध्ये त्यांनी जातिआधारित राजकीय आरक्षणांना विरोध करून अल्पसंख्य गटांना स्वतंत्र मतदारसंघांचा हट्ट सोडण्यास राजी केले होते. 

स्वातंत्र्यप्राप्तीच्या पूर्वसंध्येला त्यांनी जो मनाचा मोठेपणा दाखवला त्याचीही मला इथे आठवण करून द्यावीशी वाटते. सरदार पटेलांनी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी असे प्रदेश कॉंग्रेसच्या पंधरापैकी बारा समित्यांचे मत होते. एकाही समितीने पंडित नेहरूंचे नाव सुचवले नसतानाही त्यांनी नेहरूंसाठी माघार घ्यावी असे गांधीजींनी पटेलांना सुचवले. गांधीजींच्या सल्ल्यानुसार पटेल यांनी माघार घेतली. त्या वेळी होणारी कॉंग्रेस अध्यक्षांची निवड, हीच स्वतंत्र भारताच्या पहिल्या पंतप्रधानांची निवड असणार होती. सरदार पटेलांच्या या कृतीतून त्यांच्या मनाचा मोठेपणा तर दिसतोच; पण त्यांना सत्तेचा मोह नव्हता आणि राष्ट्रसेवा ही त्यांची प्राथमिकता होती हेही अधोरेखित होते. उपपंतप्रधान आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी अत्यंत खंबीरपणे आणि गतिमान पद्धतीने काम केले. दुर्दैवाने 2014च्या आधी केंद्रातले नेतृत्व निर्णयक्षम आणि खंबीर नसल्याने काश्‍मीरसारखा जटिल प्रश्‍न अजूनही सुटू शकलेला नाही. 

सत्ता मिळवण्यासाठी आज राजकीय पक्ष जातिपाती, धर्म, प्रदेश अशा मुद्द्यांवर अनुनय करण्यासह अनेक अल्पकालीन उपाययोजना करीत राहतात, त्या पार्श्‍वभूमीवर सरदार पटेल यांची निःस्वार्थी भूमिका ठळकपणे उठून दिसते. आजच्या काळात त्यांचे विचार आणि शिकवण अधिक समर्पक आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आज प्रत्येक भारतीयाने आधुनिक भारताच्या उभारणीसाठी आणि देशाचे ऐक्‍य अबाधित राखण्यासाठी निर्धारपूर्वक काम करणे आवश्‍यक आहे. 

Web Title: Need to take inspiration from Sardar Patel to build New India, writes Venkaiah Naidu