शून्य शोधताना : एक उत्कंठावर्धक शोधमोहीम

आ. श्री. केतकर 
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

बुकशेल्फ 

बुकशेल्फ 

भारताने जगाला दिलेली अनमोल देणगी म्हणून शून्याचा उल्लेख करण्यात येतो. मानवाने अनेकविध क्षेत्रांमध्ये जी प्रगती केली आहे, तिचे उगमस्थान शून्यात आहे. कारण या शोधामुळेच गणितामध्ये प्रचंड प्रगत झाली आणि मानवाला विविध क्षेत्रे पादाक्रांत करणे शक्‍य झाले. जवळपास सर्वच विषयांचा गणिताशी, पर्यायाने शून्याशी संबंध आहे, ही बाब आता सर्वमान्य झाली आहे. अशा परिस्थितीत एका गणितीला हे शून्य मुळात सर्वप्रथम दिसले कोठे याचा पुरावा शोधण्याची प्रेरणा झाली. त्याचे नाव आमिर ऍक्‍झेल. त्याने या शोधमोहिमेचे वर्णन "फाइंडिंग झीरो - अ मॅथेमॅटिशिअन्स ओडेसी टू अनकव्हर द ओरिजिन ऑफ नंबर्स' या पुस्तकामध्ये केले आहे. 

भारताच्या या महान शोधाचा दर्शनी पुरावा मात्र भारतात उपलब्ध आहे, तो इसवी सनाच्या सातव्या शतकातला. त्यामुळेच काही संशोधकांनी अरबांनी युरोपातील शून्याची ओळख आशियाला करून दिली, अशा अर्थाची मांडणी करून भारताचे श्रेय हिरावून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यात साम्राज्यवाद्यांच्या अहंभावही होता. लेखकाला हे जाणवल्याने त्याने काहीही करून हा शोध आपण लावायचाच असा निश्‍चय केला. (तसा दक्षिण अमेरिकेतही शून्याचा शोध साधारण भारताबरोबरच लागला होता. पण त्या काळात त्या खंडाबाबत माहितीच नसल्याने, तेथून ते युरोपमध्ये येणे शक्‍य नव्हते.) म्हणून मग पश्‍चिम आशिया, भारत आणि पूर्वेकडे म्हणजे थायलंड, कंबोडिया इ. ठिकाणी जाऊन स्वत: शोध घेतला. भारतात आढळलेल्या शून्याच्या आधीचे शून्य त्याला कंबोडियातील अवशेषांचा शोध घेताना कसे आढळले व नंतरही त्याचे जतन करण्यासाठी त्याला किती खटपट करावी लागली, अनेकांचे साह्य त्याला कसे मिळाले याची हकीगत एखाद्या रहस्यकथेमध्ये शोभून दिसेल. 

वडील मर्चन्ट नेव्हीमध्ये कॅप्टन असल्यामुळे लहानपणी आमीर, त्याची बहीण आणि आई अनेकदा दीर्घकाळ बोटीतून प्रवास करत. या प्रवासात त्याच्या वडिलांच्या मदतनीस लॅकी त्याला मदत करत असे. आमीरची आकड्यांबाबतची ओढ त्याने ओळखली होती. अनेकदा तो आमीरला गणिताची शिकवणी देई. त्यातून आपले आकड्यांबाबतचे कुतूहल कसे वाढत गेले, ते लेखक सांगतो. नंतर शिक्षणासाठीही लेखक गणित विषयच निवडतो, त्यामध्ये काही काळ गर्क राहतो. काही वर्षांनी त्याच्या वाचनातून शून्याबाबतचा लेख आल्याने, शून्याबाबतच्या कुतूहलाला पुन्हा चालना मिळते. आता त्याला या शून्याचा उगम, खरे तर दृश्‍य-लेखी पुरावा, आपण शोधून काढायचाच असा निश्‍चय करून तो शोधमोहिमेला निघतो. इजिप्तपासून सुरवात करून तो भारतात येतो. नंतर श्रीलंका, ब्रह्मदेश, थायलंड, कंबोडियात जातो. भारतातील पहिले शून्याचे दर्शन त्याला ग्वाल्हेर येथे होते, पण त्याचा कालखंड हा इसवीसनाच्या नवव्या शतकाच्या मध्याचा असल्याने त्याआधीचा पुरावा त्याला शोधायचा असतो. त्यामुळे प्राचीन काळात भारतातील हिंदू आणि बौद्धलोक जेथे गेले आणि त्यांनी तेथे संस्कृती जेथे रुजवली अशा ठिकाणी लेखक जातो. 
हिंदू आणि बौद्ध तत्त्वज्ञानात शून्य, शून्यता असा उल्लेख येतो. तो प्राचीन काळापासूनचा असल्याने, शून्याचा उगम हा भारतात वा आशियातच झाला असणार, अशी लेखकाची खात्री पटलेली असते. त्यादृष्टीनेच त्याचा शोध सुरू असतो. तो शोध लागल्याखेरीज आपल्याला समाधान लाभणार नाही, हे जाणवल्यामुळे हा शोध सुरूच राहतो. 

सरतेशेवटी कंबोडियातील एका पुराव्याचा उल्लेख त्याला 1931 च्या फ्रेंच संशोधक जॉर्जेस इफ्राह यांच्या द युनिव्हर्सल हिस्टरी ऑफ नंबर्स या पुस्तकात दिलेल्या, जॉर्ज कोडेस या गणिता-संशोधकाच्या नोंदीमध्ये आढळतो आणि तो त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. तो अतिशय अवघड असतो. कारण कंबोडियातील ख्मेर रूज राजवटीत स्थापत्य, शिल्प इ. कलाकृतींचे जे काही चांगले होते ते नष्ट करण्याचा त्यांनी चंगच बांधला होता. आणि त्यांचे अवशेष फक्त तोडफोड झालेल्या अवस्थेत बाकी होते. त्यामुळे हे काम खडतर होते, तरीही नंतरच्या काळात असे अवशेष गोळा करून ते काही ठिकाणी सुरक्षित ठेवण्यात आले होते, असे कळल्याने लेखक त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. जॉर्ज कोडेसने या अवशेषाचा शोध घेतल्यानंतर त्याच्याबाबत माहितीही लिहून ठेवली होती आणि त्याच्यावर के-127 असा उल्लेखही लिहून ठेवला होता. या शीलाखंडावर कोरलेल्या लेखामध्ये जे कालदर्शक आकडे दिले होते आणि त्यात शून्य हे टिंबाच्या स्वरूपात स्पष्टपणे दिसत होते. मुख्य म्हणजे या शीलालेखाचा कालखंड हा ग्वाल्हेरच्या आधी दोन शतकांचा होता आणि त्यामुळे लिखित शून्याचा उगम हा आशियात, कदाचित कंबोडियातच झाला असावा, असे अनुमान त्याने काढले होते. त्यामुळे शून्याचे श्रेय युरोपला जाणेच शक्‍य नव्हते. 

लेखकाची शोधमोहीम सफल झाली. एक गोष्ट मात्र जाणवते, की हजारो वर्षांपासून भारतात शून्याची संकल्पना असूनही त्याबाबत लेखी पुरावा मात्र मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण होते, ती केवळ मौखिक परंपरेमुळे आणि प्रश्‍न पडतो, की अशी आणखी किती माहिती लिखित स्वरूपात नसल्याने कालौघात नष्ट झाली असेल? 

फाइंडिंग झीरो - अ मॅथेमॅटिशिअन्स ओडेसी टू अनकव्हर द ओरिजिन ऑफ नंबर्स : 
लेखक : आमीर डी. ऍक्‍झेल 
प्रकाशक : पॅलग्रेव्ह मॅकमिलन 
पाने : 242; किंमत : 799 रु. 

Web Title: new book on maths