प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प अँड प्रा.लि. 

निखिल श्रावगे (अमेरिकी राजकारणाचे अभ्यासक) 
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

अमेरिकेच्या नव्या नायकासमोरचे ताट आव्हानांनी पूर्ण भरलेले आहे यात शंका नाही. राजकारण आणि प्रशासनातील त्यांचे नवखेपण नियुक्‍त्या करतानाच जाणवू लागले आहे. महासत्तेच्या कारभाराचा गाडा हाकणे त्यांना सोपे जाईल, असे वाटत नाही. 

अमेरिकेच्या नव्या नायकासमोरचे ताट आव्हानांनी पूर्ण भरलेले आहे यात शंका नाही. राजकारण आणि प्रशासनातील त्यांचे नवखेपण नियुक्‍त्या करतानाच जाणवू लागले आहे. महासत्तेच्या कारभाराचा गाडा हाकणे त्यांना सोपे जाईल, असे वाटत नाही. 

अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली. अध्यक्षपदाची सूत्रे अधिकृतपणे हाती घेण्यासाठी ट्रम्प यांना सुमारे दीड महिन्याचा वेळ आहे. नव्या अध्यक्षाला या अवधीत सुमारे चार हजार कर्मचारी आणि आपले मंत्रिमंडळ स्थापन करायचे असते. बहुधा जिंकण्याची पूर्ण शाश्वती नसल्याने ट्रम्प यांनी ही तयारीच केली नव्हती. त्यामुळे आता मंत्र्यांची नेमणूक करताना त्यांची पळापळ होत आहे. येत्या काही दिवसांत त्यांना ही नेमणूक करून धोरण आखायला सुरवात करावी लागेल. ट्रम्प निवडून आल्यावर अमेरिकेतील एक मोठा वर्ग त्यांच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी रस्त्यावर उतरला. काही ठिकाणी त्याला हिंसक वळणदेखील लागले. ट्रम्प यांचा कारभार सुरू झाल्यानंतर पुढील चार वर्षांत त्यांना अशा विरोधाचा सामना नक्की करावा लागेल. विजयानंतर दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी 'आपण अमेरिकेत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तीस लाख लोकांना हद्दपार करू' असे सांगून खळबळ उडवून दिली आहे. मायकल फ्लिन, स्टिव्ह बॅनोन या वादग्रस्तांची नेमणूक करून ट्रम्प आपल्या उजव्या, अमेरिकाकेंद्रित आणि इस्लामविरोधी विचारसरणीला अधिक धार देत आहेत. त्यांच्या या निर्णयावर वॅशिंग्टनमध्ये नेत्याचे राजकीय वजन आणि प्रभाव त्याचा सहकारी आणि कर्मचारी वर्ग किती उत्तम आहे यावर ठरतो. 

चौकटीबाहेरचे राजकारणी असणाऱ्या ट्रम्प यांचा विजय हा राजकारणाचा बाज बदलत असल्याचे निर्देशित करतो. जेमतेम वर्षभरापूर्वी राजकारणात सक्रिय झालेल्या ट्रम्प यांनी हिलरींच्या 40 वर्षांच्या राजकारणाला सुरुंग लावला आहे. ज्या व्यवस्थेला शिव्या देत ट्रम्प निवडून आले आता त्याच व्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर त्यांची नेमणूक झाली आहे. त्यांना काम करण्याशिवाय गत्यंतर नाही. 'अमेरिकेची आर्थिकदृष्ट्या भरभराट करू,' असे सांगणारे ट्रम्प नक्की काय करणार, हे कोणालाच माहीत नाही. ग्रामीण, श्वेतवर्णीय अमेरिकेतील एक मोठा वर्ग ट्रम्प यांच्याकडे अपेक्षेने पाहत आहे. वॉशिंग्टनकेंद्रित राजकारणाने हा वर्ग बाजूला फेकल्याने त्यांची तळी उचलून ट्रम्प जिंकले. या वर्गाच्या अपेक्षा अमेरिकाकेंद्रित आहेत. स्थानिक पातळीवर आर्थिक सक्षमीकरण, रोजगार, उत्तम आणि परवडू शकणारी आरोग्यव्यवस्था या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. अमेरिका बाकी जगात आपलं परराष्ट्रीय धोरण राबवून काय उच्छाद मांडते यात त्यांना रस नाही. कधीच नसतो. ट्रम्प हे अमेरिकेचे परराष्ट्रीय धोरण हे एका उद्योगपतीच्या चष्म्यातून बघतात. संधी मिळेल तिथे अमेरिकेचे नाक दाबू पाहणारे व्लादिमिर पुतीन हे अमेरिकेतील राजकीय वर्तुळात बहुतेक जणांना पटत नाहीत. निवडून आल्यानंतर ट्रम्प आणि पुतीन यांनी 'आपल्या दोन देशांचे गैरसमज टाळू, काही अंशी हात मिळवू' अशी चर्चा करून अनेक जणांना धक्का दिला आहे. सीरियात जाऊन तिथे अंतिमतः विरोधी गटात मोडणाऱ्या रशियाशी लढण्यात आपल्याला काही स्वारस्य नाही, असे ट्रम्प सांगत आहेत. त्यांची अशी अलिप्त भूमिका त्यांना पाठिंबा देणाऱ्या आणि प्रचंड अर्थकारण जोपासणाऱ्या 'गन लॉबी'ला रुचणार का, पोलिसगिरी सोडून अमेरिका आपला धाक स्वहस्ते कमी करून घेणार का हे प्रश्न आता डोके वर काढत आहेत. नव्या अध्यक्षाच्या धोरणांचा अंदाज येत नाही तोपर्यंत बाकी जग हे सावध भूमिका घेते. ट्रम्प यांना जोखण्यासाठी बाकी जग थोडा जास्त वेळ घेईल अशी शक्‍यता आहे. दहशतवादी गट जगात इतरत्र छोटे-मोठे हल्ले करून ट्रम्प यांची काय प्रतिक्रिया असेल याची चाचपणी करतील. त्यामुळे अमेरिकेच्या नव्या नायकासमोरचे ताट आव्हानांनी पूर्ण भरलेले आहे, यात शंका नाही. 

ट्रम्प यांच्या चमूमध्ये त्यांच्या मुलांचा सहभाग अनेकांना पचत नाहीये. त्यांचा जावई जारेड खुशनेर याचा त्यांच्या एकंदर निर्णयप्रक्रियेत चांगलाच दबदबा आहे! स्वतः ज्यू असणारे खुशनेर 'ज्यू लॉबी'च्या हिताचे निर्णय घेतील असे दिसते. ट्रम्प स्वतःच्या बुद्धीने चालतात, की अशा घटकांच्या हस्तक्षेपाला बळी पडतात, हे पाहाणे गरजेचे आहे. सत्ता शहाणपण शिकवते असे म्हणतात. ते ट्रम्प दाखवतील अशी आशा आहे. अमेरिकी कॉंग्रेसची दोन्ही सभागृहे आणि अध्यक्षपदावर नियंत्रण मिळवून रिपब्लिकन पक्ष सर्वंकष सत्ता राबवू शकतो. मात्र, राज्याभिषेकानंतर ज्या 'व्हाइट हाउस'चा ताबा डोनाल्ड ट्रम्प येत्या 20 जानेवारीपासून आपल्या हातात घेतील त्याला एक स्वभाव आणि स्वतःचे असे स्वतंत्र अस्तित्व आहे. ते अस्तित्व जगातल्या या सर्वांत शक्तिशाली मानवाला आपला कार्यक्रम राबवताना पुढील चार वर्षे सतत आपली आठवण करून देत असत. याच अस्तित्वाच्या जोरावर अमेरिकेचे सामर्थ्य बाकी जगावर लादायला सोपे जाते. मात्र, त्यासाठी या गुरफटून टाकणाऱ्या अदृश्‍य भावनेला भेदून आपले धोरण राबवणारा तगडा गडी पाहिजे. इतिहास पाहता खमका अध्यक्ष म्हणून समजले जाणारे अनेक जण असे करताना निष्प्रभ ठरले आहेत. सांप्रत काळातील आव्हाने आणि ट्रम्प यांचा अनुभव पाहता त्यांना तर हे मुळीच सोपे जाणार नाही. एककल्ली, उजव्या विचारसरणीच्या नेतृत्वाच्या दिशेने जगाचा रोख सुरू आहे. ट्रम्प त्यात अग्रस्थानी जाऊन बसले आहेत. राजकारणाचा हा पोत दर 80-90 वर्षांनी बदलतो आहे. माईक पेन्स यांच्यासारखा नेमस्त रिपब्लिकन त्यांना उपाध्यक्ष म्हणून लाभला आहे. बाकी ट्रम्प रिपब्लिकन पक्षाला जुमानतील असे वाटत नाही. चांगले-वाईट निर्णय रेटू पाहणारा स्वभाव, पराभव आणि टीका पचवायची हिंमत आणि सरतेशेवटी राष्ट्रहिताचा विचार हे भांडवल त्यांना या आव्हानात तारून नेऊ शकेलही. मात्र, अमेरिकी अध्यक्षीय कामाचा आवाका आणि जबाबदारीचा अंदाज न आल्यामुळे जनतेचा रोष, जागतिक पातळीवरची टीका, अमेरिकेची ढासळणारी प्रतिमा आणि प्रसंगी महाभियोगासारख्या गोष्टींचा सामना त्यांना करावा लागण्याची शक्‍यताच जास्त.

Web Title: Nikhil Shravage writes about Donlad Trump