‘इंद्रजाला’चा असर सरेना...

nishant pore
nishant pore

लेखणीनं लिहायचे दिवस मागे पडत आहेत, कुंचल्यानं फटकारे मारण्याची संधी कमी होत आहे. गोष्टीचं किंवा कवितेचं रेखाचित्र अथवा पुस्तकाचं मुखपृष्ठ काढायचं असेल तर पेन्सिल, रंगपेटी वगैरेची गरज उरलेली नाही. अर्थात त्यासाठी तुमच्याकडं हवा संगणक. सर्जनाच्या सगळ्या शक्‍यता संगणकामध्ये दडलेल्या आहेत. कोणत्याही ‘क्रिएटिव्ह’ तरुणातील कल्पनाशक्तीला ‘की-बोर्ड’, ‘माउस’च्या साह्यानं दृश्‍यरूपात आणण्याचं सामर्थ्य संगणकात आहे. आमच्या पिढीचा परवलीचा मंत्र बनला आहे- संगणक. ज्याला संगणक चालवायला येत नाही तो खरा ‘निरक्षर’. साहित्य क्षेत्राबाबत जसं ‘साठोत्तरी’, ‘नवदोत्तरी’ वगैरे संकल्पना वापरल्या जातात, तसं संगणकाबाबतही आहे. नवदोत्तरीत जन्माला आलेल्या आमच्या पिढीसाठी आविष्काराचं, सर्जनशीलतेचं आणि उपजीविकेचं साधनही झालाय संगणक.

संगणक हा शब्द वापरताना मी केवळ ‘डेस्कटॉप’पुरतं नाही बोलत. लॅपटॉप, टॅब, आयपॅड, स्मार्ट मोबाईल या आणि अशा अत्याधुनिक उपकरणांचा समावेश ‘संगणक’ शब्दांत करतो आहे. या पुढं आणखी नवनवी ‘उपकरणं’ येतील, पण त्याचा आत्मा संगणकाचाच असेल. उपकरणावरून आठवलं, आमच्या घरी देवपूजेच्या भांड्यांना ‘उपकरणं’ म्हणत. म्हणजे देवाच्या पूजेसाठी लागणाऱ्या पाण्यापासून फुलांपर्यंत आणि तीर्थापासून नैवेद्यापर्यंत सगळ्यांसाठी विशिष्ट उपकरणं होती. अगदी तशीच ही आमच्या पिढीची उपकरणं संगणकाच्या विविध रूपांमधून प्रकट होत आहेत.
जागतिकीकरण झालं, अर्थव्यवस्था खुली झाली, माणसाच्या वर्तन-व्यवहारात बदल झाला वगैरे म्हटलं जातं. आम्हाला त्याची माहिती आमच्या हातात असलेल्या संगणकाच्या (भले ते उपकरण कोणतंही असो) पडद्यावर मिळते. फेसबुक-इन्स्टाग्राम, व्हॉट्‌सॲप, ट्विटर या आमच्या चावड्या आहेत. आमचं भावविश्व त्यांनी व्यापून टाकलं आहे. पुस्तकं वाचण्याऐवजी आम्ही या चावड्यांवर जास्त रमतो. पण त्यातूनच अनेक नव्या कल्पना जन्म घेतात. एखादी काँमेंट किंवा कृती टेक्‍स्ट वा व्हिडिओच्या रूपात जगप्रसिद्ध होते. मग एखादीनं साधी भुवई उंचावलेली असो किंवा ‘पीछे तो देखो’सारखा मूळ किंवा टिकटॉक असो... त्यावरून अनेक गोष्टी तयार होतात. त्या व्हायरल होतात, त्याच्या गुणवत्तेनुसार चक्क अर्थप्राप्तीही होते.
पैसे मिळवण्यासाठी संगणक पुरेसा आहे. मात्र तुमच्याकडं भन्नाट कल्पकता हवी. तुम्ही पोशाख कुठला घालता, मॅचिंग आहे की नाही, पायात शूज कोणते आहेत, वगैरेला इथं वाव आणि भाव दोन्ही नाही. इंटरनॅशनल कॉन्फरन्सला टीशर्ट आणि थ्रीफोर्थमध्ये उपस्थित राहणाऱ्या मार्क झुकेरबर्गला फॉलो करणारी आम्ही मंडळी आहोत. माझी स्वतःची क्रिएटिव्हिटी बहरली ती संगणकामुळं. कोणतंही व्यावसायिक शिक्षण न घेता केवळ संगणकाशी खेळण्याच्या माझ्या सवयीमुळं व्हिजिटिंग कार्डपासून प्रचंड मोठ्या डिजिटल बोर्डपर्यंत मी काहीही साकारू शकतो, तेही कमी वेळात. कोणतंही डिझाईन आधी संगणकाच्या पडद्यावर आणि नंतर कार्डवर, कापडी फलकावर उतरवता येऊ शकतं. एखाद्या पुस्तकाचं मुखपृष्ठ, कल्पक निमंत्रणपत्रिका, एखादी माहिती उत्तम, लक्षवेधी कलाकुसरीनं साकारण्यासाठी संगणक पुरेसा आहे. पूर्वी केवळ ‘टेक्‍स्ट’साठी वापरल्या जाणाऱ्या संगणकात आता काहीही साकारता येते. तरुण पिढीचं जगणंच त्यात सामावलं आहे. माध्यम डिजिटल असो किंवा प्रिंट; सजावट हवीच असते. मार्केटिंगच्या आजच्या जमान्यात वैचारिक ‘फ्रेशनेस’बरोबर इमोशनल टवटवीतपणा लागतोच. हे सगळं संगणकात मिळतं. मग रूढ शिक्षणातील पदव्या किंवा पदव्युत्तर पदव्यांचा सोस कशाला? सतत शिकवणारी, जगवणारी, प्रतिभेला वाव देणारी शाळाच आहे संगणक म्हणजे.

हे सगळं मी का सांगतोय..? फक्त आणि फक्त नोकऱ्यांच्याच मागं लागण्यानं, त्यासाठी सामाजिक-राजकीय स्पर्धेतून कुणाचं भलं होणार आहे? नोकऱ्या किती उपलब्ध आहेत आणि त्यासाठी उमेदवार किती आहेत? तरुणाईच्या जगण्याची ही धडपड पाहिली की थक्क व्हायला होतं. संगणकाची ताकद मोठी आहे. आपल्या ‘क्रिएटिव्हिटी’वर विश्वास ठेवा. आपल्या स्वतःच्या संकल्पनेतून उतरलेली कोणतीही ‘आयडिया’ यूट्यूबवर क्‍लिक झाली, तर आपल्या बॅंक अकाऊंटमध्ये पैशांचा महापूर येतो. तुम्ही जगभरात पोचता. देश आणि भाषेचा तर प्रश्नच नाही. स्पॅनिश, जपानी, अरबी, इंग्लिश, इटालियन अशा अनेक भाषांतील गाणी लोकप्रिय होत आहेत. जग जवळ आलं आहे, संगणक तुमच्या मुठीतल्या स्मार्ट मोबाईलवरचा असो किंवा टॅबवरचा. उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरणाचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. मुद्दा आहे तो तुम्ही त्याकडं कसं पाहता याचा. मला स्वतःला कोणत्याही आविष्कारासाठी संगणक पुरेसा आहे. त्यानंच मला वाचक दिले आणि प्रेक्षकही. तज्ज्ञांची ओळख करून दिली आणि जगण्याची समजही! गरज आहे ती संगणकाला समजून घेण्याची, पाहा प्रयत्न करून!

(लेखक सोलापूरस्थित संगणकतज्ज्ञ व कलावंत आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com