मानवतेचा गीतकार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 ऑक्टोबर 2016

डिलन यांच्या गाण्यांमध्ये भाबडेपणा फारसा नव्हता, होता तो नैतिकतेचा आणि वास्तववादाचा झोंबणारा आशय. त्यांच्या गीतांतील शब्द हे अमेरिकी राजकारण तसेच समाजकारण यांना नवी दृष्टी देणारे होते आणि त्यामुळेच "जनतेचा शाहीर‘ असे यथार्थ बिरूद त्यांना लाभले.

अमेरिकेच्या महान गीतपरंपरेला सामोरे ठेवून डिलन यांनी त्यात क्रांतिकारी आशय तसेच अभिव्यक्‍तीचे नवे सूर भरले आणि समकालीन संगीतात एक नवाच बाज निर्माण केला. 

संगीताच्या मोहमयी दुनियेत गेली सहा दशके एक दंतकथा बनून राहिलेले बहुचर्चित कवी, गायक आणि संगीतकार बॉब डिलन यांना साहित्याचा सुप्रतिष्ठित "नोबेल पुरस्कार‘ जाहीर झाला आणि जगभरात निनादणारे त्यांचे शब्द आणि सूर यांना एक नवीच झळाळी प्राप्त झाली आहे. डिलन हा खऱ्या अर्थाने जमिनीवरचा गीतकार! आपल्या सभोवतालच्या जगात जे काही घडत आहे, त्यास एक आगळावेगळाच दृष्टिकोन देणारी असंख्य गीते डिलन यांनी लिहिली आणि गायलीही! ते "जनतेचे शाहीर‘ आहेत. अमेरिकेच्या महान गीतपरंपरेला सामोरे ठेवून डिलन यांनी त्यात क्रांतिकारी आशय तसेच अभिव्यक्‍तीचे नवे सूर भरले आणि समकालीन संगीतात एक नवाच बाज निर्माण केला. लोकसंगीत, रॉक-एन-रोल, जाझ असा कोणताच काव्यप्रकार त्यांनी वर्ज्य मानला नाही आणि त्यामुळेच त्यांचे शब्द आणि सूर या जगाला नवा अर्थ देऊन गेले. गेली काही दशके डिलन यांचे नाव नोबेल पुरस्काराच्या चर्चेत असे; पण तो पुरस्कार त्यांच्यापासून दूरच राहत होता, त्याचे कारण हे गाणी आणि काव्य याबाबतच्या पुरातन वादात आहे. गाणी लिहिणारा गीतकार हा "ट ला ट; र ला र‘ अशी शब्दांची जुळणी करणारा असतो, तो कवी वा लेखक असू शकत नाही, या प्रस्थापित समजाला छेद देणारा निर्णय खरे तर 1913 मध्येच रवींद्रनाथ टागोर यांना त्यांच्या "गीतांजली‘ या काव्यसंग्रहाबद्दल "नोबेल‘ देताना समितीने घेतला होता. टागोरांच्या गीतांजलीमध्येही रूढ आणि पारंपरिक काव्याच्या सीमा ओलांडून पुढे जाणारी गाणीच होती. मात्र, त्यानंतर अशीच गाणी लिहिणाऱ्याला नोबेल मिळण्यासाठी 103 वर्षे जावी लागली आहेत. 

डिलन यांना नोबेल पुरस्कार देताना संबंधित समितीने त्यांचा भरभरून गौरव केला आहे आणि तो करताना थेट अडीच हजार वर्षांपूर्वीच्या होमर तसेच सॅफो या ग्रीक महाकवींचे स्मरण केले आहे. होमरची गाणी आजही जिवंत आहेत आणि त्याने काव्य लिहिले असले, तरी त्यातील खरी गंमत आणि आशय हा ती गाणी गाताना वा ऐकतानाच उत्फुल्लपणे पुढे येतो. डिलन यांच्या गाण्यांतही नेमकी तीच गंमत आहे. या गाण्यांमधील आशय संगीताच्या साथीवर ती गायली जात असतानाच अधिक ठळकपणे अभिव्यक्‍त होतो. त्यामुळेच साहित्याच्या प्रस्थापित सीमारेषांच्या पलीकडे जाऊन आशयाची अभिव्यक्‍ती करणाऱ्या डिलन यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. डिलन यांना शाळकरी वयातच संगीताचा सूर सापडला होता आणि काव्याची गोडीही निर्माण झाली होती. शाळकरी वयात "रॉक-एन-रोल‘च्या काही बॅण्ड्‌समध्ये सहभागी होतानाच, त्यांच्या ओठांवर नव्या गाण्यांचे शब्द येऊ लागले. पुढे 1961 मध्ये विशीच्या उंबरठ्यावर असताना ते न्यूयॉर्कला वास्तव्यासाठी आले आणि त्यांचे शब्द, स्वर आणि सूर यांना नवीच अशी प्रेरणादायी पालवी फुटली. अमेरिकेसाठी ते दशक अस्वस्थतेचे दशक होते. देशात युद्धप्रेमाच्या ज्वराची साथ पसरली होती. अशा त्या अनिश्‍चिततेच्या काळात डिलन यांनी युद्धविरोधातील जनतेच्या एका मोठ्या समूहाच्या मनातील भावनांना केवळ शब्दच नव्हे, तर सूरही दिला. अमेरिका हा मुळात बहुसांस्कृतिक देश! जगभरातून तेथे वास्तव्यासाठी आलेल्या विविध सामाजिक प्रेरणांनी तो समाज कायमच फुलून गेलेला असतो. त्यामुळेच तेथील संगीत हेही असेच नवी ऊर्जा आणि उमेद घेऊन पुढे येत असते. त्याच उमेदीतून डिलन गाणी लिहीत गेले आणि अल्पावधीतच ती जगभरात गायली जाऊ लागली. 

डिलन यांच्या गाण्यांमध्ये भाबडेपणा फारसा नव्हता, होता तो नैतिकतेचा आणि वास्तववादाचा झोंबणारा आशय. त्यांच्या गीतांतील शब्द हे अमेरिकी राजकारण तसेच समाजकारण यांना नवी दृष्टी देणारे होते आणि त्यामुळेच "जनतेचा शाहीर‘ असे यथार्थ बिरूद त्यांना लाभले. काळ हा सतत प्रवाही असतो आणि या बदलत्या काळातून उमलत जाणाऱ्या भावना आणि आशय यांची अखेर जाणीव झाल्यामुळेच त्यांना हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे आणि "टाइम्स दे आर ए-चेंजिंग!‘ हे त्यांनी काही दशकांपूर्वी लिहिलेल्या गीताचे शब्द कसे भविष्याचा वेध घेणारे होते, यावरही शिक्‍कामोर्तब झाले आहे! 

Web Title: Nobel prize in literature won by Bob Dylan