जीवनगाणे (श्रद्धांजली)

संभाजी गंडमाळे
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

काय होता रजनीताईंचा आजवरचा सांगीतिक प्रवास? मोठ्या जिद्दीने त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले. संगीतात विशेष आवड असल्याने त्यांच्या घरी प्रत्येक आठवड्यात संगीत मैफल जमायची. सातवीला असल्यापासूनच त्यांनी गाण्याला आपलसं केलं

ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांचं शनिवारी दुपारी निधन झालं आणि कोल्हापुरातील प्रसिद्ध गायिका रजनी करकरे-देशपांडे यांनी त्यांच्याच "होत्या आता तर सोसाट्याच्या लाटा' या काव्यरचनेने त्यांना काव्यांजली वाहिली. त्याचा ऑडिओ त्यांचे पती पी. डी. देशपांडे यांनी शनिवारी रात्री दहाच्या सुमारास सोशल मीडियावर सगळ्यांसाठी पाठवला. रजनीताईंचे स्वर साऱ्यांच्या कानात रुंजी घालत असतानाच रात्री पाऊणेबाराच्या सुमारास पुन्हा त्यांचीच पोस्ट पडली, ""माय बिलव्हड्‌ रजनी एक्‍स्पायर्ड ऍट 11.15 पीएम....' . रजनीताई आजारी होत्या हे साऱ्यांनाच माहिती होतं. पण, अशा एकापाठोपाठ एक पोस्टनी साऱ्यांनाच धक्का बसला.

काय होता रजनीताईंचा आजवरचा सांगीतिक प्रवास? मोठ्या जिद्दीने त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले. संगीतात विशेष आवड असल्याने त्यांच्या घरी प्रत्येक आठवड्यात संगीत मैफल जमायची. सातवीला असल्यापासूनच त्यांनी गाण्याला आपलसं केलं. चौदा वर्षे त्या गुरूंकडून गाणं शिकल्या. 1967 पासून त्यांनी आकाशवाणीवर गायला सुरवात केली आणि अल्पावधीतत "रेडिओस्टार' म्हणून त्या सर्वपरिचित झाल्या. शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, ठुमरी, सुगम संगीताचे त्यांनी कोणत्याही प्रकारची परीक्षा न देता शिक्षण घेतले. "आनंदाचे डोही' हा त्यांचा कार्यक्रम केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात गाजला. "दैवत', "वरात', "हे दान कुंकवाचे' आदी चित्रपटासाठी त्यांनी पार्श्‍वगायनही केले.

त्यांचा जन्म 1942 चा. वयाच्या पाचव्या वर्षी 14 ऑगस्ट 1947 च्या रात्री त्यांना पोलिओ झाला. हा एक मोठाच आघात होता. मात्र त्या अजिबात खचल्या नाहीत. त्यांची जिद्द होतीच, त्याला कुटुंबीयांच्या प्रोत्साहनाची जोड मिळाली आणि आकाराला आली एक उत्तम सांगीतिक कारकीर्द. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. त्या पुरस्कारांच्या रकमेतून त्यांनी सुचित्रा मोर्डेकर यांच्या बरोबरीने "कलांजली' संस्थेची स्थापना केली. या संस्थेतून अभिजीत व प्रसेनजित कोसंबी असेल किंवा शर्वरी जाधव असे नव्या दमाचे गायक घडले. नसीमा हुरजूक यांच्याबरोबरीने "हेल्पर्स ऑफ हॅंडिकॅप्ड' संस्थेची स्थापनाही त्यांनी केली. संस्थेच्या उपाध्यक्षा म्हणून त्या कार्यरत होत्या. "हेल्पर्स' आणि "कलांजली'चे क्‍लासेसच त्यांचं जगणं बनून गेलं. अर्थात पती पी. डी. देशपांडे यांनीही त्यांना अतिशय मोलाची साथ दिली, हेही नमूद करायला हवे.या सगळ्यामुळेच त्यांची वाटचाल हे सुरेल जीवनगाणं बनलं.

Web Title: obituary