भाष्य : राजनैतिक प्रयत्नांची आस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Russi Ukrain war

रशियाच्या अपेक्षेपेक्षा जास्त काळ युक्रेनबरोबरचे युद्ध लांबले आहे. कूटनीती आणि मुत्सद्देगिरी या दोन्हीही आघाड्यांवर रशियाचे धोरण फसले आहे.

भाष्य : राजनैतिक प्रयत्नांची आस

- ओंकार माने

रशियाच्या अपेक्षेपेक्षा जास्त काळ युक्रेनबरोबरचे युद्ध लांबले आहे. कूटनीती आणि मुत्सद्देगिरी या दोन्हीही आघाड्यांवर रशियाचे धोरण फसले आहे. मात्र, या युद्धाचे परिणाम या दोन्हीही देशांसह जगाला भोगावे लागत आहेत. त्यावर चर्चा आणि समेट हेच उपाय आहेत. त्यासाठी महत्त्वाचे आहे ते विश्‍वासार्हतेचे वातावरण.

महाशक्ती असलेल्या देशाला एखादे युद्ध खूप सोपे वाटते, पण प्रत्यक्षात ते अवघड आणि त्रासदायक होते, याचा प्रत्यय अमेरिकेला व्हिएतनाम युद्धादरम्यान आला होता. आता तोच इतिहास पुन्हा लिहिला जाण्याची शक्यता आहे. रशियाचा युक्रेन संघर्षात दररोज घाम निघत आहे. मुळात युक्रेनला कमी लेखणे ही रशियाची मोठी चूक ठरली. पुतीन यांची कूटनीति आणि मुत्सद्देगिरी सपशेल फसलेली आहे. येत्या काही दिवसांत रशियाला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. या युद्धामुळे वाढणारी देशांतर्गत नाराजी थोपविण्यासाठी पुतीन येत्या काळात कोणती पावले उचलतात यावर बरंच अवलंबून आहे. युक्रेनबरोबरील युद्धाला आता नऊ महिने पूर्ण होतील. याचा विपरित आर्थिक परिणाम रशिया भोगत आहे. दुसरीकडे जगालाही फटके बसत आहेत. त्यामुळे आता खरी गरज आहे, ती प्रभावी राजनैतिक प्रयत्नांची. पाश्‍चात्त्य देशांतून भारताकडे या बाबतीत अपेक्षेने पाहिले जात आहे.

ज्या काही वाटाघाटी होतील, त्यात युक्रेनला समाविष्ट करायला हवे. युद्ध थांबावे, यासाठीचा रेटा तयार का होत नाही, हा प्रश्‍न आहे. युरोपीय समुदायाची या प्रश्‍नावरील एकसंघ भूमिका तयार होताना दिसत नाही. हे युद्ध भविष्यात कोणत्याही मार्गाने गेले तरी त्यामुळे जागतिक राजकारणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे कोणताही विचार अथवा धोरण न ठरवता तसेच या युद्धाचा शेवट कसा करायचा याचा कोणताही विचार न करता रशियाने युद्ध आरंभले. बहुधा, पुतीन यांनी गृहीत धरले होते की, युक्रेनचा प्रतिकार त्वरित कोलमडेल किंवा युक्रेनची जनता रशियन सैन्याचे स्वागत करील. मात्र, दोन्हीपैकी काहीही घडले नाही. उलट, रशियाच्या आक्रमणाने युक्रेनच्या राष्ट्रवादाला बळकटीच मिळाली.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून, युक्रेनचे पश्चिमेकडील प्रदेश ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्याचा भाग होते; तर पूर्वेकडील रशियामधील रोमनोव्हच्या अधीन होते. सोव्हिएत महासंघाचा भाग असताना युक्रेनमध्ये ८० टक्के रशियन भाषिक, तर केवळ १७.३ टक्के युक्रेनियनवंशीय रशियन आहेत. डोनबास प्रदेशात, रशियन लोकांची संख्या सर्वाधिक असताना, डोनेस्तकमध्ये ३९ टक्के आणि लुहान्स्कमध्ये ३८.८ टक्के असे अजूनही मोठे अल्पसंख्याक गट आहेत.

रशिया आणि पूर्वीच्या सोव्हिएत महासंघामधील अशा दोन्ही प्रशासकीय विभागांमध्ये युक्रेनची लोकसंख्या सुमारे ५७ टक्के आहे. रशियन वंशाचे आणि रशियन भाषिक लोक युक्रेनच्या पूर्व आणि दक्षिणेकडे प्रबळ आहेत. परंतु उर्वरित युक्रेनमध्येही त्यांची काही प्रमाणात उपस्थिती आहे. पण यामधील बहुतांश जनता, डोनबासमधील ‘नियंत्रित’ भागातील जनताही युक्रेनमध्ये राहण्याच्या मनस्थितीत आहे, हीच रशियाची अडचण आहे. युक्रेनमधील नागरी अशांतता आणि निदर्शनांची युरोमायदान चळवळ आणि युक्रेनमधून यानुकोविचच्या पलायनामुळे, युक्रेनच्या राजकारणातील महत्त्वाचे असलेल्या डोनबास प्रदेशाचे केंद्रस्थान संपुष्टात आल्याने रशियन वंशीय नाराज झाले होते.

युक्रेनमधील वांशिकता आणि प्रादेशिकतेच्या जटिल खेळात, काही लोकांकरता प्रादेशिक आणि रशियन वंशाची अस्मिता एकत्रित येऊन युक्रेनपासून डोनबास वेगळे करण्याच्या उद्देशाने प्रादेशिक बंडखोरी बळकट झाली. यात डोनबासमधील रशियनांच्या ‘संरक्षणा’साठी फुटीरतावाद्यांना गुप्त लष्करी मदतीद्वारे हस्तक्षेप करण्याची संधी रशियाला दिसली. याच भरवशावर युद्ध सुरू केले. २०१४ मध्ये, डोनेस्तक आणि लुहान्स्क येथील रशियन समर्थक फुटीरतावाद्यांनी रशियामधील आणि पूर्वीच्या सोव्हिएत महासंघामधील प्रशासकीय विभागांना ‘स्वतंत्र लोकांचे प्रजासत्ताक’ म्हणून घोषित केले. तर २०१४ आणि २०१५मधील मिन्स्क करार आणि मिन्स्क द्वितीय करार याद्वारे अनुक्रमे फ्रान्स आणि जर्मनीने रशिया आणि अमेरिकेसह सर्व संबंधितांच्या मदतीने युक्रेनमधील यादवी संपवण्यासाठी प्रयत्न केला. परंतु चर्चेत कोणताही पक्ष प्रामाणिक नव्हता. करार कोलमडला. फुटीरतावाद कायम राहिला.

नुकसान सगळ्यांचेच

या युद्धाच्या समस्येचे मूळ नाटोचा सामना करताना रशियाला वाटणाऱ्या असुरक्षिततेच्या भावनेत आहे. वास्तविक स्वतंत्र आणि सार्वभौम देशाला कुणाशी मैत्री करायची हे निवडण्याचा अधिकार आहे. त्या आधारावर जर एखाद्या देशाने ‘नाटो’मध्ये जाण्याचा निर्णय घेतला तर त्याला कोणीही प्रतिबंध करू शकत नाही. त्याच वेळी, रशियाचा पर्याय मर्यादित करून युरोपमधील शांतता जपण्याची जबाबदारी खरेतर पाश्चिमात्य राष्ट्रांची होती. सोव्हिएत महासंघाच्या विघटनानंतर गेल्या ३० वर्षांत महत्त्वपूर्ण बदल घडवून आणलेल्या पश्चिमेकडील रशियाला अंकित बनवले आहे का? तसे झाल्यास, युक्रेनच्या प्रतिकार युद्धाचे समर्थन करतानाही रशियाच्या तक्रारींच्या निराकरणासाठी त्यांनी प्रभावी राजनैतिक मार्ग अवलंबायला हवा. काही धोरणांना चालना देण्यासाठी निर्बंध हे कधीही यशस्वी साधन नव्हते. आजच्या जागतिकीकरणात शत्रूला दुखावताना, निर्बंध घालणाऱ्या सत्तांचेही नुकसान करतील. युरोपीय महासंघातील राष्ट्रे मोठी किंमत मोजत हा धडा शिकत आहेत.

दुसरीकडे अशी स्पष्ट चिन्हे आहेत की, पुतीन यांचा रशिया त्याच्या शेजारच्या विशिष्ट गटांशी संबंधित लोकसंख्येचा फायदा उठवत शक्य तितक्या पूर्वीच्या सोव्हिएत प्रदेशांमध्ये पुनर्प्रस्थापित होण्याच्या हेतूने- रशियाच्या सीमांचा विस्तार करण्याचा प्रयत्न करीत आहे. क्रिमिया, जो १८व्या शतकाच्या अखेरीस ८४ टक्के क्रिमियन तातार लोकसंख्येचा प्रदेश होता, तो रशियन सम्राज्याचा भाग बनला. नंतर तो युक्रेनचा भाग होता. २०१४ पर्यंत, क्रिमियामध्ये ६८ टक्के रशियन वंशाचे आणि ८० टक्क्यांहून अधिक रशियन भाषिक होते. रशियाच्या आक्रमणाचे ध्येय हे कीवमधील सत्ताबदलाच्या दिशेने असू शकते. रशिया तिथे कठपुतळी सरकार स्थापण्याच्या प्रयत्नात आहे.

परंतु रशियासाठी सत्ताबदल हा आता अजिबातच सोपा पर्याय राहिलेला नाही, जोपर्यंत त्यांचे भूदल कीववर पूर्णपणे कब्जा करीत नाही तोपर्यंत ते अयशस्वी ठरत आहे. म्हणूनच, रशिया हवाई बॉम्बस्फोटद्वारे युक्रेनची राजधानी भुईसपाट करण्यासारखा पर्याय स्वीकारू लागला आहे. डोनबास हे आग्नेय युक्रेनमधील औद्योगिक आणि खाणक्षेत्राचा भाग आपल्यामध्ये कायमस्वरूपी सामील करण्याचा रशियाचा उद्देश आहे. या प्रदेशाने एकेकाळी सोव्हिएत महासंघाच्या औद्योगिकरणात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याला तोडून रशिया युक्रेनला कमकुवत करू पाहतोय.

युद्धात युक्रेनच्या सैनिकांनी तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराने रशियन सैनिकांची डोकेदुखी वाढवली आहे. अनेक डेटिंग ॲपद्वारे रशियन सैनिक आयतेच जाळ्यात अडकले आणि त्यांचा ठावठिकाणा युक्रेनला लागला. व्हिएतनाम युद्धात अमेरिकेला तेथील भूप्रदेशाची फारशी माहिती नव्हती. त्यामुळे व्हिएतनामच्या सैनिकांनी त्यांना जेरीस आणले. इकडे रशियन सैनिकांचा संपूर्ण ठावठिकाणा लोकेशन मॅपिंगद्वारे मिळाल्याने युक्रेनला हे युद्ध सोपे ठरले आहे. जर रशियाने अणूयुद्धाचा शेवटचा पर्याय स्वीकारला तर तो जगावर भयानक परिणाम करणारा ठरेल. तसेच रशियाने बळकावलेला प्रदेश येत्या काळात युक्रेन पुन्हा मिळवू शकतो का? जरी पुन्हा मिळवला तरी त्यामुळे रशियाचे समर्थन लाभलेली बंडखोरी संपुष्टात येऊन युद्ध संपेल का? या प्रश्नांचे उत्तर प्रभावी राजकीय कूटनीतीत दडले आहे.

(लेखक जागतिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)