उत्कंठा अन्‌ कौशल्याचा कळस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

सर्वोत्तम खेळासाठी शंभर टक्के तंदुरुस्ती कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे या दोघींमधील लढत होती. अर्थात, याच आघाडीवर ओकुहाराने बाजी मारली आणि सिंधूला पुन्हा एकदा महत्त्वाच्या स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले

एखाद्या सामन्याने प्रेक्षकांना एकाच जागेवर खिळवून ठेवणे म्हणजे काय, असे कुणी विचारले, तर जागतिक बॅडमिंटन अजिंक्‍यपद स्पर्धेत नोझोमी ओकुहारा आणि पी. व्ही. सिंधू यांच्यातील महिला एकेरीच्या अंतिम लढतीचे उदाहरण देता येईल. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या "प्रो-कबड्डी'चा सामना, भारत-श्रीलंका एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना आणि जागतिक बॅडमिंटन स्पर्धेची महिला एकेरीची अंतिम लढत ही क्रीडारसिकांसाठी रविवारी एक मेजवानीच होती. बॅडमिंटनची लढत लवकर संपेल आणि अन्य दोन्ही सामन्यांचा आनंद घेता येईल, असेच त्यांना वाटले होते. पण, तसे झाले नाही. ओकुहारा आणि सिंधू यांच्यातील सामना इतका रंगला, की स्टेडियममध्ये आणि टीव्हीसमोर बसलेले प्रेक्षक एक सेकंदही जागा सोडायला तयार नव्हते. एरवी बॅडमिंटनच्या एकेरीच्या लढती 29, तर कधी 34 मिनिटांत, फार तर एका तासात संपतात. बॅडमिंटनमध्ये फार तर महिलांच्या दुहेरीच्या लढती लांबलेल्या आहेत. पण, एकेरीची लढत इतकी म्हणजे जवळपास दोन तास कधीच लांबलेली नव्हती. दोघी सहजासहजी हार मानायला तयार नव्हत्या. त्यांच्यात वरचढ कोण हेही कुणाला सांगता येणार नाही, इतका त्यांचा खेळ तुल्यबळ होता. उत्कंठा, चुरस आणि कौशल्य या सगळ्याची परिसीमा या लढतीने ओलांडली होती. विशेष म्हणजे थेट प्रसारण करणाऱ्या कॅमेरामननाही आपले कौशल्य पणाला लावावे लागले. क्रॉस कोर्ट, स्मॅश, ड्रॉप, टॉस असा बॅडमिंटनच्या पुस्तकातील एकही फटका नव्हता, की जो या लढतीत खेळला गेला नाही. थोडक्‍यात परिपूर्ण खेळाचे प्रदर्शनच ओकुहारा आणि सिंधू यांनी सादर केले. दोघींमध्ये झालेल्या रॅली बघितल्यावर ती पूर्ण होताना कुणाचाही गुण गेला तरी हळहळ वाटत होती.

दुसरी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तंदुरुस्ती. सर्वोत्तम खेळासाठी शंभर टक्के तंदुरुस्ती कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे या दोघींमधील लढत होती. अर्थात, याच आघाडीवर ओकुहाराने बाजी मारली आणि सिंधूला पुन्हा एकदा महत्त्वाच्या स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. सुवर्णपदकापर्यंत पोचूनही सिंधूला पुन्हा रौप्यपदकच मिळाले याची खंत भारतीयांना निश्‍चितच वाटेल. पण, उत्कंठा आणि कौशल्याची परिसीमा ओलांडणारी ही लढत पाहून क्रीडाप्रेमी नक्कीच सुखावले असतील यात शंकाच नाही.

Web Title: p v sindhu