स्लाइम्स (पहाटपावलं)

आनंद अंतरकर
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

भोवतालचं सारं वातावरण आणि एकूण जगणंच जिथं सैराट झालंय, तिथं जुनं काही कर्णमधुर संगीत ऐकणं किंवा चांगल्या गाण्याचे शब्द ओठा-मनात खेळवणं ही गोष्ट काय टिकणार? चांगल्या-वाईटातला फरक कळण्याची संवेदनशीलता आणि लालित्य आम्ही केव्हाच गमालं आहे. आमच्या शरीरात आणि काळजात आता नुसती हाडं आणि मासांचे निर्जीव भावविहीन गोळे उरले आहेत. जे जे निःसत्त्व, निकस आणि निरर्थक ते ते आम्ही स्वीकारणार. आमची ग्रहणशक्ती कितीही दुबळी झाली असली, तरी आम्हाला कोणी काही शिकवू नका. आम्हाला बोल लावू नका. धांगडधिंगा, धमाल, धेडगुजरी, धुडगूस, धमाका हीच आमची जगण्याबाबतची "ध'ची बाराखडी किंवा धारणा. आमच्या नादाळीत कुणी पडू नका. तुमचं तुम्ही जागा, आमचं आम्ही जगतो. तुमच्या अभिजाततेची वळकटी बांधून तुमच्या जवळच ठेवा. उगीच जुन्या सुरातालांचं नि प्रासादिक वगैरे काव्याचं आम्हाला सांगू नका. मरोत तुमच्या त्या बुरसटलेल्या कल्पना आणि विचार ! आता नव्या काळात तुम्ही स्वतःला वगळलेलंच बरं !...

नागोठण्यापासून जवळच कुडालेणी आहेत. थोड्याच गुंफा; पण त्यातली सुंदर, आकारबद्ध शिल्पं प्रेक्षणीय आहेत. आम्ही ती पाहायला गेलो. लेण्यांच्या समोरच अथांग निळ्याशार समुद्राचं मुग्ध दृश्‍य चैतन्यामय. मुक्तस्वैर लहरींवर जीव तरंगत ठेवणारं. आसमंतातल्या शांत-नीरव वातावरणामुळे निसर्ग किती खुलून येतो. अशी दृश्‍य पाहताना आपणही जेणतेपणी अंतर्मुख होऊन जातो. त्या शांततेला एक अनाहत स्वर लाभलेला असतो. शांततेचं जणू ते वैभवसंपन्न वैखरीतलं प्रवचनच असतं. पण ही परमोच्च समाधानाची अनुभूती मिळायला तुमच्याजवळ प्रारब्ध नावाची चीज असावी लागते. ती तुमच्या हाती थोडीच असणार?...
असंच एक तरुणतरुणींचं टोळकं आलं. सगळ्या अद्ययावत सरंजामासह त्यांचं आगमन बार्बेक्‍यूची शेगडी, भारी स्पीकर्सची म्युझिक सिस्टीम, बाटल्या (कसल्या ते सांगायला नकोच), ग्लासेस, मृत कोंबड्यांचे अवयव... सारं सारं पद्धतशीर. साग्रसंगीत.

हळूहळू त्या तरुणांची "बैठक' जमली. हिंदी-मराठीतल्या आचरट फिल्मी संगीताचे स्वर हवेत उंच उडू लागले. पेले भरले जाऊ लागले. "डान्स'च्या नावाखली हिडीस शारीरिक हालचाली नि हावभाव. उत्तान, भडक, चेकाळलेल्या आकृती. धुंद, बेहोष, विधिनिषेधहीन ज्वानीचा उमाडा. सार्वजनिक ठिकाणी पर्यटकांना सुख लागू न देणारी, त्यांच्या शांत आस्वादावर घाला घालणारी नवी जमात आता सर्वत्रच फोफावत चालली आहे. या जमातीला आता कसलीही बंधनं नकोत. सार्वजनिकतेचं भान नको. आनंदकता हाच गुण आता जिकडे तिकडे फोफावत चाललाय. दुसऱ्याचा विचार नको. या अशा गोष्टी आता सर्रास घडू लागल्या आहेत. तुमच्या हक्काला आणि स्वातंत्र्याला विचारतो कोण?

आम्ही कुडलेण्यांतली शिल्पं बारकाईनं निरखली. गुंफा अंधाऱ्या होत्या, तरीही अज्ञात हातांच्या छिन्नी-हातोड्यांतून उतरलेली रेखीव शिल्पं नजरेत भरली. मधेच एक गडद काळोखी गुंफा होती. तीत असंख्य वटवाघळांची वस्ती. थोडं आत विष्ठेचा अनिर्बंध उग्र दर्प. नवल आणि बरीचशी खंत बरोबर घेऊन बाहेर आलो.
आतलं जग फारच गूढ, भयावह आणि घृणास्पद होतं. पण त्याचंच या नवतरुणांना आकर्षण वाटलं. गटागटानं ती सारीजणं अतीव कुतूहलानं वटवाघळं पाहायला पळाली. शिल्पांच्या गुफांकडे कुणाचंच लक्ष गेलं नाही. त्यात त्यांना रस नसावा.

किंवा ते तेवढं महत्त्वाचं वाटलं नसावं, अचकट-बिचकटपणाला मात्र उधाण आलेलं.
"स्लाइम' नावाचं एक नवं चायनीज खेळणं सध्या मुलांमध्ये खूप बोकाळलं आहे. हे "स्लाइम' म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. साधा जेलीसारखा, कसाही हातात धरला नि फिरवला तरी हाताला न चिकटणारा एक लिबलिबीत गोळा. निर्गुण. निराकार. निर्विकार मनात विचार आला. आता आम्हा माणसांचेही दिवसेंदिवस "स्लाइम्स' होत चालले आहेत. निर्देह, संवेदनहीन थंड, आकारहीन गोळे !

Web Title: pahat pavale by antarkar