पहाटपावलं- मनावरच्या बेड्या

डॉ. सपना शर्मा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

"तुम्ही फारच भाग्यवान आहात. तुम्हाला आयुष्यात जे हवे ते तुम्ही सगळंच करता.' आय सर्जन, एअर होस्टेस, मिसेस इंडिया, काउन्सेलर, लेखक अशा माझ्या भिन्न-भिन्न उपक्रमांबद्दल कळल्यावर लोक मला हमखास भाग्यवान, लकी ठरवून पुढे स्वतःबद्दल हळहळतात. "मलाही अमूक करायचं आहे किंवा होतं, पण ते कसं शक्‍य नाही' हे पटवून देण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा माझ्या मनात पहिला प्रश्न नेहमी एकच असतो - "हे मला पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत की स्वतःलाच?'
कारण त्यांनी अगदी जिवापाड जपलेलं ते कारण मला तरी दुर्घट भासत नाही. पण सांगणारा मात्र जीव ओतून मला ते पटवून देण्याच्या प्रयत्नात असतो, की त्याचं एक तर नशीब खराब आहे किंवा कुठल्यातरी दडपणामुळे त्याची अवस्था फार दयनीय आहे आणि त्याला हवं असलेलं आयुष्य तो जगूच शकत नाही.

पण एक पाय गमावल्यावर पदरात एकही पैसा नसलेला नागपूरचा अशोक मुन्ने हिमालय सर करतो, दुर्गम अशा खोल दऱ्यांमध्ये पर्यटकांना नेतो आणि चालत्या मोटारसायकलवर उभं राहून स्टंट करतो, हे माहीत असल्यानं मला कुणाचंही कुठलंही कारण इतकं मोठं नाही वाटत, की ज्यामुळे कुणी आपली स्वप्नं पूर्णपणे सोडून द्यावीत. तरीही बहुतांश व्यक्तींची स्वप्नं अपुरीच राहतात. याचं कारण आहे समाजानं आपल्या मनावर अडकवलेल्या बेड्या. वर्षानुवर्षं निराशावादी व्यक्ती प्रत्येक बाबतीतील आपले नैराश्‍य दुसऱ्यांनाही देत असतात. तुम्ही काहीही वेगळं, मोठं किंवा चांगलं करायचं ठरवलं, की "अरे, हे कसं शक्‍य आहे?' "आपल्यासारख्यांनी असल्या भानगडीत पडू नये', "तोंडघशी पडशील तेव्हा समजेल', "सगळे करतात तशी नोकरी कर', "ते मोठ्या लोकांचं काम आहे, आपल्याकडं पैसा काही झाडावर नाही उगवत'... बहुतांश असेच सांगणारे भेटतात, आणि ही मंडळी हळूच आपल्या मनावरच नव्हे, तर आपल्या उत्साहावर आणि आपल्या हिमतीवरही बेड्या चढवून जातात.

मी शिकलेलं सत्य हे की कुठल्याही परिस्थितीत कुठलीही गोष्ट अशक्‍य नाही. फक्त गरज आहे ती आत्मविश्वासाने संशोधन करून, योग्य मार्गदर्शन घेऊन, संयमपूर्वक आपल्या ध्येयाकडे एक एक पाऊल टाकण्याची.
यापुढे आपली स्वप्नं केवळ त्यांनाच सांगा, ज्यांचा आयुष्याच्या चमत्कारांवर विश्वास आहे. आपल्या स्वप्नांवर विश्वास असेल, तर त्यांना पूर्ण संधी दिल्याशिवाय सोडू नका. जुन्या बेड्या उतरवून फेका आणि कुणालाही तुमच्या मनावर नव्या बेड्या चढवू देऊ नका.

Web Title: pahat pavale by sapna sharma

टॅग्स