वेष जरी बावळा... (पहाटपावलं)

शेषराव मोहिते
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

आपल्या लहानपणी जे शिक्षक शाळेत शिकवायला असतात, त्यांच्याच ठळक आठवणी पुढे आयुष्यभर कायम राहतात. भोवतालचं जग कळण्यापूर्वीचा तो काळ असतो आणि हे जग आपणास त्या शिक्षकांमार्फत थोडं थोडं कळू लागतं. पुढे आपण वयाने वाढत जातो.

जगदेखील नको तितकं कळायला लागतं - तिथं भेटणाऱ्या शिक्षकांचीही गरज आपणास तेवढी वाटत नाही. त्यामुळे त्यांच्या आठवणीही तेवढ्या घट्ट नसतात. पण शालेय जीवनात भेटलेल्या शिक्षकांबाबत वेगळेच असते. त्या शिक्षकांचं वागणं, बोलणं, त्यांचं शिकवणं, त्यांचं रागावणं, मारणं, त्यांचं राहणीमान सगळंच्या सगळं लख्ख आठवतं.

बलसूरच्या प्राथमिक शाळेतील आमचं सातवीचं वर्ष सुरू झालं होतं. शाळा आठवीपर्यंत. आमच्या मुख्याध्यापकांची बदली शेजारच्या एकुरगा इथं झाली अन्‌ तिथले मुख्यध्यापक इथं आले. आधीचे मुख्याध्यापक झकपक राहणारे, सोनेरी काड्यांचा चष्मा, केसांचा व्यवस्थित भांग पाडणारे, पॅंट-मनिला, कोल्हापुरी चपला घालणारे. कधी कुणावर रागवायचे नाहीत की मारायचे नाहीत. आपलं काम भलं, आपण भलं अशी त्यांची एकंदरीत वृत्ती. त्यांचं फक्त आडनावच आम्हाला ठाऊक. शेळके. त्यांच्या नेमका उलटा स्वभाव असणारे नवीन हेडमास्तर. नारायण दामोदर किरकोळ अशी स्वतःच्या नावाची भारदस्त पाटी आम्ही त्यांच्या टेबलावर पाहिली. कधीच इस्त्री न केलेला धुवट हरकचा नेहरू शर्ट. तसंच धोतर. डोक्‍यावर टोपी. पायात जोड्याच्या आकाराचे बूट. खांद्यावर लटकवलेली छत्री आणि हातात पिशवी. दहा-बारा कि.मी. अंतरावरील गुंजोटीहून ते रोज जाणं-येणं करायचे.

सकाळी शाळेत सर्वांत आधी तेच पोचलेले असायचे. जाड भिंगाच्या चष्म्यातून भेदक नजरेनं सर्वत्र पाहायचे. स्वभाव जमदग्नीचा अवतार. शाळेची प्रार्थना झाल्यावर वेताची छडी घेऊन व्हरांड्यात उभे राहिले, की उशिरा येणाऱ्या पोरांची धडगत नसायची. एके दिवशी गावच्या पाटलाचा पोरगा उशिरा आला आणि हेडमास्तरांचा मार चुकावा म्हणून गुपचूप येऊन वर्गात बसला. पाठोपाठ शिव्यांची लाखोली वाहत हेडमास्तर वर्गात आले. "घरून वेळेवर निघणं होत नसेल तर कशाला येतोस शाळेत?' म्हणून त्याचं बखोट धरून उचललं अन्‌ फरशीवर आदळलं. तो पोरगा अंग आक्रसून रडत बसला. पुढे मकर संक्रांतीचा दिवस उजाडला. एकुरगा इथल्या शाळेतील मुलं पाच कि.मी. अंतर एका रांगेत चालत येऊन किरकोळ गुरुजींना तिळगूळ देऊन पायावर डोकं ठेवायला लागली, तेव्हा कळलं हे प्रकरण वेगळं आहे. ते बघून आम्हीही निघालो एकुरग्याला, तर आम्हाला बघून शेळके गुरुजींची अवस्था अवघडल्यासारखी झाली.

पुढे वर्षा-दोन वर्षांतच बलसूरला खासगी हायस्कूल सुरू झालं. भाऊसाहेब बिराजदार आणि दत्तात्रय पटवारी यांनी ते हायस्कूल काढलं, तरी पडद्यामागं राहून किरकोळ गुरुजींनी जिवापाड मेहनत त्यासाठी घेतली हे आम्हाला खूप नंतर कळलं. हायस्कूलचं समृद्ध ग्रंथालय आमच्यासाठी उपलब्ध करून देणं हेदेखील त्यांचंच श्रेय. मी एकदा एका लेखात त्यांचा उल्लेख केला, तर त्यांच्या गावचे त्यांच्या नात्यातील एक गृहस्थ म्हणाले, "अरे! ते किरकोळ एवढे मोठे होते? आम्ही तर सर्वजण त्यांना गावंढळच समजत होतो!' असो. अशाच "गावंढळ' माणसांनी एकेकाळी महाराष्ट्र घडविला, हे विसरता कामा नये.

Web Title: pahat pavale by sheshrao mohite