इंजिनाचं वेड (पहाटपावलं)

शेषराव मोहिते
बुधवार, 24 मे 2017

धडपडत गर्दीतून मुसंडी मारून विस्फारल्या डोळ्यांनी आपण ते इंजिन बघतो, तेव्हा असलं 'बेस्टच्या बेस्ट' इंजिन आपल्या विहिरीवर कधी बसवलं जाईल म्हणून आपण अधीर होऊन जातो. मोट ओढून अकाली वृद्धत्व आलेल्या बैलांची आपणास कीव येते.

गावातील एखाद्याच्या मळ्यातील विहिरीवर बसविलेल्या डिझेल इंजिनाचा क्षण आठवतो? शाळेच्या वाटेवरच ती बातमी समजते आणि आपलं मन सैरभैर होऊन जातं. उभ्यानंच दप्तर घरात फेकून आपण बांधांवरील काट्या-कुपाट्यांची पर्वा न करता, आडवाटेने त्या मळ्याकडं धावत सुटतो. वाटेत एखादं चावरं कुत्रं पाठलाग करतं. त्यानं आपला सदरा फाडला वा पायाला चावा घेतला तरी त्याचं भान आपणास राहात नाही. त्या विहिरीवर आपण पोचतो, तेव्हा अर्धाअधिक गाव तिथं गोळा झालेला असतो. धडपडत गर्दीतून मुसंडी मारून विस्फारल्या डोळ्यांनी आपण ते इंजिन बघतो, तेव्हा असलं 'बेस्टच्या बेस्ट' इंजिन आपल्या विहिरीवर कधी बसवलं जाईल म्हणून आपण अधीर होऊन जातो. मोट ओढून अकाली वृद्धत्व आलेल्या बैलांची आपणास कीव येते. मोट ओढताना खांद्यात शिवळ रुतून झालेल्या जखमा अन्‌ त्यामुळे बैलांना होणाऱ्या असह्य वेदना आपणास अस्वस्थ करतात.

एकदाचं आपल्याही विहिरीवर इंजिन येतं, अन्‌ त्या मरणांतीक यातनातून बैलांची सुटका होते. त्यांच्या अंगावर पुन्हा तकाकी येते. त्यानंतर आपल्या शेतात आलेले कोणतेच बैल असे पुन्हा अकाली म्हातारे होत नाहीत. उलट पायाने माती उकरत शिवारभर डुरकत हिंडण्यापर्यंत त्यांची मजल जाते. त्यातीलच एखादा बैलांच्या टकरीत अजिंक्‍य ठरतो अन्‌ वाजत-गाजत काढलेली त्याची मिरवणूक आठवली म्हणजे आपण अनेक वर्षे आनंदानं तरंगत राहतो.

मळ्यात इंजिन आलं, तेव्हा त्यानं सोबत काय काय नवीन आणलेलं असतं? आ. बा. पाटलांचं 'शेतकरी' मासिक येतं. 'कल्याणसोना' अन्‌ 'सोनालिका' या गव्हाच्या जाती आलेल्या असतात. फवारणी यंत्र अन्‌ धूरकणी यंत्र, रासायनिक खतं येतात. इंजिनच्या पाइपवाटे येणारा पाण्याचा प्रवाह आधीच्या मोटेच्या पाण्यापेक्षा कितीतरी मोठा असतो. दांड फोडून खळाळत वाहणाऱ्या त्या पाण्याला आवर घालताना पाणी देणाऱ्याची धांदल उडते. डिझेल, ऑइल, लायनर-पिस्टन, नोझल, हॅंडल हे शब्द अवतीभवती धुमाकूळ घालू लागतात. एखादे वेळी ते इंजिन बिघडलं, तर ते दुरुस्त करण्यासाठी बाहेरगावचा मेकॅनिक आला म्हणजे आपला बारा तासांचा दिवस एका तासाचा होऊन जातो. इंजिनाच्या डिलिव्हरी पाइपच्या पाण्यावर वाफ्या-दोन वाफ्याचाच फुलविलेला मळा, त्या पायी किती दिवस शाळा बुडाली अन्‌ किती वेळा अभ्यास बुडाला, याची शाळेचा निकाल लागेपर्यंत आपणास फिकीर नसते.

इंजिनाच्या पाण्यावर मग ऊस लावला जातो. हळूहळू तो वाढत गेल्याने त्याचं गुऱ्हाळ येतं. तेव्हा विहिरीवरील इंजिन उचलून ते क्रशरला जोडलं जातं, तोवर विहिरीवर विजेच्या मोटारी येतात. त्या गुऱ्हाळातील रात्रंदिवस चालणारी धांदल अन्‌ विहिरीवरील केवळ बटण दाबलं, की चालू होणारी मोटार यात इंजिन बिचारं गरीब होऊन जातं; पण शेतात वीज येईपर्यंत आणि त्या लोडशेडिंगपूर्वीच्या काळात, त्या डिझेल इंजिनानं केलेला थाट वेगळाच असतो. शाळेतून घरी येताना नुसत्या त्या इंजिनाच्या आवाजानं आपल्या पावलांची गती वाढलेली असते. शाळेपेक्षा अधिक वेड तेव्हा त्या इंजिनानं लावलेलं असतं.

Web Title: pahat pavale by sheshrao mohite