घरचा गोठा ( पहाटपावलं)

घरचा गोठा ( पहाटपावलं)
घरचा गोठा ( पहाटपावलं)

शरद जोशी यांनी 1980 च्या सुमारास शेतकरी संघटनेच्या वतीने शेतीमालाच्या भावासाठी आंदोलन सुरू केले, त्या वेळी मी परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठात विद्यार्थी होतो. वाचनाची आवड होती, पण तोवर काही लिहिले नव्हते. त्याच सुमारास नरहर कुरुंदकरांचा एक लेख वाचनात आला- "आजचे मराठी ग्रामीण साहित्य सामाजिकदृष्ट्या पुरेसे प्रक्षोभक आहे का?' त्या लेखात त्यांनी म्हटले होते - आज ग्रामीण कथा म्हणून जी लिहिली जात आहे; तिच्यात "किस्से' अधिक आहेत, "फॅक्‍ट्‌स' नाहीत. मला वाटले हे आव्हान आहे. आपण "फॅक्‍ट्‌स' लिहिल्या पाहिजेत. अन्‌ मग काही कथा लिहिल्या. त्या केवळ पाच कथांचा संग्रह अमर हबीब यांनी "बरा हाय घरचा गोठा' नावाने 1983 मध्ये प्रकाशित केला. त्या कथासंग्रहाच्या सुरवातीस माझं जे मनोगत छापलेलं आहे, ते असं. ""शाळेत आठवीला असताना मी एकदा नापास झालो. काही काळ जनावरं राखली. शेतातली कामंही केली. परंतु माझे चुलते शिक्षक असल्यामुळे आणि ते बदलून गावी आल्यामुळे माझं तुटलेलं शिक्षण पुन्हा सुरू झालं. परंतु, ज्यांचे चुलते शिक्षक नव्हते, असे माझ्या गावातील सर्वच मित्र घरीच राहिले. कुणी शेती, कुणी मजुरी करतात. तर काही जाण मुंबईला निघून गेले आहेत. 
मी पुढचं शिक्षण घेऊन बराच पुढे गेलो. परंतु, अजूनही कधी कधी तो घरचा गोठा, गावच्या म्हशी, आमच्या गावचा इमामसाहेबाचा माळ मला भुरळ घालीत राहतो. परंतु, घरी बसलेल्या माझ्या मित्रांच्या जीवनाची झालेली माती पाहिली की तिकडंही जाऊ वाटत नाही; आणि मग मी जे शिक्षण घेतलं, त्या शिक्षणाविषयीच आणि ते तसं बनविणाऱ्या या सर्व व्यवस्थेविषयी मनात एक दुरावलेपणाची भावना निर्माण होते. आपलं म्हणावं असं यात कवडीभरही नाही, अशी भावना वाढत जाते आणि याच दुरावलेपणाच्या भावनेतून मागे वळून पाहताना माझं बालपण जसं दिसलं, तसं शब्दबद्ध करण्याचा मी येथे प्रयत्न केला आहे. शिक्षण सोडून घरी बसलेल्या माझ्या ज्या मित्रांच्या हाती ही पुस्तिका पडेल, त्यांनी मला पत्र पाठवून सध्या ते काय करतात, त्यांची शेतीवाडी काय म्हणतेय, गुरं-ढोरं कशी आहेत, गावाकडल्या शाळेच्या वाटेतल्या जांभळीच्या थाटीला पूर्वीसारखीच जांभळं लागतात की थाटीच कुणी तोडून विकून खाल्ली, वगैरे तपशील कळवला, तर मला बरं वाटत राहील. परंतु, कुणी ग्रामीण भागातील शाळांना अनुदाने द्यायला हवीत, शिक्षणाचा दर्जा सुधारायला हवा, वगैरे प्रकारची बौद्धिकं घेणारी पत्रं पाठवली, तर माझं डोकं पुन्हा बधिर होऊन जाईल.'' 
आता हे लिहिलं, त्यालाही तेहतीस वर्षे होऊन गेली. तो कथासंग्रह आणि त्या कथा काही कोणा मित्रापर्यंत गेल्या नाहीत आणि समजा त्या त्यांच्यापर्यंत पोचल्याही असत्या, तरी दररोजच्या जगण्याच्या भ्रांतीत अडकलेले ते काय वाचू शकले असते आणि मला कळवू तरी काय शकले असते? 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com