तुमचा स्पर्धक कोण? 

डॉ. सपना शर्मा 
सोमवार, 3 एप्रिल 2017

पूर्वीच्या काळी परीक्षेचा निकाल लागला, की आई- वडील विचारायचे "पास झालास का रे?' आणि पास झाला असेल तर पेढे, नाही तर दोन रट्टे! सोप्प होतं सगळं; पण आता सगळं बदललंय. नुसतं पास होऊन चालत नाही. भरपूर मार्कसुद्धा मिळवावे लागतात. याला काळाची गरज म्हणतात म्हणे. 

पूर्वीच्या काळी परीक्षेचा निकाल लागला, की आई- वडील विचारायचे "पास झालास का रे?' आणि पास झाला असेल तर पेढे, नाही तर दोन रट्टे! सोप्प होतं सगळं; पण आता सगळं बदललंय. नुसतं पास होऊन चालत नाही. भरपूर मार्कसुद्धा मिळवावे लागतात. याला काळाची गरज म्हणतात म्हणे. 
चांगले मार्क मिळावेत अशी विद्यार्थ्यांची आणि पालकांची इच्छा असणं ठीक आहे; परंतु पालक तेवढ्यावरच थांबत नाहीत, तर निकालानंतर पुढची चौकशी सुरू होते, "मीनाला किती मार्क पडले?' "आणि राहुलला?' बरं हेही चालेल म्हटलं, तर ते इथंही थांबत नाहीत. पुढची पायरी म्हणजे "त्याला इतके मार्क मिळाले, तुला का नाही? तू त्याच्यासारखे मार्क का नाही मिळवू शकत?' 
हे विचारत असताना पालक हे विसरतात, की आपला मुलगा कुणा "अमुक' सारखा नाही. त्याला गणित जमत नसलं किंवा अभ्यासात चांगले मार्क पडत नसतील, तरी त्याचं काही ना काही वैशिष्ट्य नक्कीच असेल; परंतु ते वैशिष्ट्य शोधून मुलाचं मनोबल वाढविण्याचं सहसा पालकांच्या ध्यानीमनीही येत नाही. 
मात्र पालकांनी आणि शाळेनं केलेल्या या धोकादायक तुलनेचे परिणाम प्रत्येक जण आयुष्यभर भोगतो. बहुतांश व्यक्तींना स्वतःबद्दल केवळ दुसऱ्याच्या तुलनेतच माहिती असते. तो गोरा- मी काळा, ती हुशार- मी बुद्धू, ती गुणी- मी अवगुणी, तो कर्तबगार- मी आळशी... स्वतःची खऱ्या अर्थानं योग्यता किती जणांना माहीत असते? तुम्हाला माहीत आहे काय? याचा थोडा विचार करा. 
अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या आपण करू शकतो. किती तरी गड आपण फत्ते करू शकतो; परंतु आपल्या मनात चार-पाच उथळ घटकांवरून दुसऱ्याच्या तुलनेत आपली किंमत इतकी कमी असते, की प्रत्येक नवीन पायरीवर आपला आतला आवाज म्हणतो. "तू नाही करू शकत, तुझ्या आवाक्‍याबाहेरचं आहे हे. तू काही त्या लायकीचा नाहीस' आणि मग भीती निर्माण होते, "पडलो तर? चुकलो तर? लोक काय म्हणतील?' आणि बहुतेक वेळा आपण पुढचं पाऊलच उचलत नाही. 
तुम्ही अद्वितीय आहात. तुमच्यात दुसऱ्यांसारखं सगळंच नसेल; परंतु तुमच्यासारखा दुसरा कुणी नाही हे लक्षात घ्या. तुमच्यात भरपूर क्षमता आहे. फक्त दुसऱ्याशी स्वतःची तुलना करू नका. तुमचा प्रतिस्पर्धी केवळ एकच आहे. तो जो तुमच्यासमोर तुमच्या आरशात आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला कुणालाही मागं टाकायचं नाही. त्या आरशातल्या व्यक्तीशी स्पर्धा करा. तुम्ही जसे काल होता, त्यापेक्षा आज थोडे बरे असायला हवं, अशी स्पर्धा स्वतःशीच करा. मग पाहा, यश तर मिळेलच, शिवाय आनंद आणि समाधानही लाभेल.  

Web Title: Pahatpawal write sapana sharma

टॅग्स