आत्मीयतेची त्रिज्या (पहाटपावलं)

विनय पत्राळे
सोमवार, 8 मे 2017

प्रत्येकाच्या दृष्टीने जगातील सर्वांत महत्त्वाची व्यक्ती म्हणजे ती स्वतः असते. स्वतःवर सर्वांचे प्रेम असते. स्वतःच्या सुखासाठी सर्वत्र प्रयत्न सुरू असतात. स्वतःला दुःखापासून दूर ठेवण्यासाठी आटापिटा सुरू असतो. हे नैसर्गिक आहे. लहान मूल जन्माला येते. ते भिरभिर इकडे तिकडे पाहते. त्याला सर्व सृष्टी नवीन असते. भूक लागल्यावर ते रडते. मग त्याची आई त्याला पदराखाली घेते. मूल तृप्त होते. आपल्याला भूक लागल्यावर जवळ घेणारी...अशी आईची प्रथम ओळख त्याला होते. हळूहळू ती वाढत जाते.

प्रत्येकाच्या दृष्टीने जगातील सर्वांत महत्त्वाची व्यक्ती म्हणजे ती स्वतः असते. स्वतःवर सर्वांचे प्रेम असते. स्वतःच्या सुखासाठी सर्वत्र प्रयत्न सुरू असतात. स्वतःला दुःखापासून दूर ठेवण्यासाठी आटापिटा सुरू असतो. हे नैसर्गिक आहे. लहान मूल जन्माला येते. ते भिरभिर इकडे तिकडे पाहते. त्याला सर्व सृष्टी नवीन असते. भूक लागल्यावर ते रडते. मग त्याची आई त्याला पदराखाली घेते. मूल तृप्त होते. आपल्याला भूक लागल्यावर जवळ घेणारी...अशी आईची प्रथम ओळख त्याला होते. हळूहळू ती वाढत जाते. माझ्याशी बोलायचा प्रयत्न करणारी, मला थोपटून झोपवणारी, माझे लाड करणारी...मी रडताच हातातली कामे सोडून माझ्याकडे बघणारी...माझी आई त्याला अत्यंत जवळची वाटते. अत्यंत सुरक्षित वाटते.

त्याची आत्मीयतेची त्रिज्या स्वाभाविक स्व-कडून आईकडे विस्तारित होते. मग तो हळूहळू कुटुंबातील सर्वांना ओळखू लागतो. ‘हे माझे कुटुंबीय’ असे समजू लागतो. एखाद्या लहान मुलाला तुम्ही चॉकलेट द्या. ते मूल चॉकलेट मुठीमध्ये घट्ट धरून ठेवते. तुम्ही ते परत मागितले, तर मूल चॉकलेट देत नाही. तो मुलगा असेल, वयानं थोडा मोठा असेल, तर त्याची आई म्हणते, ‘अरे ! तू दादा आहेस ना? तुझ्या लहान बहिणीसाठी ठेव अर्धे...? म्हणजे आई थोडा मोठेपणा देते...थोडा अहंकार वाढविते. थोडा त्याग शिकवते...मुलाच्या आत्मीयतेची त्रिज्या वाढवते.हळूहळू मूल घरच्या लोकांना स्वतःचे समजू लागते. त्यांच्याशी जोडले जाते. आई-बाबा घरी नसले तरी थोडा काळ आजी-आजोबांबरोबर राहते. हे सर्व माझे आहेत, असे त्याला वाटते. घरी कुणी झोपले असेल, तर मोठा आवाज करून त्याची झोपमोड करू नये...एवढी त्याची संवेदना वाढते. कुणी आजारी असेल तर  त्याची थोडी शुश्रुषा करण्याची भावना होते.

थोडे मोठे झाल्यानंतर मूल खेळण्यासाठी बाहेर पडते. तेथे त्याला मित्र मिळतात. त्यांच्याशी गप्पागोष्टी रोज होतात. एखाद्याच्या घरी जाणे होते. मित्राची आई कधीतरी प्रेमाने हातावर वडी ठेवते. ‘माझे’पणाचे वर्तुळ मोठे होऊ लागते. आपली सोसायटी, आपली चाळ, आपला गाव...हे त्या त्रिज्येच्या वाढीचे टप्पे ठरतात. माझी भाषा, माझे राज्य, माझा धर्म...माझा देश...असे याचे पुढील टप्पे आहेत. प्रत्येकाला अभिमान असतोच. त्या अभिमानाला सामूहिक बाबींशी जोडले तर तो तितकासा हानिकारक ठरत नाही.काही माणसे यापुढेसुद्धा प्रगती करतात. त्यांना विश्‍वमानव म्हणतात. त्यांची आत्मीयतेची त्रिज्या सर्व मानवांपर्यंत पोचलेली असते. जगात कुठेही दुःख असेल, तर त्यांना सारखीच संवेदना होते. भौगोलिक सीमा त्यांना बंधन घालू शकत नाहीत. त्यांना कुणीही परके वाटत नाही. कुणीही शत्रू वाटत नाही. कुणाच्याही अकल्याणाची इच्छा त्यांना होत नाही. ही संवेदना त्यांच्या सहवासातील प्राणी, पक्षी, वनस्पती यांनाही व्यापून टाकते. त्यांच्याजवळ अभय असते. समाधान व प्रेम ते प्रक्षेपित करीत असतात. त्यांच्या जवळ जाणाऱ्यांना अद्‌भुत मानसिक शांततेचा अनुभव येतो.

त्यांनी वापरलेल्या वस्तू त्या चैतन्याने भारून जातात. त्यांना काहीच परके किंवा अप्रिय नसते. त्यांची आत्मीयतेची त्रिज्या ही विश्‍वाच्या त्रिज्येच्या समकक्ष होते. देव पाहायला गेलो आणि देवच होऊन गेलो, अशा स्थितीत ते पोचतात.

Web Title: Pahatpawale coloum article by Vinay Patrale

टॅग्स