इम्रान यांची मुजोरी (अग्रलेख)

imran khan
imran khan

पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेमुळे चर्चेला नकार देण्याखेरीज भारतासमोर दुसरा पर्याय नव्हता. उभय देशांदरम्यान संवादाची प्रक्रिया पुन्हा सुरू व्हावयाची असेल, तर पाकिस्तानला आपल्या प्रामाणिक हेतूचा प्रत्यय कृतीतून द्यावा लागेल.

दो न शेजारी देशांमध्ये सौहार्दाचे संबंध प्रस्थापित व्हावेत म्हणून पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांनीच घेतलेल्या पुढाकारावर अखेर त्यांनीच आपल्या उद्दाम भाषेमुळे पाणी टाकले आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात संयुक्‍त राष्ट्रांच्या आमसभेच्या निमित्ताने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री महंमद कुरेशी यांच्यात होणारी बोलणी रद्द करण्याचा निर्णय घेणे भारताला भाग पडले आहे. त्याला अर्थातच पाकिस्तानच्या लष्करी कारवाया कारणीभूत आहेत. अर्थात, एकीकडे भारताला वाटाघाटींच्या मेजावर आमंत्रित करावयाचे आणि त्याच वेळी आपल्या हस्तकांकरवी अमानुष कारवाया सुरूच ठेवायच्या, हे पाकिस्तानचे दुटप्पी धोरण नवे नाही. खरे तर इम्रान यांची पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून नियुक्‍ती झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शेजारी देशाशी ‘अर्थपूर्ण आणि सकारात्मक’ चर्चेची तयारी दाखवून आपल्याला संघर्ष नको आहे, असा संदेश दिला होता. गेल्या आठवड्यात इम्रान यांनीही त्यास अनुकूलता दर्शवली आणि मोदी यांना थेट पत्र लिहून संयुक्‍त राष्ट्रांच्या आमसभेच्या निमित्ताने दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री एकमेकांशी संवाद साधतील, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे डिसेंबर २०१५ नंतर थांबलेला हा संवाद आता पुन्हा सुरू होईल आणि या संवादाचे रूपांतर सुसंवादात होईल, अशी सुखद चिन्हे दिसू लागली होती! मात्र, आपल्या या संवादी भूमिकेमागे काही एक कावा आहे काय, असे वातावरण पाकिस्तान लष्कराने निर्माण केले आणि एका भारतीय जवानाची नेमक्‍या त्याच दिवशी गळा चिरून हत्या केली. त्याचे तीव्र पडसाद उमटणे, स्वाभाविक होते आणि नंतरच्या २४ तासांतच जम्मू-काश्‍मीरच्या तीन पोलिसांचे अपहरण करून त्यांची हत्या झाल्याच्या प्रकरणात आयएसआयचा हात असल्याचे दर्शविणारे संदेश पकडले गेले. एकीकडे चर्चेचा आव आणायचा आणि दुसरीकडे अशा घातपाती कारवाया करायच्या, या पाकिस्तानी धोरणाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.

केवळ पाकिस्तानी लष्कराच्या पाठबळावर पंतप्रधानपद मिळविणाऱ्या इम्रान यांनी आणखी काही तारे तोडले. ‘शांततापूर्ण चर्चेला नकार देण्याचा भारताचा निर्णय हा उद्दामपणाचा तर आहेच; शिवाय तो भारताची नकारात्मक भूमिकाच स्पष्ट करत आहे,’ असे ट्विट भारताच्या निर्णयानंतर त्यांनी केले. मात्र, क्रिकेटच्या मैदानावर परिपक्‍वता दाखवणाऱ्या या खेळाडूकडे प्रत्यक्षात  ‘खिलाडूवृत्ती’ अजिबातच नसल्याचे त्यांच्या पुढील वक्‍तव्यावरून स्पष्ट झाले. ‘आपल्याला आयुष्यभर कोत्या मनोवृत्तीच्या व्यक्‍ती मोठ्या पदावर जाऊन पोचल्याचेच बघायला मिळाले आहे!’, असे त्यांनी म्हटले आहे. दुसऱ्याला कोत्या वृत्तीचा म्हटले की आपण आपोआप व्यापक मनोवृत्तीचे होतो, असे बहुधा त्यांना वाटत असावे! भारत-पाकिस्तान संबंधांबाबत काही करावयाचेच नाही, असाही हेत्वारोप इम्रान यांनी मोदींचे नाव न घेता त्यांच्यावर केला आहे. खरे तर ‘या दोन शेजारी देशांमध्ये शांतता नांदण्यासाठी भारताने एक पाऊल उचलले, तर पाकिस्तान दोन पावले पुढे टाकेल’, असे आशावादी वक्तव्य इम्रान यांनी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर केले होते आणि त्यालाच मोदी यांनी ‘अर्थपूर्ण तसेच सकारात्मक’ चर्चेस भारत कायम तयार असेल, असे स्पष्ट करून प्रतिसादही दिला होता. त्यानंतरही पाकिस्तानी लष्कराच्या कारवाया संपलेल्या नाहीत. उलट दीर्घ काळानंतर काश्‍मीरमध्ये लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अडथळे आणण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे आणि त्यातूनच जम्मू-काश्‍मीरमध्ये पोलिसांवरील हल्ले वाढले आहेत. तेथील पोलिसांच्या हत्येसाठी ‘आयएसआय’ ही पाक गुप्तचर यंत्रणा दहशतवाद्यांना चिथावणी देत असल्याच्या वृत्तामुळे पाकचे कुटिल इरादेच स्पष्ट झाले आहेत.

गेल्या चार-सहा दिवसांतील या घडामोडींमुळे या दोन्ही देशातील संबंध हे पुन्हा होते त्याच वळणावर जाऊन पोचले आहेत. त्यामुळेच भारतीय लष्कराने पाकिस्तानी लष्कराकडे संतप्त आणि तीव्र प्रतिक्रिया व्यक्‍त केली आहे. २०१५ मध्ये सुषमा स्वराज या ‘हार्ट ऑफ एशिया’ परिषदेसाठी इस्लामाबादला गेल्या होत्या. तेव्हा झालेल्या संवादानंतर दोन्ही देशांनी संयुक्‍त निवेदनही जारी केले होते. यापुढे दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री संवाद साधत राहतील, असे त्यात नमूद करण्यात आले होते. मात्र, पाकिस्तानी लष्कर ते मानण्यास तयार नाही आणि उलट इम्रान खान यांना पंतप्रधानपदी बसवण्यात आल्यानंतर लष्कराच्या अंगी अधिकच बळ आल्याचे दिसते आहे. या पार्श्‍वभूमीवर संवाद होणार तरी कसा?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com