पर्रीकरच पणजीचा पर्याय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मार्च 2017

 महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षापुढील लक्ष्मीकांत पार्सेकरांचा अडथळा मतदारांनीच दूर केला आहे, तर गोवा फॉरवर्डने मुख्यमंत्रिपदी मनोहर पर्रीकर असतील तर पाठिंबा देऊ, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्रिशंकू स्थितीतही सत्तास्थापनेसाठी संरक्षणमंत्री पर्रीकरांना भाजप गोव्यात पाठवणार का, ही उत्सुकता निर्माण झाली आहे. 

 महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षापुढील लक्ष्मीकांत पार्सेकरांचा अडथळा मतदारांनीच दूर केला आहे, तर गोवा फॉरवर्डने मुख्यमंत्रिपदी मनोहर पर्रीकर असतील तर पाठिंबा देऊ, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्रिशंकू स्थितीतही सत्तास्थापनेसाठी संरक्षणमंत्री पर्रीकरांना भाजप गोव्यात पाठवणार का, ही उत्सुकता निर्माण झाली आहे. 

पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वांत मोठे राज्य अशी ओळख असलेल्या उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या अभूतपूर्व विजयाचीच देशभर चर्चा असणे नैसर्गिक आहे. उत्तर प्रदेशातूनच जन्म घेतलेल्या लगतच्या उत्तराखंडमध्येही भाजपला निर्विवाद व मोठे बहुमत आहे. पंजाबमध्ये कॉंग्रेसने उसळी मारली आहे. तथापि, मणिपूर व गोवा या अनुक्रमे साठ व चाळीस आमदारांच्या छोट्या राज्यांच्या त्रिशंकू निकालांनी सत्तास्थापनेचा मोठा पेच उभा केला आहे. दोन्ही ठिकाणी कॉंग्रेस हा सर्वांत मोठा पक्ष असला, तरी त्याचीच सत्ता येईल, हे निश्‍चित नाही. गोवा हे तर किंबहुना आलटून-पालटून सत्ता, तसेच अस्थिर राजकारणासाठी सतत चर्चेत असलेले छोटे राज्य. शनिवारी जाहीर झालेल्या निकालात गोवेकरांनी त्रिशंकू विधानसभेचा कौल दिला असला आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आधीच्या एकवीस जागांवरून अवघ्या तेरा जागांपर्यंत घसरला असला तरी सत्तांतर झाले, असे म्हणण्याची सोय नाही. भाजपने सत्तास्थापनेचा शड्डू ठोकला आहे. सतरा जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष बनलेल्या कॉंग्रेसचा दावा कागदावर नैसर्गिक न्यायाचा असला, तरी उरलेले चार आमदार कसे सोबत घ्यायचे, हे संपूर्ण निवडणुकीपेक्षाही मोठे आव्हान त्या पक्षापुढे आहे. पाच वर्षांपूर्वी कॉंग्रेसचे अवघे नऊ आमदार निवडून आले होते. आता ती संख्या जवळपास दुपटीवर नेण्यात पक्षाला यश आले आहे. दिग्विजयसिंह गोव्यात ठाण मांडून बसलेले आहेत. सत्तास्थापनेचे समीकरण कागदावर सोपे वाटत असले, तरी चार आमदारांचे गणित सोडवण्यात त्यांना यश येईलच असेही नाही. अशावेळी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व गोवा फॉरवर्डचे प्रत्येकी तीन आमदार निवडून आले असल्याने सत्तेच्या चाव्या त्यांच्याकडे आहेत. या दोन्ही पक्षांचा विचार करताना केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नावासाठी त्यांनी दर्शविलेला कौल महत्त्वाचा ठरतो आहे. 
यापैकी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष भाजपसोबत सत्तेत सहभागी होता. सरकार पाच वर्षे पूर्ण करत असतानाच सत्तेत सहभागी "मगोप'ने मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याविरुद्ध थेट बंडाचा झेंडा उभारला. पार्सेकर मुख्यमंत्री असणारे सरकार आपल्याला नको, अशी भूमिका घेतली. आता प्रत्यक्ष निवडणुकीत लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासह भाजपच्या पाच मंत्र्यांचा पराभव झाला आहे. पार्सेकरांचा अडथळा असा दूर झाल्यामुळे "मगोप'च्या आधीच्या भूमिकेचे काय, हा प्रश्‍न निर्माण होणे स्वाभाविक आहे. "मगोप'ची भाजपशी निवडणूकपूर्व युती होती. "मगोप'चे तीन आमदार होते. ठरल्याप्रमाणे सुदिन ढवळीकर आणि त्यांचे बंधू दीपक या दोघांना मंत्रिपदे देण्यात आली. पर्रीकर मुख्यमंत्री असताना संसार गुण्यागोविंदाने सुरू होता. पर्रीकर संरक्षणमंत्री म्हणून केंद्रात गेल्यावर पार्सेकर यांच्या खांद्यावर मुख्यमंत्रिपदाची धुरा आली आणि इथूनच "मगोप'शी मतभेद सुरू झाले. बांधकाम खात्याची कामे अडून राहायला लागली, असे ढवळीकरांचे म्हणणे. दीपक ढवळीकर यांचे सहकार खाते काढून घेतल्याने नाराजी वाढली. पार्सेकरांनी ढवळीकर बंधूंना मंत्रिपदावरून हटवले. निवडणुकीच्या तोंडावर अखेर युती तुटली. 
गोवा फॉरवर्ड हा तसे पाहता कॉंग्रेसच्या जवळचा पक्ष. पण निवडणुकीपूर्वी जागावाटपावरून कॉंग्रेसने ऐनवेळी घात केल्याचा आरोप आहे. "मगोप'प्रमाणेच स्बळावर निवडणूक लढवली. चारपैकी तीन उमेदवार निवडून आले. ते तिघे नक्की पाठिंबा देतील, असा कॉंग्रेसला विश्‍वास वाटतो. पण गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी काही दिवसांपूर्वी, "गोव्याच्या भल्यासाठी मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री व्हायला हवेत,' असे म्हटले होते. त्यांच्याप्रमाणेच अनेकांना मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री म्हणून गोव्यात परत यावेत, असे वाटते. आताही "पर्रीकर मुख्यमंत्री' या अटीसह गोवा फॉरवर्ड पक्ष भाजपला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याच्या मनःस्थितीत आहे. 
भारतीय जनता पक्षाच्या गोव्यातल्या घसरणीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित गोवा सुरक्षा मंच कारणीभूत ठरला आहे. भाजपसमोर मंचाने कडवे आव्हान उभे केले होते. गोसुमंचे नेते सुभाष वेलिंगकर यांनी आक्रमकपणे प्रचार करून भाजप आणि विशेषतः मनोहर पर्रीकर यांच्यावर टीकेची राळ उडवली होती. त्यांनी पर्रीकरांची "फटिंग' अशी संभावना केली होती. गोसुमं आणि शिवसेना यांच्या संयुक्त प्रचारसभांना हजारोंच्या संख्येने लोकांनी हजेरी लावली. पण ती गर्दी मतांमध्ये रूपांतरित झाली नाही. गोसुमंचा एकही उमेदवार विजयी झाला नाही, तरी भाजपचे उमेदवार पडायला गोसुमं कारणीभूत ठरला. आता सत्तेसाठी कॉंग्रेस आणि भाजपची गोळाबेरीज सुरू आहे. मगोप, गोवा फॉरवर्ड आणि अपक्ष यांच्या मतांचे दान कोणाच्या पदरात पडते, यावर सारेकाही अवलंबून असेल. घोडामैदान जवळच आहे, पण त्याचा घोडेबाजार होऊ नये, अशी अपेक्षा आहे! 
 

 
 

Web Title: Parrikar is the only option in goa