सुभगाच्या सुमनमाला (परिमळ)

डॉ. सिसिलिया कार्व्हालो
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

मनुष्याचा जन्म आणि मृत्यू हे एक कोडे आहे, हेच खरं. या पृथ्वीतलावर येण्याच्या आधी आपण कोठे होतो हे आपल्याला ठाऊक नाही आणि आपण आपला देह येथे ठेवून गेल्यावर कोठे असणार आहोत, हेही आपल्याला माहीत नाही. दररोज सकाळी आपण उठत असतो. म्हणजे आपण जिवंत असतो. त्यामुळे मिळालेला दिवस चांगल्या रीतीने घालवणं एवढंच आपल्या हातात असतं. जन्म, जीवन आणि मृत्यू या संदर्भात प्रत्येक धर्माने काही तत्त्वं घालून दिलेली असतात; आणि आपली समज आणि वकुब या प्रमाणे आपण त्याचं आचरण करीत असतो; वा नसतो देखील! शेवटी काय; तर या पृथ्वीतलावर आपल्याला "कोणीतरी' ढकलून दिलेलं असतं...

मनुष्याचा जन्म आणि मृत्यू हे एक कोडे आहे, हेच खरं. या पृथ्वीतलावर येण्याच्या आधी आपण कोठे होतो हे आपल्याला ठाऊक नाही आणि आपण आपला देह येथे ठेवून गेल्यावर कोठे असणार आहोत, हेही आपल्याला माहीत नाही. दररोज सकाळी आपण उठत असतो. म्हणजे आपण जिवंत असतो. त्यामुळे मिळालेला दिवस चांगल्या रीतीने घालवणं एवढंच आपल्या हातात असतं. जन्म, जीवन आणि मृत्यू या संदर्भात प्रत्येक धर्माने काही तत्त्वं घालून दिलेली असतात; आणि आपली समज आणि वकुब या प्रमाणे आपण त्याचं आचरण करीत असतो; वा नसतो देखील! शेवटी काय; तर या पृथ्वीतलावर आपल्याला "कोणीतरी' ढकलून दिलेलं असतं... त्यामुळे प्राप्त झालेल्या जीवनास पात्र ठरवण्याचा आपण आपापल्या परीने प्रयत्न करीत असतो.

राजेरजवाड्यांच्या कथा मनोरंजक, तशाच उद्‌बोधकही असतात. एका राजाची कन्या तारुण्यात आल्यावर, तरुणांसाठी त्यानं एक महोत्सव आयोजित केला. राजानं तरुणांना आवाहन केलं, की एका मोठ्या तलावातून पोहून दुसऱ्या किनाऱ्यावर सुखरूप आल्यास त्या तरुणाचा विवाह राजकन्येशी लावून दिला जाईल. त्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. खूप तरुण तलावाभोवती जमले. त्यांनी तलावात डोकावून पाहिलं, तर काय? विषारी सर्प, अक्राळविक्राळ जबडा वासलेल्या मगरी इतस्ततः फिरत होत्या. ते दृश्‍य पाहताच सारे तरुण क्षणभर मागे सरले. बुभुक्षित मगरी आणि विषारी साप दंश करण्यास टपलेले होते.

राजा मोठा लवाजमा घेऊन तलावाच्या काठावरील भव्य रंगमंचावरील आसनावर स्थानापन्न झाला. थोड्याच वेळात भोंगा वाजला आणि काय आश्‍चर्य, फक्त एकाच तरुणानं तळ्यात उडी घेतलेली अनेकांनी पाहिली. पाण्यात पोहणारा मात्र सारे विषारी साप बाजूला सारीत आणि मगरींचे, सुसरींचे जबडे चुकवीत पलीकडच्या काठावर पोचला. त्याने आजूबाजूला पाहिलं; गर्दी एकच जल्लोष करीत होती. राजाला वाटलं; हा तरुण आपल्या मुलीला, राजकन्येलाच शोधत असावा. राजा त्याच्याकडे येऊन म्हणाला, "राजकन्या येईलच इतक्‍यात, तू जिंकलास बेटा!...' तो तरुण ओरडून म्हणाला, "हो! मी जिंकलो! पण मला त्याचे आभार मानायचेत; ज्याने मला तळ्यात ढकलून दिलं; त्याच्यामुळेच मला हे सारं वैभव मिळणार आहे.'

आपल्यालाही या पृथ्वीतलावर विषारी फूत्कार सोडणारे सर्प, जबडा वासलेल्या मगरी-सुसरी गिळायला, टीका करायला टपलेल्या... आपल्यावर हल्ला करायला, प्रहार करायच्या पावित्र्यात असलेले असे कितीतरी लोक वळणावळणावर उभे आहेत. आजूबाजूच्या प्रदूषित, प्रतिकूल वातावरणावर मात करीत आपण अजूनही जिवंत आहोत... म्हणजे विषावर मात करण्याची ताकद आपल्यात आहे... म्हणूनच, जिवंत असलेल्या आपल्या प्रत्येक श्‍वासासाठी, उजेडाच्या... सुगंधाचा... स्वादाच्या... संगीताच्या... सुंदरतेच्या माला घेऊन शुभ सकाळ आपल्या उशाजवळ उभी असतेच ना?

Web Title: pearls of good luck: parimal