प्लॅनिंग! (ढिंग टांग)

dhing tang cartoon
dhing tang cartoon

आपण नेमकी कधी कूस बदलली हे इतिहासास नेमके ठाऊक नाही. कोणाला ठाऊक असते? कूस बदलणे सोडा, आम्ही तर खाटेवरोन खाली पडलो, तरी आम्हास काही कळत नाही. खुर्चीवर बसोन "आ‘ वासोन डुलकी काढता काढता लुढकलो, तरीदेखील काही "आ‘कळत नाही. गुदस्तसाली आम्ही खुर्चीवरोन लुढकल्यामुळे शेजारील खुर्चीवरील एक श्रोता प्राणांतिक घायाळ जाहला. तथापि, त्यांस इस्पितळात नेवोन औषधपट्टी करोन डिसचार्ज मिळोन त्यांस झोळणा करोन घरी नेईपर्यंत आम्हास काही म्हणता काही आकळले नव्हते!! असो. मुद्दा येवढाच की "न्यमन्यम‘ असा अगम्य आवाज करीत इतिहासाने डाव्या कुशीवर वळण घेतले, तेव्हाच ते घडले...

नेमके सांगावयाचे तर शके 1938 चा भाद्रपद कृष्ण दशमीचा दिवस. स्थळ : बांदऱ्याच्या एमायजी क्‍लबातील खलबतखाना. महाराष्ट्रधर्म प्रतिपाळक मराठी युवाहृदय सम्राट पाककलावंतनिर्दाळक श्रीमंत चुलतराजसाहेब आणि त्यांचे कडवे मनसैनिक ह्यांची गुप्त सभा भरली होती आणि आम्ही नेमके पुढील रांगेत सरनोबत बाळाजी नांदगावकर आणि सरखेल सरनितीनाजी सरदेसाई ह्यांच्या मधोमध खुर्चीत बसलेले.
...अस्वस्थ साहेब समोर येरझारा घालत होते. मधूनच डावी मूठ उजव्या तळहातावर हापटत होती. मधूनच डावी मूठ कपाळावर आदळत होती. जगदंब जगदंब!!
""बोला, बोला तुम्ही! नुसतेच गप्प का मुखस्तंभांसारिखे!,‘‘ राजे गरजले. बाळाजींनी उपरण्याने कपाळावरील घाम पुसला. सरनितीनाजींनी मागल्या रांगेकडे वळोन पाहिले. आम्ही तेव्हा मुंडके खाली करोन डुलकलो होतो.

""इथे काय हजामतीला आलात? सलूनमध्ये बसल्यासारखे मुंडी खाली घालोन काये बसलात! उठा!!,‘‘ राजे कडाडले. पुन्हा एकवार उजव्या तळहातावर डावी मूठ थाडकन हापटली गेली. उपस्थितांना जणू बिजली कडाडल्याचा भास जाहला. अनेक दिवसांच्या अस्वस्थ येरझारा अचानक थांबल्या. पाखरे आभाळात उडावयाची विसरली. वळचणीच्या पाली चुकचुकायच्या विसरल्या आणि नेमके त्याचवेळी खुर्चीत बसल्या बसल्या आम्ही शेजारील सरनोबत बाळाजींच्या खांद्यावर लुढकलो.
...एक सणसणीत टप्पल मारोन बाळाजींनी आम्हांस जागे केले. "साहेब येवढं महत्त्वाचं सांगतायेत, तू झोपतो काय लेका? काही अक्‍कल आहे का?‘ एवंगुणविशिष्ट जळजळीत उद्‌गार त्यांनी आमच्या कानात जाळासारखे ओतले. "सॉरी, सॉरी‘ ऐसे पुटपुटत आम्ही नाकावरोन पंजा फिरवोन निरागसपणाने राजियांकडे क्षमायाचनेने पाहिले.
""ठरलं, ठरलं, ठरलं...एकदम ठरलं!,‘‘ आमच्याकडे पाहोन अंगार ओकत राजे उद्‌गारले. आमची उरलीसुरली झोप खाडकन उडाली.
काय ठरलं? कधी ठरलं? कसं ठरलं?
""आम्ही कार्यकर्त्यांचं ऐकणार! त्यासाठी नवरात्रीनंतर जातीने मैदानात उतरणार!!,‘‘ राजियांनी आपला मनोदय जाहीर केला. आमचा आमच्या कानांवर विश्‍वास बसेना! हे म्हंजे काहीत्तरीच होते. राजे कशाला आमचे ऐकायला बसले आहेत? त्यांनी बोलायचे, आम्ही ऐकायचे! गेले दशकभर हेच तर नाही का चालले? हे म्हंजे पट्टीच्या गवयाने स्टेजवरून खाली बसलेल्या श्रोत्यास "कौशी कानड्यातली ती बंदिश ऐकवा ना, देवा!‘ ऐसे सांगण्यापैकी होते. अभावितपणे आम्ही हातभर जीभ काढून कानाला हात लावला...
""इतकी वर्ष आमचं ऐकलंत नं? आता आम्ही तुमचं ऐकणार!!,‘‘ आमच्याकडे बोट रोखत राजे म्हणाले,
""नवरात्रीनंतर आम्ही प्रत्येक शाखेशाखेत जाऊ. हरेक नवनिर्माण-गडावर चढाई करू. हरेक बालेकिल्ल्यात जाऊन तिथल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधू!! हे ठरलं!!‘‘
""पहिले आमच्या गडावर या, साहेब! हा कडवट, इमानी सैनिक तुमची वाट पाहात असेल!!,‘‘ भावविवश होत्साते आम्ही म्हणालो.
""छ्या, सर्वांत आधी माझ्याकडे या!,‘‘ सरनोबत बाळाजींनी उपरणे झटकले.
""मी हितेच पलीकडे शिवाजीपार्कावर ऱ्हातो. आजच या!,‘‘ सरखेल सरनितीनाजी म्हणाले.
"आधी आमच्याकडे, आमच्याकडे‘ ऐसा गडबडगुंडा जाहला.
""खामोश!,‘‘ एक हात वर उंचावून राजे म्हणाले. कल्लोळ थांबोन चिडीचूप शांतता पसरली.
""कुणाकडे जायचे, ते आम्ही जेवणाचा मेनू पाहून ठरवू!! कळलं?,‘‘ राजियांनी निर्णय दिला.
...तेव्हा नेमकी इतिहासाने परत कूस बदलली व तो घोरू लागला. असो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com