esakal | भाष्य : अंतराळ उद्योगाचे सीमोल्लंघन
sakal

बोलून बातमी शोधा

Star Trek Actor William Shatner Launches into Space on Blue Origin Rocket

भाष्य : अंतराळ उद्योगाचे सीमोल्लंघन

sakal_logo
By
अजेय लेले

गेल्या काही महिन्यांत अंतराळ पर्यटन हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले गेले. या क्षेत्रात जगात ठसा उमटवण्याची ताकद भारतात ठासून भरलेली आहे. त्याला तातडीने योग्य दिशा, मार्गदर्शन, सहकार्य आणि प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

एकेकाळी जगभरच्या दूरचित्रवाणीवर गाजलेल्या ‘स्टार ट्रेक’ या मालिकेत कॅप्टन जेम्स किर्कची भूमिका केलेले कलाकार नव्वद वर्षीय विल्यम शँतर १३ आॅक्टोबर २०२१ रोजी अब्जाधीश जेफ बेझोसच्या ‘ब्ल्यू ओरिजिन कंपनी’द्वारे अवकाशात जाणारे सर्वात वयोवृद्ध अंतराळवीर ठरले. ‘ब्ल्यू ओरिजिन’च्या अंतराळयानाद्वारे जून २०२१ रोजी जेफ बेझोस स्वतः अंतराळ सफर करून परतले होते. गेल्या चार महिन्यांत व्हर्जिन गॅलिक्टिक आणि स्पेस एक्स यांच्यासारख्या कंपन्यांनी व्यावसायिक अंतराळ मोहिमा राबवल्या. त्यातून हे स्पष्ट आहे की, अंतराळ पर्यटन ही वास्तवात उतरलेली स्वप्नकल्पना ठरली आहे. त्यामुळे अंतराळ व्यवसायाचे कोंदण निर्माण झाले आहे.

अंतराळ पर्यटनासारख्या क्षेत्रात भारत अद्याप प्रवेशला नसला तरी, त्याने अंतराळाबाबत आपल्या कार्यकक्षा अधिक रूंद आणि व्यापक केल्या आहेत. तेथे व्यवसाय-उद्योगाच्या दृष्टीने प्रवेशासाठी पार्श्‍वभूमी तयार केली आहे. प्रमुख खासगी अंतराळ उद्योगाचा आराखडाही बनवण्यासाठी भारताने कंबर कसलेली आहे. ११ आॅक्टोबर २०२१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अंतराळ संघटनेची (इंडियन स्पेस असोसिएशन - आयएसपीए) मुहूर्तमेढ केली. त्याद्वारे अंतराळाबाबत काही करू इच्छिणाऱ्या, त्यासाठी प्रयत्नशील उद्योगांना यात सामील करून घेतले जाईल. जागतिक अंतराळ व्यवसायात भारत भूमिका निभावत असताना, त्यासाठी पूरक आणि अनुषंगिक बाबी पुरवण्याचे महत्कार्य संघटनात्मक रुपाने भारतीय उद्योग सरकारला सहाय्यभूत असे कार्य याद्वारे पार पडेल.

भारतीय अवकाश संशोधन संघटना (इस्त्रो) ही देशातील एक प्रमुख ‘यशकथा’ आहे. या संस्थेच्या कामगिरीने भारताच्या शिरपेचात मानाचे पीस खोवले आहे. इस्रो जगातील अंतराळ संशोधन संस्थांमधील आघाडीची संस्था आहे.तिच्या यशात भारतातील खासगी कंपन्या, संस्था यांचेही मोठे योगदान राहिलेले आहे. उपग्रह आणि प्रक्षेपक वाहन यांच्यासाठी लागणाऱ्या सबसिस्टम्सच्या उभारणीत त्यांचे योगदान मोठे राहिलेले आहे. इस्त्रो संपूर्ण प्रकल्पाचे डिझाईन तयार करते आणि त्यासाठी आवश्यक गुंतागुंतीचे तंत्रज्ञानही विकसित करते.

तथापि, त्याकरता फॅब्रिकेशनची मुख्य जबाबदारी ही खासगी कंपन्याच पार पाडत आल्या आहेत. सद्यःस्थितीत संशोधन आणि विकासाच्या (आर अँड डी) कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ‘इस्त्रो’ व्यावसायिक बाबी खासगी कंपन्यांकडे आऊटसोर्स करत आहे. त्यासाठी प्रमुख तांत्रिक बाबींचे हस्तांतरही केले जाणार आहे. त्याअंतर्गत इस्त्रो ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक वाहन (पीएसएलव्ही) विकसित करणे; तसेच व्यावसायिक अटी, शर्तींवर विविध प्रकारच्या उपग्रहांचे प्रक्षेपण करणे याबाबतचे तंत्रज्ञान खासगी उद्योगांना हस्तांतरित करणार आहे. भारत विश्वासार्ह रीतीने आणि रास्त दरात उपग्रह अवकाश सोडण्याची सुविधा देत असल्याने अनेक देश भारतीय प्रक्षेपकाद्वारे आपले उपग्रह अवकाशात पाठवू इच्छित आहेत. उपग्रह प्रक्षेपण बाजाराव्यतिरिक्त, इतरही अनेक क्षेत्रे खुणावत असल्याने, खासगी उद्योगांना ते आकर्षित करत आहेत. या क्षेत्रांमध्ये उपग्रहाची निर्मिती, पायाभूत सुविधांचा विकास आणि ‘कम्युटेशन’ व नेव्हिगेशन’ याबाबतच्या सुविधा देणे अशा अनेक बाबींचा समावेश होतो.

समन्वय, प्रोत्साहन महत्त्वाचे

‘इस्त्रो’ने हाती घेतलेल्या व्यावसायिक सेवांना प्रोत्साहन देणे आणि त्याकरता खासगी अंतराळ क्षेत्राशी नित्याचे संबंध राखण्यासाठी सरकारने सहा मार्च २०१९ रोजी ‘न्यू स्पेस इंडिया लि.’ (एनएसआयएल) ही सार्वजनिक उद्योगातील कंपनी सुरू केली. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला, बंगळूर, हैदराबादसारख्या शहरांतून पाचशेवर अंतराळ स्टार्टअप्सनी आपले कार्य सुरू केले आहे. त्याचबरोबर आघाडीचे काही खासगी उद्योगदेखील अंतराळ व्यवसायात उतरले आहेत. यातील बहुतांश उद्योग हे स्वतंत्र्यरित्या, एकटेपणाने कार्यरत आहेत, त्यामुळे त्यांना तसेच ‘इस्त्रो’ या दोघांनाही कामाच्यादृष्टीने एकमेकांमध्ये गुंफणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर परदेशातीलही काही संस्था, संघटना, कंपन्या त्यांच्याशी व्यवसाय करू इच्छित आहेत. त्यामुळेच या सगळ्यांत समन्वय, संवाद आणि आदानप्रदान यांच्यासाठी ‘इंडियन स्पेस असोसिएशन’च्या (आयएसपीए) उभारणीचा खटाटोप केला गेला. कॉन्फेडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) आणि फेडरेशन आॅफ इंडियन चेंबर्स आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (फिक्की) यांच्यासारख्या देशपातळीवरील संस्थांशी याबाबतीत सहकार्य घेतले जाऊ शकते. ‘आयएसपीए’ने भारतीय अंतराळ उद्योगाच्या हितसंवर्धनासाठी प्रयत्नशील राहणे महत्त्वाचे असेल. ‘इस्त्रो’शिवाय, काही खासगी संस्थादेखील ‘आयएसपीए’च्या निर्मितीसाठी सरसावलेल्या आहेत. या कंपन्यांमध्ये भारती एअरटेलचे वन वेब, टाटा समूहातील नेलकॉम, लार्सन आणि टुब्रो, मॅप माय इंडिया, वालचंदनगर इंडस्ट्रीज आणि अल्फा डिझाईन टेक्नॉलॉजीज यांचाही समावेश होता. यातील इतर प्रमुख सदस्यांत, गोदरेज, ह्युजेस इंडिया, अनंथ टेक्नॉलॉजी लि.अजिस्ता-बीएसटी एरोस्पेस प्रा. लि. बीईएल, सेंटम इलेक्ट्रॉनिक्स आणि मॅक्सर इंडिया या कंपन्या आहेत.

भारताला जगातील व्यावसायिकदृष्ट्या आघाडीचे स्पेस हब करण्यासाठी व्यापक दृष्टीकोन देणे, त्याकरता संबंधित घटकांना एकत्रित गुंफून त्यांच्या कार्यसमन्वयातून धोरणात्मक चौकटीची निर्मिती करणे, त्याद्वारे पुढील वाटचाल करणे, त्यासाठी पूरक पर्यावरणीय स्थिती निर्माण करण्याचे कार्य ‘आयएसपीए’ बजावणार आहे. भारतीय अंतराळ उद्योगांसाठी जागतिक स्तरावरील वाटचालीसाठी पूरक यंत्रणेचे, लिंकेज तयार करण्याचे कार्य ही संस्था करेल. यातून उच्च दर्जाच्या कुशलतेचे रोजगार निर्मितीचे कार्य उभारण्यासाठी गुंतवणूक आणि गुंतागुंतीचे तंत्रज्ञान आणण्याचे कार्य करण्यालाही यामुळे मदत होणार आहे.

भारतातील खासगी अंतराळ उद्योगांच्या सहभागातून संशोधन, विकास, नावीन्य आणि गुंतवणूक हा देशात तसं पाहिलं तर कमी चर्चिला गेलेला विषय आहे. व्यापक प्रमाणात उपग्रहांची मालिका अंतराळ पाठवून हायस्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी देणे ते चंद्रावर काम करणारा यंत्रमानव साकारणे ते क्रायोजेनिक इंजिनाची निर्मिती करणे अशी अनेकविध विशिष्ट उद्दिष्टे समोर ठेवून खासगी अंतराळ उद्योग पुढे जात आहे. अशा प्रयत्नांना धोरणात्मक पाठबळ देणे, चौकट ठरवणे, बाजारपेठ शोधणे, त्याकरता सरकार आणि अन्य उद्योग समुहांशी संपर्कात राहणे महत्त्वाचे असते. अशा अनेकविध पूरक कामांकरता ते ‘एक खिडकी’सारखे कार्य बजावेल, अशी आशा आहे.

भारतीय अंतराळ उद्योगांकरता सर्व काही पुरवणारी संस्था म्हणून कार्य करून दाखवणे हेच मोठे आव्हान आता आहे. भविष्यात स्पेस एक्स, व्हर्जिन गॅलिक्टिक आणि ब्ल्यू ओरिजिनला आव्हानात्मक ठरू शकेल, असे भारतीय अंतराळ उद्योग आकाराला यावेत, याकरता आवश्यक सहाय्य आणि मदत मिळेल, असे काम त्यांनी करावे. भारताला जागतिक स्तरावरील अंतराळ खासगी पॉवरहाऊस बनवण्यासाठी ‘आयएसपीए’ने भूमिका निभावावी, हीच अपेक्षा.

(लेखक सामरिक विश्‍लेषक आहेत.)

loading image
go to top