अग्रलेख : मैत्री नि मुत्सद्देगिरी

PM Modi meets Chinese President Xi in Bishkek
PM Modi meets Chinese President Xi in Bishkek

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या त्रिशतकी विजयानंतर अवघ्या १५ दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून एकाच फटक्‍यात अनेक मुद्दे ऐरणीवर आणले आहेत! ‘शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन’ (एसओसी)च्या बिश्‍केक या किर्गिझस्तानाच्या राजधानीतील परिषदेत त्यांनी पाकिस्तानला लक्ष्य करत, थेट इशारा दिला. शिवाय, पाकिस्तानची सामरिक स्तरावर पाठराखण करणाऱ्या चीनपुढे मैत्रीचा हात पुढे करत, मैत्रीला मुत्सद्देगिरीची जोड देता येते, हेही दाखवून दिले. ‘एसओसी’ परिषदेनिमित्तच्या या दौऱ्याचा प्रारंभच मोदी यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेऊन केला आणि पाकिस्तानबाबतची आपली भूमिका ठामपणे मांडली. ही भेट होण्याच्या काही तास आधीच पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी काश्‍मीर खोऱ्यात केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे पाच जवान हुतात्मा झाले होते. या पार्श्‍वभूमीवर झालेल्या या भेटीत मोदी यांनी पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवल्या, तरच त्या देशाशी चर्चा होऊ शकते, असे स्पष्ट केले. हा सरळ सरळ पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना दिलेला कठोर संदेश आहे. मसूद अजहर या दहशतवादी म्होरक्‍याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यासंदर्भात आजवरचा आपला कोलदांडा चीनने मागे घेतल्यानंतर जिनपिंग यांच्याशी मोदी यांची ही पहिलीच भेट होती आणि त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झाले होते. या भेटीत मोदी यांनी जिनपिंग यांना भारतभेटीचे आमंत्रण देत चीन बॅंकेची भारतात स्थापना करण्याची विनंती केली. अर्थात चीनशी सहकार्य दृढ करण्याची भूमिका पं. नेहरू सातत्याने मांडत. या धोरणाचा पाया त्यांनी घातला, याचीही नोंद घ्यायला हवी.

भारताने चीनमार्फत पाकिस्तानला दिलेला संदेश अनेकार्थाने महत्त्वाचा आहे. पुलवामामध्ये ‘जैशे महंमद’च्या दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्याच्या जखमा ताज्या असतानाच, पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई केल्याशिवाय, त्या देशाशी बोलणी होणार नाहीत, असे मोदींनी स्पष्ट केले आहे. खरे तर ‘एसओसी’ परिषदेला दस्तुरखुद्द इम्रान खानही उपस्थित आहेत आणि परिषदेला रवाना होण्यापूर्वी ‘स्पुटनिक’ या रशियाच्या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भारताशी बोलणी करण्याची इच्छा प्रगट केली होती. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर मोदी यांना पाठवलेल्या अभिनंदनपर पत्रातही इम्रान यांनी अशाच भावना व्यक्‍त केल्या होत्या. मात्र, आता जिनपिंग यांनी अशा प्रकारे बोलणी सुरू करण्यास पाठिंबा दिल्यानंतरही मोदी यांनी ती विनंती अमान्य केली आहे. त्याच वेळी ‘हा भारत-पाक या दोन देशांमधील प्रश्‍न आहे!’ असेही त्यांनी जिनपिंग यांना ठणकावून सांगितले. याचा अर्थ स्पष्ट आहे. या संदर्भात चीनने काही दबाव आणण्याचा प्रयत्न केला, तरी तो आपण मानणार नाही, हेच मोदी यांनी अप्रत्यक्षरीत्या सूचित केले आहे. इम्रान यांनी आपल्या मुलाखतीत ‘पाकिस्तानला आता शस्त्रास्त्र खरेदीत पैसे घालवण्यात रस नसून, त्याच पैशातून देशाचा विकास करावयाचा आहे,’ असे सांगितले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचे हे इरादे ‘नेक’ असतील, तर दहशतवाद्यांच्या कारवायांना कठोरपणे पायबंद घालावा लागेल. त्यासाठी पाकिस्तानने ठोस पावले उचलली पाहिजेत.
‘एसओसी’ परिषदेच्या दुसऱ्या दिवशी मोदी यांनी चारच दिवसांपूर्वीच्या आपल्या श्रीलंका भेटीचा उल्लेख करून दहशतवादाचे भीषण स्वरूपही स्पष्ट केले. दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांनी एकत्र आले पाहिजे, ही भारताची पहिल्यापासून भूमिका असून, त्याचा पुनरुच्चारही पंतप्रधानांनी या वेळी केला आणि या परिषदेत सहभागी झालेल्या देशांना ‘हेल्थ’ असा सहा अक्षरी मंत्रही दिला. त्यांच्या या मंत्राचा आशय महत्त्वाचा आहे. ‘हेल्थ, इकॉनॉमिक, अल्टरनेटिव्ह कनेक्‍टिव्हिटी व्हाया वॉटरवेज, लिटरसी आणि टुरिझम’ अशा सहा स्तरांवर या परिषदेत सहभागी झालेल्या देशांनी एकत्र यायला हवे, असा त्याचा अर्थ आहे. त्यापासून अन्य देशांनी बोध घेऊन सहकार्याचा हात पुढे करण्याची गरज आहे. मोदी यांनी या परिषदेच्या निमित्ताने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचीही भेट घेतली. भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यावर काँग्रेसच्या काळात असलेल्या रशियाप्रेमाला तिलांजली देऊन भारत अमेरिकेच्या आहारी जाईल, अशी शंका पारंपरिक विचार करणारे व्यक्‍त करत होते. त्या टीकेला एका अर्थाने या परिषदेच्या माध्यमातून मोदी यांनी उत्तर दिले आहे. एकंदरीत ही ‘एसओसी’ परिषद मोदी यांनी चीनपुढे केलेला मैत्रीचा हात आणि दाखवलेली मुत्सद्देगिरी यामुळे लक्षात राहील, यात शंका नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com