
‘भा षा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे’ असे कविवर्य कुसुमाग्रज यांनी आपल्या एका कवितेत म्हटले आहे
तरुण भाषासंवर्धक
- वैभव चाळके
‘भा षा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे’ असे कविवर्य कुसुमाग्रज यांनी आपल्या एका कवितेत म्हटले आहे. ही कविता काश्मीर खोऱ्यापर्यंत पोहोचली की नाही हे माहीत नाही; मात्र या कवितेतील विचार काश्मीर खोऱ्यात पोहोचला आहे किंवा रुजला आहे.
श्रीनगरच्या नंदनवनात सुहैल सलीम या ३० वर्षीय तरुणाने उर्दू साहित्य आणि भाषेच्या जतन आणि संवर्धनाचे मोलाचे काम हाती घेतले आहे आणि ‘कोह-ए-मारन’ या मासिकाच्या माध्यमातून तो ते समर्थपणे करतो आहे. सलीम या तरुण विद्वान लेखकाने निर्माण केलेले हे नवे व्यासपीठ जम्मू-काश्मीर खोऱ्यातील नव्या पिढीच्या लेखकाला, वाचकाला उर्दू साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी प्रेरणा देते आहे.
२०२१ च्या जुलैमध्ये ‘कोह-ए-मारन’ या त्रैमासिकाची सुरुवात झाली. लवकरच श्रीनगरमधील उर्दू भाषेत विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून ते नावारूपास आले. उर्दू साहित्य हे सांस्कृतिक वारसा म्हणून अत्यंत महत्त्वाचे आहे, हे सर्वांनीच मान्य केले आहे. या त्रैमासिकाच्या माध्यमातून काश्मीरमध्ये भाषेचे महत्त्व समाजमनावर ठसवले जाते आहे. प्रतिभावंत तरुण लेखकांना स्वतःला व्यक्त करण्यासाठी एक महत्त्वाचे माध्यम बनून राहिले आहे.
सुहैल सलीम यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या त्रैमासिकात त्यांनी उर्दूत लिहू पाहणाऱ्या महिला कथाकरांना प्रोत्साहित केले आहे. त्यांच्या लेखनावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ‘हरफी शेहरीनर’ आणि ‘तबसुम झिया के अफसाने’ या दोन साहित्यकृती ही या त्रैमासिकाने दिलेली प्रतिभेची देणी आहेत असे मानले जाते.
उपेक्षित आवाजांना सशक्त बनवण्याचे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे मोठे काम सलीम करत आहेत. ‘कोह-ए-मारन’ हे केवळ नवोदित लेखकांसाठीचे त्रैमासिक नाही, तर प्रस्थापित लेखकसुद्धा या त्रैमासिकाच्या माध्यमातून लेखन करीत आहेत. त्यांनाही हे व्यासपीठ महत्त्वाचे वाटते आहे. अल्पावधीत सलीम यांनी हे मोठे यश मिळवले आहे.
त्यांनी स्थानिक आणि राष्ट्रीय नियतकालिकांमध्ये ३०० हून अधिक लेख लिहिले आहेत. सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक विषयांवर अभ्यासपूर्ण दृष्टिकोन मांडला आहे. सुहैल ‘जम्मू आणि काश्मीर फिक्शन रायटर्स गिल्ड’मध्ये सक्रियपणे योगदान देत आहेत.
समविचारी व्यक्तींसोबत या प्रदेशातील साहित्यसंपदा वाढीस लागावी यासाठी झटत आहेत. याव्यतिरिक्त राजस्थान विद्यापीठातून उर्दू साहित्यात एम.फिल. करत असतानाच ते श्रीनगरमधील एका स्थानिक संस्थेत समर्पित उर्दू शिक्षक म्हणून काम करत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये भाषेबद्दल आवड निर्माण करत आहेत.
त्यांच्या भविष्याबद्दलच्या आकांक्षेबद्दल त्यांनी म्हटले आहे, ‘मी अशा काश्मीरची कल्पना करत आहे, जिथे उर्दू साहित्याची भरभराट होईल, जिथे तरुण मनांना या सुंदर भाषेच्या अंतर्गात शिरण्यासाठी प्रेरित केले जाईल. ‘कोह-ए-मारन’च्या माध्यमातून परंपरा आणि आधुनिकता एकत्र आणली जाईल. पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देणारे साहित्यिक घडतील.’
काश्मीरमधील उर्दू साहित्याच्या जतन आणि संवर्धनासाठी सुहैल यांचे हे समर्पण प्रेरणादायी आहे. त्यांच्या ‘कोह-ए-मारन’ मासिकाचा प्रभाव वाढत आहे. त्याच्या प्रकाशाने काश्मीरबाहेरचा प्रदेश केव्हाच पादाक्रांत केला आहे. उर्दू लेखक आणि उर्दू रसिकांसाठी सलीम प्रेरणा, आधार आणि आशा झाले आहेत. ज्या भाषेला सलीम यांच्यासारखा साहित्यिक कार्यकर्ता लाभतो, त्या भाषेचे भविष्य उज्ज्वल असणार यात शंका नाही.