राजकीय नेत्यांच्या मते

राजकीय नेत्यांच्या मते

जनताच आणेल ‘अच्छे दिन’
सीताराम येचुरी, सरचिटणीस, माकप ः ‘अच्छे दिन’ची हूल देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या चार वर्षांतच, ‘‘अच्छे दिन राहू द्या, निदान २०१४ मध्ये होते ते तरी दिवस आणा,’’ अशी व्याकूळ हाक जनता मारत आहे.

महागाईचा कहर झालाय. सामान्यांना वस्तुस्थितीपासून दूर नेणारे, भ्रमित करणारे आणि घटनात्मक, लोकशाही मूल्याची मोडतोड करणाऱ्या या सरकारच्या सत्ताभ्रष्टतेसाठी धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकजूट करावी.

कर्नाटकापासून त्याची सुरवात झाली आहे. मनमोहन देसाईंच्या चित्रपटांप्रमाणेच हे सरकार आणि त्याचे प्रमुख रोज नवनव्या घोषणांमुळे लोकांना वस्तुस्थितीचा विसर पाडतंय. दोन कोटी रोजगारांचे आश्‍वासन हवेतच विरले. पेट्रोल दरवाढ, महागाईने सामान्य गांजलेत. सरकार त्या आघाड्यांवर साफ अपयशी ठरलंय. दुसरीकडे, कथित लव्ह जिहाद विरोधातील गोरक्षकांच्या टोळ्या खासगी सैन्यासारखे काम करताहेत. वरून ‘भक्कम पाठिंबा’ असल्यानेच त्यांचे उद्योग वाढताहेत. गुजरात, राजस्थानमध्ये दलितांवरील हल्ले वाढणे कशाचे द्योतक आहे?

कर्नाटकातील प्रचारात आपण काय पाहिले, काय केले सांगण्यापेक्षा मोदींचा भर जवाहरलाल नेहरू व सरदार पटेल यांच्याबाबत बोलण्यावरच होता. निवडणुकीत बहुमत मिळाले नाही तेव्हा सत्तेसाठी जे प्रकार केले त्याने लोकशाहीची विटंबनाच झाली. या सरकारने लोकशाहीच नव्हे, तर देशाची अखंडताही धोक्‍यात आणली. कच्च्या तेलाच्या किमती कमी होत्या तेव्हा मोदी सरकारने देशातील पेट्रोल-डिझेलचे दर घटविण्याऐवजी सरकारची तिजोरी भरली. हे सरकार श्रीमंतांनाच धार्जिणे आहे. गरिबांशी त्यांना देणे-घेणे नाही. देशातील ७३ टक्के संपत्ती एक टक्का वर्गाकडे आहे. गरीब श्रीमंतांतील दरी चार वर्षांत रुंदावली. या सरकारची केवळ घोषणाबाजी जनतेच्या लक्षात येत आहे. त्यांच्यापासून मुक्तता मिळवून जनताच आपल्यासाठी ‘अच्छे दिन’ आणेल.

असहिष्णुतेचे वातावरण
साैगत राय, तृणमूल काँग्रेस ः सातत्याने थापेबाजी आणि तपास संस्थांच्या गैरवापराने राजकीय विरोधकांचा आवाज दाबणे ही मोदी सरकारची वैशिष्ट्ये आहेत. भविष्यात हे सरकार सूडबुद्धीसाठीच ओळखले जाईल. देशात असहिष्णू वातावरण आहे. रोजगारनिर्मिती दूरच; पण नोटाबंदी, जीएसटीद्वारे सरकारने गरिबांच्या पोटावर लाथ मारली. घटनात्मक संस्थांची मोडतोड होतेय. सत्ताधाऱ्यांना लोकशाही, राज्यघटना, विरोधकांबद्दलचा आदर, आरक्षण काहीही नको आहे. अशा शक्तींच्या पराभवासाठी विरोधकांना एकत्र यावेच लागेल. विरोधकांनी कोण मोठा, कोण छोटा वाद घातल्यास लोकशाहीच संपेल. जनतेलाही मोदी सरकारचा खोटेपणा लक्षात येतोय. २०१९ मध्ये जनतेच्या संताप मतदानातून व्यक्त होईल.

भ्रष्टाचारमुक्त कारभार
के. सी. त्यागी, राष्ट्रीय प्रवक्ते, संयुक्त जनता दल : पंतप्रधान मोदी आणि मंत्रिमंडळाचा कार्यकाळ उल्लेखनीय राहिला. भ्रष्टाचाराचा आरोपदेखील नाही. कृषी क्षेत्रासाठी खतपुरवठा, सिंचन, शीतगृह उभारणीची मोठी कामे सरकारने केली. शेतीमालाला ‘दीडपट आधारभूत किमती’वरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. मागासवर्गीयांना उद्देशून डॉ. आंबेडकरांच्या महिमावृद्धीचे बरेच कार्यक्रम सरकारने केले, मात्र उना प्रकरण, रोहित वेमुला आत्महत्या आणि ॲट्रॉसिटी ॲक्‍ट बोथट करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सरकारची ढिलाई या घटनांनी दलितांसाठी आणखी काम सरकारने केले पाहिजे, हे अधोरेखित झाले. अल्पसंख्याकांचे सशक्तीकरण ‘हुनर’द्वारे होतेय. परंतु भाजपमधील उपद्रवी घटकांमुळे ‘सबका साथ सबका विकास’ हा पंतप्रधानांचा मूलमंत्र निरर्थक ठरतोय. अधी अकलाख, तर कधी पहलू खानची हत्या यांसारख्या घटना सामाजिक समरसतेला बाधा आणतात. विशेष म्हणजे या उपद्रवाला सत्ताधारी नेत्यांकडून मिळणारे संरक्षण चिंताजनक आहे. 

जनतेच्या पदरी निराशाच
असदुद्दिन ओवैसी, एमआयएम ः मोदी सरकारच्या चार वर्षांनी सामान्यांना निराशेशिवाय काहीच दिलेले नाही. जनता या सरकारला धडा शिकवणारच. मोदी यांना जनतेच्या हालांची जाणीव असेल तर त्यांनी मुदतपूर्व लोकसभा निवडणूक घेऊन दाखवावी. कारण त्यांच्या सरकारला सर्वसामान्य जनतेच्या भल्याचा कारभारच करता येत नाही, हे सिद्ध झालंय. ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’, या मोदींच्या भूलथापांचे पितळ नीरव मोदी-मेहूल चोकसींनी उघडं पाडलंय. भगवा हा देशाचा एकमेव रंग नाही; किंबहुना हिरवा आणि पांढरा रंग असल्याशिवाय तिरंग्याला पूर्णत्व नाही, हे संघपरिवार हेतूतः लक्षात घेत नाही. सत्ताधाऱ्यांना जनता धडा शिकवेल; वर्षभरच थांबा.

चार साल, जनता बेहाल
रणदीप सुरजेवाला, मुख्य प्रवक्ते, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार जनतेच्या घामाचे पाच हजार कोटी रुपये जाहिरातबाजीवर खर्चून अपयशाचा डिंडिम वाजवत आहे. या सरकारची अवस्था ‘चार साल आणि जनता बेहाल’ अशी आहे. पहिल्या शंभर दिवसांत येणारे ७० लाख कोटी रुपये कुठे गेले, बॅंक खात्यात जमा होणाऱ्या पंधरा लाखांचे काय झाले, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट आधारभूत किमतीचे काय झाले, दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या कुठे आहेत आणि लघू-मध्यम उद्योगांच्या प्रगतीची झळाळी कुठे हरवली, असे प्रश्‍न विचारावेसे वाटतात. देशात दलित, आदिवासी, अल्पसंख्याक अत्याचाराचे बळी ठरलेत.

शासनही नाही आणि प्रशासनही नाही, अशी स्थिती आहे. ‘झिरो गव्हर्नन्स आणि मॅक्‍झिमम गव्हर्न्मेंट’, हा मोदींचा नवा मंत्र बनलाय. राष्ट्रीय सुरक्षेचा खेळखंडोबा उडालाय. पंतप्रधान चीनच्या दौऱ्यावर जाऊनही, चीनने डोकलामवरील ताबा सोडावा हे सांगण्याची हिंमत करत नाहीत. भारताचा सर्वांत विश्‍वासू मित्र रशिया पाकिस्तानसोबत लष्करी कवायत करतोय, त्याला शस्त्रास्त्रे पुरवतोय. आपण मित्रच गमावला आहे. गुजरातपासून अतिशय जवळ असलेल्या पाकिस्तानातील ग्वादर बंदरात चीनची पाणबुडी तैनात आहे. चोहोबाजूंनी भारताला घेरण्याचा प्रयत्न आहे. आंतरराष्ट्रीय ते देशांतर्गत मुद्द्यांपर्यंत सरकार अपयशी ठरलंय. कर्नाटकच्या जनतेने मोदींच्या अहंकाराला आणि भाजपच्या धनशक्तीला सत्याचा आरसा दाखवला. कर्नाटकमध्ये लोकशाही व घटनेचा विजय झाला. आता पाचवे वर्षे मोदी सरकारसाठी ‘गाशा गुंडाळून घरी जाण्याचे’ असेल.

आश्‍वासनांना हरताळ
तारिक अन्वर, खासदार आणि सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस : मोदी सरकारची चार वर्षांची कारकीर्द अतिशय निराशाजनक ठरली. संपूर्ण देशाला फसवल्यासारखे वाटतंय. सरकार किंवा पंतप्रधानांनी दिलेली आश्‍वासने पूर्ण झालेली नाहीत.  शेतकरी, बेरोजगार यांचे प्रश्‍न सोडवण्यापासून काळा पैसा, भ्रष्टाचार, महागाई रोखण्यात सरकार अपयशी ठरलंय. चार वर्षांत विकासदर घटला. अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. बेरोजगारी अक्राळविक्राळ वाढली. शेतकऱ्यांना २०२२ पर्यंत उत्पन्न दुप्पट करण्याचे दिलेले आश्‍वासन मृगजळ ठरलंय. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडलेत. पंतप्रधानांना परदेश भ्रमंतीमध्ये जास्त रूची आहे; परंतु त्याचा देशाला काय फायदा झाला, हे अस्पष्ट आहे. भाजपचे अध्यक्ष म्हणतात की, निवडणुकांमधील आश्‍वासन जुमला होते. जे स्वतःचा शब्द फिरवतात, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवावी? सरकारचे लक्ष प्रसिद्धी आणि मीडिया मॅनेजमेंटवरच आहे. देशासमोरचे मूलभूत प्रश्‍न कायमच आहेत.

त्यांच्याकडे लक्ष देण्यास पंतप्रधानांना सवड नाही. सामाजिक आघाडीवरील परिस्थिती चिंताजनक आहे. दलित, अल्पसंख्याक, मागासवर्गीय, विचारवंत, पत्रकार सर्वांमध्ये भीतीचे वातावरण आहे. धर्मनिरपेक्षतेची संस्कृृती नष्ट करण्याचे आणि संकीर्ण विचारसरणी लादण्याचे प्रयत्न सुरू आहेत. देशात विकासाऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबविला जातोय. भ्रष्टाचाराच्या मुद्याचे भांडवल करून भाजपने सत्ता मिळवली. तथापि, बॅंकांमधील भ्रष्टाचार पाहता, हे स्पष्ट होते की या सरकारला त्याचे काही सोयरसुतक नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com