‘ब्रॅंडिंग’ तंत्राची राजकीय किमया!

‘ब्रॅंडिंग’ तंत्राची राजकीय किमया!

यापुढील काळात राजकीय नेतृत्वाची महत्त्वाकांक्षा असणाऱ्यांसाठी यशस्वी ब्रॅंडिंगचं तंत्र आणि मंत्र आत्मसात करणं महत्त्वाचं ठरणार आहे. या तंत्रातली पहिली महत्त्वाची बाब आहे वेगळेपण. आपलं वेगळेपण कशात आहे हे ओळखून ते सुस्पष्टपणे जगासमोर मांडणं, हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. 

भारतात संसदीय लोकशाही असली, तरीही निवडणुकांना मात्र दिवसेंदिवस ‘अध्यक्षीय स्वरूप’ येऊन लागलं आहे. म्हणजे पक्ष अथवा आपल्या मतदारसंघातील उमेदवार यापेक्षा प्रमुख पक्षांचे नेते, त्यांचं व्यक्‍तिमत्त्व, त्यांचं आवाहन किंवा थोडक्‍यात म्हणजे त्यांचा ‘ब्रॅंड’ याकडे पाहून मतदार मतदान करताना दिसतात. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी हे सर्व कमी-जास्त प्रमाणात कळत-नळकत ब्रॅंड झाले होतेच; पण जाणीवपूर्वक आणि काही योजना आखून राजकीय नेत्यांच्या ब्रॅंडिंगची सुरवात राजीव गांधी यांच्यापासून झाली असे म्हणता येईल. ही प्रक्रिया नरेंद्र मोदींच्या रूपात एका वेगळ्याच पातळीवर पोचली आहे.

नुकत्याच महाराष्ट्रात पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील भाजपचं यश हे ‘ब्रॅंड देवेंद्र फडणवीस’चं यश होतं असं म्हणता येईल. कारण राज्यभर सभांचा धडाका लावून त्यांनी प्रचाराची धुरा एकहाती सांभाळली एवढंच नाही, तर भाजपच्या प्रचार मोहिमेचा ते एकमात्र चेहरा होते. अर्थातच यापुढील काळात राजकीय नेतृत्वाची महत्त्वाकांक्षा असणाऱ्यांसाठी यशस्वी ब्रॅंडिंगचं तंत्र आणि मंत्र आत्मसात करणं महत्त्वाचं ठरणार आहे. या तंत्रातली पहिली महत्त्वाची बाब आहे वेगळेपण. आपलं वेगळेपण कशात आहे, हे ओळखून ते सुस्पष्टपणे जगासमोर मांडणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. यशस्वी राजकीय नेते अनेक असतात. यशस्वी राजकीय ब्रॅंड मात्र महात्मा गांधी, इंदिरा गांधी, नरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे असे मोजकेच! दोन्हीतला फरक म्हणजे यशस्वी ब्रॅंडस्‌ची समकालीन राजकीय नेत्यांपेक्षा स्पष्टपणे वेगळी अशी ओळख असते. एकाला झाकावं आणि दुसऱ्याला काढावं हे त्यांच्या बाबतीत शक्‍य नसतं!

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे काही एक मोठं ध्येय समोर असणं. हे राजकीयच नव्हे, तर सर्वच क्षेत्रांतील ब्रॅंड्‌ससाठी आवश्‍यक आहे. खरंतर या ध्येयामुळेच रोजच्या वापरातील सर्वसामान्य प्रॉडक्‍टचा एक ‘ब्रॅंड’ बनतो. बराक ओबामा यांनी ‘येस वुई कॅन’ अशी सकारात्मक घोषणा लोकांच्या मनावर बिंबवली, तर नूतन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मतदारांसमोर ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ हे ध्येय ठेवलं. अगदी अलीकडे फडणवीसांनी महाराष्ट्रातील जनतेला ‘परिवर्तन तर होणारच’ असा विश्‍वास दिला.

मतदारांना आपण सर्वसामान्य निवडणुकीत मतदान करत नसून देशाला किंवा राज्याला महान बनविण्यात, परिवर्तन घडविण्यात सहभागी होत आहोत याचं समाधान मिळालं. ‘इंदिराजी कहती है गरीबी हटाव और विपक्षी कहते हैं इंदिरा हटाव’ या एका वाक्‍यानं १९७१च्या निवडणुकीचा निकाल निश्‍चित केला! यानंतरची महत्त्वाची बाब म्हणजे आपली संपूर्ण मोहीम ज्याभोवती उभारली जाईल, असं एक आकर्षक घोषवाक्‍य. जे सोपं, सहज लक्षात राहील असं, विश्‍वासार्ह आणि परिणामकारक असायला हवं. कधी ते, आपण लोकांसमोर काय मोठं ध्येय ठेवतो, त्यावर आधारित असू शकेल - उदा. १९४२ च्या चळवळीचं घोषवाक्‍य, ‘करेंगे या मरेंगे’. किंवा आपण जनतेला कुठलं प्रमुख वचन देत आहोत यावर आधारित, ‘सब का साथ, सब का विकास’ असंही असू शकेल.

यशस्वी राजकीय ब्रॅंड बनण्याची एक अत्यंत महत्त्वाची पायरी म्हणजे स्वतःला निवडणुकीच्या कॅम्पेनचा चेहरा बनविण्याची तयारी. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला, ‘हा माझा शब्द आहे’ असं आश्‍वासन देऊन स्वतःची वैयक्‍तिक विश्‍वासार्हता पणाला लावली, तेव्हा लोकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. नरेंद्र मोदीसुद्धा आज बिहारनंतर उत्तर प्रदेशातही भाजपच्या कॅम्पेनचा चेहरा बनले आहेत. यात पराभव झाला, तर आपल्या वैयक्‍तिक ब्रॅंडला धक्‍का लागेल, ही शक्‍यता असतेच; पण तो धोका पत्करावा लागतो. तसंच आपल्या ब्रॅंडचं व्यक्‍तिमत्त्व (personality),  मूल्य (values), जडण-घडण (architecture) यांच्याशी सुसंगत आणि त्यांना अधिक बळ देणाऱ्या अशा प्रतिमा, आठवणी, संकल्पना (Brand imagry and Brand Associations) इत्यादींचा जाणीवपूर्वक वापर करणंही महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ, प्रस्थापित राजघराण्यांना आव्हान देण्यासाठी स्वकष्टानं पुढं आलेला एक सामान्य माणूस आणि ‘आऊटसायडर’ या नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला, ‘चायवाला’ या संकल्पनेनं मोठंच बळ दिलं! किंवा गोरगरीब जनतेचे कल्याण करणारी ‘अम्मा’ या जयललितांच्या प्रतिमेला स्वस्तात जेवण देणारी ‘अम्मा कॅंटीन’ ही कल्पना खूपच पूरक ठरली. 

कुठलीही निवडणूक ही पोकळीत घडत नसल्यामुळे तत्कालीन संदर्भ, लोकांच्या विचारांना व वागणुकीला वळण देणाऱ्या मेगा ट्रेंड्‌स व एकंदरित राजकीय व सामाजिक परिस्थिती यांचा राजकीय नेत्यांच्या ब्रॅंडिंगवर महत्त्वाचा परिणाम होतो हे निश्‍चित असलं तरीही वर उल्लेखिलेल्या काही बाबी या ब्रॅंडिंगच्या प्रक्रियेत नेहमीच महत्त्वाच्या ठरतात. ब्रॅंडिंग हे कधीही आपोआप घडत नाही, तर ते जाणीवपूर्वक, योजनाबद्ध रीतीनं घडवावं लागतं. ते संबंधित राजकीय नेत्याचा मूळ स्वभाव, शैली, जीवनमूल्य, व्यक्‍तिमत्त्व, कौशल्य यांच्याशी सुसंगत असावं लागतं. अशा रितीनं आखलेली ब्रॅंडिंगची योजना ही अत्यंत सातत्यपूर्ण पद्धतीनं अमलात आणावी लागते. सातत्य हा यशस्वी ब्रॅंडिंगचा प्राण आहे असं म्हणता येईल!
यापुढील काळात निवडणुकांमध्ये राजकीय नेत्यांच्या ब्रॅंडिंगचं महत्त्व वाढतच जाणार हे निश्‍चित!
(लेखक ‘ब्रॅंडिंग’च्या क्षेत्रात काम करतात.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com