भोजनभाऊंची चंगळ! (अग्रलेख)

narendra modi fitness
narendra modi fitness

अलीकडे राजकारणातील प्रतीकात्मकता, इव्हेंटबाजीचे प्रमाण खूपच वाढले आहे. राजकीय पक्षांच्या इफ्तार पार्ट्यांना आलेला जोर त्यामुळेच अनपेक्षित नाही; पण त्यातून काही निष्पन्न होण्याची शक्‍यताच नाही.

एकीकडे गुजरात विधानसभा निवडणुकीपासून अलीकडेच पार पडलेल्या कर्नाटक निवडणुकीतही मंदिरांत जाऊन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी माथा टेकवत आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रमजानच्या पवित्र महिन्यात इफ्तार पार्ट्या आयोजित करत आहे. काळ बदलला, हेच खरे! दरवर्षी नेमेचि येणाऱ्या पावसाळ्याबरोबर रमजानचा महिनाही येतो आणि रोजे सुटण्याच्या वेळी इफ्तारच्या पार्ट्या रंगू लागतात! मुस्लिम समाजातील ही प्रथा आता अन्य धर्मीयांमध्येही लोकप्रिय होत आहे आणि त्याचे कारण अर्थातच त्या पार्ट्यांमधील चटकदार खाद्यपदार्थांमध्ये असते. त्यामुळेच रमजानच्या महिन्यात मुंबईतील महमद अली रोड आणि त्या आसपासच्या खाऊ गल्ल्यांमधील तुफानी गर्दीत मुस्लिमांबरोबरच अन्य धर्मीयांचाही मोठा भरणा असतो. राजकारण्यांना तर आपापल्या ‘मतपेढ्या’ सुरक्षित राखण्यासाठी वा नव्याने निर्माण करण्यासाठी चालून आलेली ही मोठीच संधी असते! त्यातच निवडणुका तोंडावर आलेल्या असल्या, तर अशा पार्ट्यांना ऊत येतो. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, तसेच माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून वादळ उठवत असतानाच, काँग्रेस व भाजप या प्रतिस्पर्धी पक्षांनी एकाच दिवशी इफ्तार पार्ट्या आयोजित केल्या आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. लगोलग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भक्‍तगणांनी ‘सिटिझन मुखर्जी’ हे काँग्रेसच्या इफ्तार पार्टीला उपस्थित राहणार नाहीत, अशा पुड्या सोडायला सुरवात केली. मात्र मुखर्जीच नव्हे, तर आणखी एक माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी राहुल यांच्या पार्टीला हजेरी लावली आणि काँग्रेसजनांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला.
खरेतर आपल्या देशात अशा पार्ट्या नव्या नाहीत आणि देशाचे पंतप्रधानच रमजानच्या महिन्यात अशी पार्टी सातत्याने आयोजित करत आले आहेत. मात्र, मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेताच, या रिवाजाला तिलांजली दिली! पण यंदाचा रमजान काही वेगळाच रंग घेऊन आला आहे. त्यामुळेच गेली दोन वर्षे काँग्रेसनेही या पार्टीकडे पाठ फिरवली असताना, राहुल यांनी अध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेताच यंदा मात्र ती आयोजित केली. नेमका तोच मुहूर्त साधून भाजपचे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनीही अशीच पार्टी आयोजित केली आणि या पार्ट्यांना नेहमीपेक्षा अधिक गडद असा राजकीय रंग चढला! राहुल यांनी यंदा ही पार्टी आयोजित करण्यामागे अर्थातच विरोधी पक्षांची लोकसभा निवडणुकीसाठी होऊ घातलेली आघाडी हे कारण होते, तर नक्वी यांना अशी पार्टी आयोजित करण्याची सुबुद्धी सुचली, त्यास गुजरात- कर्नाटक, तसेच नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल कारणीभूत होते, हे स्पष्ट आहे! मात्र, दस्तुरखुद्द मोदी हे त्या पार्टीपासून चार हात दूरच राहून आपल्या ‘फिटनेस’चे दर्शन घडवणारे व्हिडिओ व्हायरल करण्यात मग्न असताना, त्याच सायंकाळी पंतप्रधानांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मात्र अहमदाबादेत आयोजिलेल्या इफ्तार पार्टीला आवर्जून उपस्थित राहिल्या आणि त्यांनी काही मुस्लिम महिलांना त्यांचा रोजा सोडण्यास चक्‍क घास भरवून मदतही केली. राजकारणाचे हे बदलते रंग आम आदमीला मात्र थक्‍क करून सोडणारेच होते!
काँग्रेसच्या या पार्टीला भले मुखर्जी आणि प्रतिभा पाटील असे दोन माजी राष्ट्रपती उपस्थित राहिले असले, तरी त्यानंतरही राहुल यांची निराशाच झाली असणार; कारण भावी आघाडीतील १८ पक्षांच्या बड्या नेत्यांना या पार्टीचे आमंत्रण असतानाही, त्यांनी स्वत: उपस्थित राहण्याचे टाळले. पण पक्षाच्या दुसऱ्या फळीतील नेते या पार्टीला जातील, अशी काळजीही त्यांनी घेतली होती. हे अर्थातच राजकारण आहे. शिवाय, ‘एमआयएम’चे असदुद्दीन ओवेसी यांनी या पार्टीची संभावना ‘जानवेधाऱ्यां’ची इफ्तार पार्टी अशा शब्दांत केली! त्यापलीकडची बाब म्हणजे या पार्टीला कोणताही बडा मुस्लिम नेता हजर नव्हता. नक्वी यांच्या पार्टीला रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर आदी मंत्री उपस्थित होते. भाजपने आयोजित केलेली ही पार्टी म्हणजे ‘सोशल इंजिनिअरिंग’ आहे, तर काँग्रेसचे मात्र ‘पोलिटिकल इंजिनिअरिंग’ आहे, असे नक्वी म्हणाले. याचा अर्थ ‘तुम्ही खाल्ले तर शेण, आम्ही खाल्ले तर मात्र गोमय!’ अर्थात, हेही राजकारणच झाले. एक मात्र खरे. अलीकडे राजकारणातील प्रतीकात्मकता, इव्हेंटबाजीचे प्रमाण खूपच वाढले असून, राजकारणातील हा पोकळपणा हे दुर्दैवाने आपल्याकडचे वैशिष्ट्य बनू लागले आहे. त्यामुळेच भोजनभाऊंची चंगळ यापेक्षा अधिक अशा पार्ट्यांमधून काहीही निष्पन्न होणे कठीणच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com