उत्तर प्रदेशातील राजकीय ‘दंगल’!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या तोंडावर चिरंजीव अखिलेश व बंधू शिवपाल यांच्यातील वर्चस्वाच्या कुस्तीचा निकाल मुलायमसिंह यांना लावावा लागेल; अन्यथा पक्षातच ‘दंगल’ सुरू झाल्याचे त्यांना बघावे लागेल! 
 

उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या तोंडावर चिरंजीव अखिलेश व बंधू शिवपाल यांच्यातील वर्चस्वाच्या कुस्तीचा निकाल मुलायमसिंह यांना लावावा लागेल; अन्यथा पक्षातच ‘दंगल’ सुरू झाल्याचे त्यांना बघावे लागेल! 
 

आमीर खानचा ‘दंगल’ हा चित्रपट तिकीटबारीवर मोठे यश मिळवत असतानाच, देशातील सर्वांत मोठ्या राज्यात नववर्षात होणाऱ्या पहिल्यावहिल्या ‘दंगली’चे डिंडिम जोमाने वाजू लागले आहेत! एकीकडे नोटाबंदीचा संबंध देशभक्‍तीशी जोडण्यात भाजपने मिळवलेले यश, त्या पार्श्‍वभूमीवर अपरंपार हालअपेष्टांना तोंड द्यावे लागत असूनही पाळावी लागत असलेली चुप्पी आणि समाजवादी पक्षाने अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली लावलेला विकासकामांचा धडाका, असे काही मुद्दे उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या अजेंड्यावर आहेत. त्यामुळेच या राज्यात सत्ता मिळवण्यासाठी उतावीळ झालेल्या भाजपसह सर्वच प्रमुख पक्ष या राजकीय ‘दंगली’त सामील झाले असले, तरी त्यातील खरी कुस्ती ही सत्ताधारी समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव आणि त्यांचे मुख्यमंत्री चिरंजीव अखिलेश यादव यांच्यातच सुरू असल्याचे गेले काही महिने स्पष्ट दिसत आहे! अर्थात, मुलायमसिंह हे मुरब्बी राजकारणी असल्यामुळे, त्यांनी ही कुस्ती ‘प्रॉक्‍झी’ पद्धतीने स्वत: मैदानात न उतरता खेळायचे ठरवलेले दिसते. मुलायमसिंह यांनी आपल्याऐवजी मैदानात आपले बंधू आणि उत्तर प्रदेश ‘सप’चे अध्यक्ष शिवपाल यादव यांना अखिलेश यांच्या विरोधात आखाड्यात उभे केले असून, बराच काळ सुरू असलेली खडाखडी  निवडणुका कधीही जाहीर होतील, हे लक्षात आल्यामुळे दोघेही भिडू प्रतिस्पर्ध्याला चितपट करण्यासाठी ना ना प्रकारचे डावपेच अंगीकारताना दिसत आहेत! मात्र, समाजवादी पक्षाच्या कट्टर विरोधक मायावती यांनी शहाला प्रतिशह या स्वरूपाची आणखी एक खेळी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन केल्यामुळे आता ही ‘दंगल’ आमीर खानच्या दंगलीपेक्षाही अधिक औत्सुक्‍याची ठरणार, असे दिसू लागले आहे.

शिवपाल यांनी यापूर्वीच ‘सप’च्या ४०३ पैकी १७५ उमेदवारांची यादी जाहीर केली असून, या दोहोंमध्ये सुरू असलेल्या सुंदोपसुंदीचे खरे कारण हे उमेदवारांची निवड कोण करणार, हेच असल्याने अखिलेश यांनीही आपल्या सर्व म्हणजे ४०३ उमेदवारांची यादी मुलायमसिंहांकडे सुपूर्द केली आहे!

अखिलेश यांनी आपल्या यादीतून शिवपाल यांच्या यादीतील अनेक ‘बाहुबलीं’ना घरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळेच उमेदवारांची यादी हाच या कुस्तीतील निकाली डाव ठरणार असून, त्यामुळे एकीकडे अखिलेश यांच्या प्रतिस्पर्ध्याची, तर वेळ आल्यावर ‘रेफ्री’ची भूमिका बजावणाऱ्या मुलायमसिंह यांची पंचाईत होऊ शकते! मुलायमसिंहांना अधिकच पेचात पकडण्यासाठी अखिलेश यांनी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचा डाव टाकला आहे. त्याच वेळी केंद्रातील सत्तेच्या माध्यमातून भाजप आपल्या हाती असलेल्या गुप्तचर यंत्रणा, तसेच प्राप्तिकर विभाग यांच्यामार्फत ‘सप’वर दबाव टाकून, समाजवादी पक्षाला काँग्रेसशी आघाडी करण्यास भाग पाडत आहे, असा गौप्यस्फोट मायावती यांनी केला आहे! त्यांचा हा दावा प्रथमदर्शनी हास्यास्पद वाटूही शकेल; पण समाजवादी पक्षात फूट पडलीच, तर मग मुस्लिम आपल्याकडे येतील, या गृहीतकास अखिलेश-काँग्रेस आघाडी शह देण्याची शक्‍यता दिसू लागल्यानेच मायावती यांनी हा बादरायण संबंध जोडलेला दिसतो. मात्र, मायावती यांचा हा सारा युक्‍तिवाद हा समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांची आघाडी होणार, या गृहीतकावर आधारित आहे. शिवाय, काँग्रेस-सप आघाडीबाबत अद्याप सारेच अधांतरी आहे. अखिलेश यांनी अशा आघाडीचे सूतोवाच करण्यामागील एकमात्र कारण हे पिताश्री मुलायमसिंह आणि काकाश्री शिवपाल यांच्यावर दबाव टाकणे, हेच  आहे आणि अशी आघाडी खरोखरच झाली, तर ती भाजप, तसेच मायावती या दोहोंनाही अडचणीत आणू शकते. त्यामुळे भाजप असे काही डावपेच आखत असेल, हे गृहीत धरणे कठीण आहे. मात्र, मायावती यांनी या युक्‍तिवादास स्वत:च एक ‘रायडर’ घालून ठेवले आहे. ही आघाडी आपल्या फायद्याची ठरेल, असे अंतिमत: स्पष्ट झाल्यावरच भाजप त्यासाठी शेवटच्या क्षणी आपला दबाव वाढवेल, असे मायावती म्हणतात! याचाच अर्थ मायावती यांच्याकडेही यासंबंधात काही ठोस माहिती नाही. त्यामुळे समाजवादी पक्षातील घरभेदी राजकारणाला वैतागलेल्या उत्तर प्रदेशाच्या जनतेला अधिकच संभ्रमित करण्यापलीकडे ‘बहेनजीं’चा वेगळा उद्देश दिसत नाही. 

निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यावर आपल्याच घरातील कुस्त्यांचा निकाल ‘रेफ्री’ मुलायमसिंह यांना लावावाच लागेल; अन्यथा पक्षातच खऱ्या अर्थाने दंगल सुरू झाल्याचे त्यांना बघावे लागेल! सुदैवाने नोटाबंदीच्या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर जाती-पातींमधील, तसेच धार्मिक तणाव हे मुद्दे मागे पडल्याचे दिसते. मात्र, अशा वेळी योगी आदित्यनाथ यांना प्रचारात पुढे आणून छुप्या रीतीने हिंदुत्वाचे कार्ड खेळण्याचा भाजपचा डावही लपून राहिलेला नाही. त्यामुळेच भाजपने काढलेल्या परिवर्तन यात्रांना मिळणारा प्रतिसाद, तसेच राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेले आरोप यातून आपले भवितव्य उत्तर प्रदेशाच्या जनतेला निवडायचे आहे, एवढे मात्र खरे. घोडा मैदान आता अगदीच जवळ येऊन ठेपले आहे. त्यामुळेच या निवडणुकांबाबतची उत्सुकताही वाढत चालली आहे.

Web Title: political riot uttar pradesh