ढिंग टांग : शेतात जा!

ब्रिटिश नंदी
Friday, 28 June 2019

'माझे मंत्री- आमदार मला शेतात शेतकऱ्याबरोबर राबताना दिसले पाहिजेत' असे तुम्ही फर्मावल्यामुळे भयंकर लोच्या झालेला आहे.

आदरणीय माननीय श्रीमान उधोजीसाहेबांच्या चरणी लाख लाख दंडवत आणि कोटी कोटी मानाचे मुजरे. पत्र लिहिण्यास कारण की काल रोजी बॉम्बेमध्ये यशवंतराव प्रतिष्ठानच्या हॉलमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला मी जातीने हजर होतो. तेथे केलेल्या भाषणात आपण आपल्या सर्व मावळ्यांना, मंत्र्यांना आणि आमदारांना शेतात जाण्याची आज्ञा केली. 'माझे मंत्री- आमदार मला शेतात शेतकऱ्याबरोबर राबताना दिसले पाहिजेत' असे तुम्ही फर्मावल्यामुळे भयंकर लोच्या झालेला आहे. ह्या आज्ञेत काही सूट मिळंल का, ह्या अपेक्षेने आपल्याला हे निवेदनपत्र (भीत भीत) लिहीत असून, कृपा करून सहानुभूतीने माझ्या केसचा विचार व्हावा, ही विनंती. 

शेतात जाण्याच्या आज्ञेतून आपल्याला सूट मिळावी, ह्या हेतूने सकाळी मी "मातोश्री'वर येऊन गेलो होतो. तिथे दरवाजावरच मला "इथं काय करताय? शेतात जावा, शेतात!' असे दरवानाने दरडावले. (दरवानाचे नाव मी येथे घेत नाही, पण तुम्हाला माहीत आहेच.) एवढेच नाही तर "तलवार सोडा, कुदळी उचला' असेही सुनावले. मी निमूटपणे निघून आलो. 

साहेब, मी एक पक्षाचा एकनिष्ठ, कडवट मावळा आहे. आजवर एकही रक्‍तदान शिबिर आपण चुकवले नाही. आमच्या एरियात कोणालाही विचारा. शाखाप्रमुख बाबूराव दांडके म्हटले की सगळे बिचकून असतात. दांडके हे काही माझे आडनाव नाही. पण एका पेट्रोल पंपवाल्याला दांडक्‍याने धू धू धुतला होता, तेव्हापासून ते नाव पडले. माझी काळीभोर दाढी इलाख्यात (अभिनंदनच्या मिशीपेक्षा) फेमस आहे. 

साहेब, पक्षाने मला आजवर सर्वकाही दिले. मानसन्मानाची पदे दिली. आपल्या कृपेने मी नगरसेवक, आमदार, मंत्रीसुद्धा झालो. परंतु, येवढ्या मोठ्या करिअरमध्ये एकदाही शेतात गेलेलो नाही. तशी वेळच आली नाही, कारण कां की मी मुंबईचा आहे!! मुंबईत शेते नाहीत. आहेत ती रेल्वे रुळाच्या बाजूला!! तेथे मुळा, गाजरे, पालक, शेपू अशी लागवड केली जाते. तथापि, तेथे जाणे अत्यंत डेंजरस आहे. सक्‍काळच्या पारी तेथे नाक मुठीत धरूनच जावे लागते. आज सकाळीच मी कुदळ आणि फावडे घेऊन सायन-माटुंगा साइडच्या रेल्वेलाइनीलगतच्या मळ्यात गेलो असता, तेथील मळेकऱ्याने मला हटकले. त्याची चूक नव्हती. गेल्या गेल्या मीच पाणी मागायला नको होते. उगाच गैरसमज झाला!! अखेर परत आलो. जाऊ द्या. 

"शेतकऱ्याच्या घरी चहा पिऊन येऊ नका, त्याच्या शिवारातही जा,' असे आपण म्हणालात. ह्यात मोठी मेख आहे. मागे एकदा असाच एका शेतकऱ्याकडे गेलो असता त्याला "तुमचे शेत दाखवा' अशी विनंती मी केली. तेव्हा "पायजेल तर च्या पाजतो, पन शिवाराकडं पाऊल घालू नका सायेब' असे त्याने सुनावले. ज्याला शेती येत नाही, त्याला गावाकडे अडाणी असे म्हणतात. साहेब, आमच्यासारख्या अडाणी माणसाने ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्याच्या बरोबरीने शेतात उतरणे हे शेतकऱ्यासाठीच अडचणीचे ठरेल, नाही का? ग्रामीण भागातील आपले मावळे हे मुळातच शेतकरी असल्याने पेरणीच्या काळात ते आपोआप शेतशिवारात जातातच. त्यासाठी त्यांना प्रवास करावा लागत नाही. मुंबईकर मावळ्याने काय करायचे? फार्च्युनरमध्ये बसून चार तास प्रवास करून शेतात शिरायचे आणि शेतकऱ्याच्या शिव्या खात पेरणीच्या कामात लुडबूड करायची? ही मार खाण्याची लाइन आहे, साहेब! 

...आम्ही शेतात आजवर गेलो ते हुर्डा पार्टी करण्यासाठी किंवा नुसतीच पार्टी करण्यासाठी. तेव्हा आम्हा शहरी मावळ्यांना ह्या आज्ञेतून सूट द्यावी व हुर्डा पार्टीपुरते शेतात जाणे अनिवार्य करावे, ही कळकळीची विनंती. 

आपला एकनिष्ठ मावळा. बाबूराव दांडके.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political Satire in Marathi Dhing Tang