ढिंग टांग : चार पानी!

Dhing Tang
Dhing Tang

बेटा : (नेहमीपेक्षा अधिक उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽ ण... मम्मा, आयॅम बॅक! लो, मैं आ गया!! 
मम्मामॅडम : (कागदपत्रे हातावेगळी करण्यात व्यग्र...) हं! आलास? बरं झालं! भूक लागली असेल तर- 
बेटा : (घाईघाईने) नोप! मला भूक नाही, मी मुंबईचे स्पेशल दोन वडापाव खाऊन आलो आहे! 
मम्मामॅडम : (दचकून) मुंबईत गेला होतास? 
ेबेटा : (डोळे मिटून) येस्स! शिवडी कोर्ट...टु बी प्रिसाइज! जुलै महिना माझा बहुतेक कोर्टातच जाणार असं दिसतंय! कारण ह्यानंतर मला पाटणा, अहमदाबाद कोर्टातही बहुधा चक्‍कर टाकावी लागेल असं दिसतंय!! 
मम्मामॅडम : (हताशेनं) ओह गॉड... आता अशा किती कोर्टांमध्ये तुला चकरा काटाव्या लागणार कुणास ठाऊक! 
बेटा : (अभिमानाने) मी वेळोवेळी केलेल्या सोकॉल्ड अपमानांच्या विरोधात हे सगळं चाललं आहे! ऍक्‍चुअली मी अपमान केलेच नाहीत! मी फक्‍त सत्य सांगत होतो! और सच हमेशा कडवा होता है!! 
मम्मामॅडम : (कपाळाला हात लावत)... पण हे मेले कमळवाले तुला स्वस्थ बसू देतील तर शपथ!! 
बेटा : (बेफिकिरीने) फिकर नॉट! मला तरी आता कुठे काही काम आहे? मैंने तो इस्तीफा दे दिया है!! 
मम्मामॅडम : (मायेने) हा कोर्टाचा सिलसिला इतक्‍यात सुरू होऊ नये, म्हणून मी म्हणत होते की इस्तीफा देऊ नकोस म्हणून!! पण तुला सगळ्याची घाई असते!! 
बेटा : (बेपर्वाईने) उसमें क्‍या है? कोर्टाच्या निमित्तानं तेवढंच मला हिंडता येईल! नाहीतरी मी इस्तीफा दिल्यानंतर राष्ट्रव्यापी दौरा काढण्याचा विचारच करत होतो! आता तारखांच्या निमित्तानं तो दौराही आपोआप होऊन जाईल! बाय द वे... माझं चार पानी राजीनामापत्र वाचलंस का? 
मम्मामॅडम : (थंडपणाने) एका ओळीचं काम चार पानात करण्याची ही आयडिया कुणाची? 
बेटा : (उजळलेल्या चेहऱ्यानं) माझीच! मी मनात म्हटलं, आपल्या मनमोहन अंकलचा सीव्ही जर बारा पानी असू शकतो, तर आपलं राजीनामापत्र चार पानांचं का नको? 
मम्मामॅडम : (सुस्कारा सोडत) कोण वाचणार तो चार पानी राजीनामा? 
बेटा : (पैज जिंकल्यागत) पण लिहिला की नाही? 
मम्मामॅडम : (समंजसपणे) माणसाने कसा मोजक्‍या शब्दांत राजीनामा द्यावा! की बुवा, "काही अपरिहार्य कारणास्तव मी पदाचा राजीनामा देत असून पुढील वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा!' बात खतम!! 
बेटा : (विनोदी स्वभावाप्रमाणे) जगातला सर्वात छोटा राजीनामा- "गेला उडत!' हाहा!! 
मम्मामॅडम : (दुर्लक्ष करत) तुझ्या चार पानांत नेमकं काय लिहिलंय, ह्याचाच अर्थ लावत बसले आहेत आपल्या पक्षातले लोक! उपयोग काय राजीनाम्याचा? "मी राजीनामा देत आहे' हे वाक्‍य सोडून बाकी सगळं लिहिलंयस त्याच्यात!! 
बेटा : (वाद घालत) कमॉन! मी लिहिलंय तेसुद्धा!! माझी लढाई गरीब, किसान आणि मजदुरांसाठी आहे, मी माझ्या देशावर प्रेम करतो, हेसुद्धा सगळं लिहिलंय! 
मम्मामॅडम : (नाद सोडत) आता काय ठरवलं आहेस? 
बेटा : (खांदे उडवत) त्यात काय ठरवायचंय? मी आता काहीच ठरवणार नाही, हेच तर लिहिलंय मी त्या चार पानांच्या पत्रात!! मी आता पक्षाचा अध्यक्षबिध्यक्ष नसून एक साधासुधा कार्यकर्ता आहे! ओके? 
मम्मामॅडम : (समजूत घालत) तसं आपल्या पक्षातल्या लोकांना खडसावून सांग पुन्हा एकदा, म्हणजे ऐकतील! काही झालं तरी तू गांधी आडनावाचा साधासुधा कार्यकर्ता आहेस, हे विसरून कसं चालेल? कळतंय का काही?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com