ढिंग टांग : मोर्चा आणि कुकर! (अर्थात सदू आणि दादू)

Dhing Tang
Dhing Tang

दादू : (खट्याळपणाने फोन लावत) हल्लोऽऽऽ...कुणी आहे क्‍का? 
सदू : (कपाळाला आठ्या) कोण बोलतंय? 
दादू : (आणखी खट्याळपणे) म्यांव म्यांव! 
सदू : (समजून ) बोल दादू! 
दादू : (ओशाळून) ओळखलास की आवाज! 
सदू : (निर्विकार सुरात) काय चाललंय? 
दादू : (खेळकरपणाने) सहज फोन केला! म्हटलं ख्यालीखुशाली विचारावी! मीच विचारणार होतो की बुवा, एका माणसाचं सध्या काय चाललंय? 

सदू : (सुस्कारा सोडत) काऽऽही नाही! एक माणूस पत्त्यांचा डाव लावून बसलंय! 
दादू : (कुतूहलाने) एक माणूस मध्यंतरी दिल्लीला गेलं होतं म्हणे! 
सदू : (गंभीरपणाने) आम्ही लोकशाही वाचवणारे लोक आहोत! जावं लागतं दिल्लीला! 
दादू : (डोळे मिचकावत) ईव्हीएम नको, असं म्हणणारे लोक म्हंजे लोकशाही वाचवणारे...असंच ना? 
सदू : (चिडून) अर्थात! त्या यंत्रानंच सगळा घोळ केलाय! मॅच फिक्‍स असेल तर फायदा काय खेळण्याचा? 
दादू : (सल्ला देत) मॅच फिक्‍सिंगमध्ये अधिक फायदा असतो, असं नाही वाटत तुला? 

सदू : (ठामपणाने) त्याने लोकशाही मरते, त्याचं काय? 
दादू : (कळकळीने) छे बुवा, हे तुझं काहीतरीच चाललंय! तुला शोभत नाही, असली निवडणूक आयोगाला पत्रं देणं वगैरे! आमचा जुना सदूराया कसा आगजाळ होता! खळ्ळ खटॅक काय, मोर्चे काय, आंदोलनं काय! तुझ्या भीतीने टोलनाके ओस पडायला लागले होते! आठव तुझा भूतकाळ!! 
सदू : (बर्फगार आवाजात) वेळ आली की तेही रूप दिसेल!...बरं!! पण हल्ली मी विमानातून फिरतो! पायपीट खूप झाली! हाती काहीही लागत नाही!! 

दादू : (चिडवत) मजा आहे बुवा एका माणसाची! रस्त्यावरून एकदम विमानात! दिल्लीवारीसुद्धा झाली म्हणायची!! (सहज माहिती काढल्यागत) मला एक सांग, तुला अनुभव आहे म्हणून विचारतोय!...मोर्चे कसे काढावेत रे? 
सदू : (पुन्हा कपाळाला आठ्या) कसे म्हंजे? त्याची एक ठरलेली प्रोसिजर असते! ती फॉलो केली की झालं!! उदाहरणार्थ, आधी एक उद्दिष्ट जाहीर करायचं! 
दादू : (मान डोलावत) केलं! 
सदू : (दुसरं बोट वर करत) मग एक तारीख ठरवायची! 
दादू : (पुन्हा मान डोलावत) ठरवली! 
सदू : (तिसरं बोट उंचावत) एक पत्रक काढून मोर्चाची तारीख पब्लिकमध्ये सोडायची! ते तुमचं फेसबुक, व्हॉट्‌सऍप, च्यानल सगळं पाठोपाठ येतंच! 

दादू : (टिकमार्क करत) आलं! पुढे? 
सदू : (गोंधळून) मोर्चाची जी वेळ ठरली असेल, त्याच्या दोन तास उशिरा तिथं पोचायचं! 
दादू : (निरागसपणाने) खूप चालावं लागतं का रे? 
सदू : (हात झटकत) छे! हे उगीच आपलं फर्लांगभर चालायचं!! बाकीचं चॅनलवाले बघून घेतात! 
दादू : (औट ऑफ क्‍युरिऑसिटी) किती वेळ लागतो रे साधारण? 
सदू : (अनाहूत सल्ला देत) हे बघ, तुला मोर्चाबिर्चा काढायचा असेल नं, तर मुंबईत काढ! बरं पडतं! बाहेरगावी काही गॅरंटी नसते!! मी नेहमी दक्षिण मुंबईत काढतो साधारणपणे! पटकन विषय संपवता येतो!! 

दादू : (मुद्दा पटून) करेक्‍ट! मला माहीत होतं, तूच योग्य सल्ला देशील! 
सदू : (सहकार्याच्या भूमिकेत) तुला मोर्चा काढायचा आहे का? 
दादू : (चमकून) मी जाहीरसुद्धा केलाय! 
सदू : (दचकून) कसला मोर्चा! 
दादू : (विजयी मुद्रेने) विमा कंपन्यांच्या विरुद्ध! इथंच आहे, आमच्या घराच्या मागे! कुकर लावलाय! दोन शिट्ट्या होईपर्यंत मोर्चा आटोपून परतसुद्धा येईन जेवायला! हाहा!! आहे की नाही गंमत?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com