ढिंग टांग : तात्यामियां की पतंग!

Dhing Tang
Dhing Tang

वझीरेआझम-ए-हिंद जनाब नमोजीसाहब को नाचीज इमरान का तहेदिलसे सलाम. बहोत दिनांनंतर आपल्याला खत लिहिण्याची पाळी आली. सच पूछो तो, आपण मला पंधरा ऑगस्टला बुलावा भेजाल, आणि लाल किल्ल्यावरून हम दोनों, आपल्या जम्हुरियतला उद्देशून भाईचाऱ्याचा पैगाम देऊ, असे ख्वाब मी बघत होतो. मगर ये न हो सका... 

जनाब, आपणच माझे पुरुष-ए-आदर्श आहा! दरअसल चुनावच्या आधी मला अवाम 'मोदी-ए-पाकिस्तान' असेच म्हणत होती. वझीरे आझम झाल्यानंतर आपल्याप्रमाणेच मी आमच्या मुल्कातील व्हीआयपी कल्चर तसनस करून टाकले. ''जिन्होंने मेरे मुल्क को लूटा है, उन्हे मैने जेल में बंद करनाही करना है'' हा माझा गाजलेला डायलॉग तुम्हीदेखील ऐकला असेल. सेम तुमचीच लाइन नाही का ही? पाकिस्तानच्या देहाती भागात गधोंकी बडी अहेमियत आहे. शहरी भागातही गधे आहेत; पण ते चटकन ओळखता येत नाहीत!! बताने में गुरुर होता है के, आज के तारीख में पाकिस्तान के गधे दुनिया में नाम कमा रहे हैं...रहने दो. 

जनाब, कल दोपहर माझी मुलाकात जनाब डोनल्ड ट्रंप ऊर्फ तात्यामियां ह्यांच्याशी झाली. बूढे तात्यामियां बहोत रंगीन मिजाज के शख्स है. व्हाइट हाउसच्या गच्चीत उभे राहून ते पतंगबाजी करत होते. त्यांनी माझ्या हातात फिरकी दिली. म्हणाले, ''बर्खुर्दार, दे दो ढील!'' 
...मी त्यांना बोल बोल म्हणता निहाल-ए-चनेपर चढवले. (खुलासा : निहाल : रोपटे, चना : चणे!) त्यांना बहुत शेरोशायरी सुनावली. तेव्हा खुशमिजाज ट्रम्पमिया म्हणाले, ''बोल बंदे...बता तेरी रजा क्‍या है!'' 
''आप तो हमारे लिए जिन्न हो, और मैं अलादिन! दिया है तो मियां है!!,'' मी म्हणालो. इथे त्यांनी 'किसने किसकू दिया?' असे विचारले. मी त्यांना दिवा घेऊन ओवाळल्याची ऍक्‍शन करून दाखवली. दिया म्हंजे दिवा...ह्या अर्थी! 

''योऽऽ! मोडी पण हेच म्हणाले होते...'' दोन्ही कोपरे स्वत:च्या कमरेवर हापटत ट्रम्पमिया म्हणाले. 
''कोण?'' नासमझ चेहऱ्याने मी म्हणालो. 
''मोडी, मोडी! द वन हू इज युअर नेबर! रादर ते हल्ली सर्वांचेच नेबर व्हायला लागले आहेत, '' त्यांनी पुन्हा दोन्ही हातांचे कोपरे कमरेवर हापटले. 
''ओह, या वली! ते काय म्हणाले?,'' मैं. 
'' ते म्हणाले की कॅशमेअरचा प्रॉब्लेम सोडवून द्या, तात्या! मी म्हणालो की त्यात काय? सोडिवतो की!!,'' तात्यामियांनी सांगितले. 

''काश्‍मीरचा मसला सोडवून दिलात, तर चमडे के जूते बनाकर पैरोंपर चढा दूंगा!'' असे मी त्यांना सद्‌गदित होऊन म्हणालो. 
''ओह, डॅम यू...'' असे ते ओरडले. माझी गलती नव्हती. दरअसल त्यांची पतंग गुल झाली होती. त्यांनी वैतागून मला जायला सांगितले. मी (फिरकी खाली ठेवून) निघालो. राहपर असतानाच तुमचा पैगाम आला की 'ट्रम्पतात्यांना मी काश्‍मीरचा मसला सुलझवायला सांगितलेच नव्हते!'' ये तो हद-ए-कमाल हो गई!

अर्ज किया है- 
मैं बेचारा, प्यार का मारा, हाथ में मेरे फिरकी है, 
किसका मांजा, किसकी पतंग, उडानेवाला ठरकी है! 

...जनाब, आप मुझे बताइएगा, तात्यामियां किसकी पतंग काट रहे थे? और फिरकी-ए-मांजा मेरे हाथ में क्‍यूं? हो सका, तो फिर मिलेंगे. आपके मुलाकात की कोशीश में हमेशा लगा हुआ.

आपका शागीर्द इमरान.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com