होय, काश्मीर आपलेच आहे!

होय, काश्मीर आपलेच आहे!

आपण (भारत) काश्‍मीर गमावले आहे का? स्पष्टतेसाठी याचे उत्तर नाही, असे आहे. परंतु, याला काही मर्यादाही आहेत. आपण 1947 पासून अनेकदा काश्‍मीर गमावले आहे. पहिल्यांदा पाकिस्तानी लष्कराने श्रीनगर विमानतळ ताब्यात घेण्याआधी लेफ्टनंट जनरल (त्यावेळचे लेफ्टनंट कर्नल) हरबक्षसिंग यांचे सैन्य तेथे दाखल झाले. त्यावेळची परिस्थिती किती निराशाजनक होती हे एखाद्या ग्रंथालयात जाऊन लेफ्टनंट जनरल लायनेल प्रोतिप सेन यांचे 'स्लेंडर वॉज द थ्रेड' हे पुस्तक वाचल्यानंतर कळेल.

दुसऱ्यांदा आपण काश्‍मीर 1965 मध्ये गमावले. भारत-चीन वादात पाकिस्तानने त्यावेळी निर्णायक खेळी खेळली होती. त्यावेळी हजरतबल येथून पवित्र वस्तू चोरीला गेल्याने खोऱ्यात जनभावनेचा झालेला क्षोभ निर्माण झाला होता, तर नवी दिल्लीतील नेहरूंच्या सरकारला उतरती कळा लागली होती. चांब येथील 'ग्रॅंड स्लॅम' मोहिमेला काही प्रमाणात यश मिळाल्याने अखेरीस आयुब खान यांच्या महत्त्वाकांक्षी 'जिब्राल्टर' मोहिमेमुळे हजारो पाकिस्तानी सैनिकांनी खोऱ्यात घुसखोरी केली होती. आपण त्यावेळी जवळपास काश्‍मीर गमावले होते. हरबक्षसिंग यांच्या 'वॉर अँड डिस्पॅचेस' या पुस्तकात हे वाचायला मिळते. त्यावेळी आपल्याकडे व्यावसायिक, भावनाप्रधान नसलेले, सैनिकी बाण्याचे आणि हुशार लष्करप्रमुख होते. सध्याच्या 'प्राईम-टाइम टीव्ही'वर युद्धविषयक कार्यक्रमात दिसणारी हुशारी त्यावेळी नव्हती. याला कारण म्हणजे त्यांनी खऱ्या शत्रूंशी खरे युद्ध करण्यात दशके व्यतित केली होती. आताप्रमाणे केवळी ती वाळूची मॉडेल नव्हती, तसेच त्यावेळी 'प्राईम-टाइम टीव्ही' नव्हता.

काश्‍मीर लष्करीदृष्ट्या आपण 1965 मध्ये शेवटचे गमावले असे म्हणता येऊ शकते. याला आता 52 वर्षे उलटली आहेत. काश्‍मीरवरील भारताच्या ताब्याला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न पाकिस्तानी लष्कराने 1971 मध्ये पूँच व चांब आणि 1999 मध्ये कारगिलमध्ये केला. मागील अर्धशतकात भारताकडे आधी ताब्यात असलेल्या काश्‍मीरपेक्षा थोडा अधिक भूभाग आहे. अशावेळी चिंता करण्याची गरज काय?
लष्करी धोका 52 वर्षांपूर्वी संपल्यानंतर आपल्या काश्‍मीरविषयक विचारांचे लष्करीकरण होत आले आहे. भूतकाळात देशभक्तीचे गीत शाळेत गाताना 'सावधान, तुम्हाला काश्‍मीरचे रक्षण करायचे आहे,' अशा ओळी येत. दोन्ही दृष्टिकोनांमधील फरक म्हणजे भूतकाळातील लष्करी आक्रमणचा धोका वास्तव होता. अगदी लोककथांमध्येही काश्‍मिरी हे राष्ट्रवादी आणि विश्‍वासू आढळतात. काश्‍मीरमध्ये 1965 मध्ये घुसखोरी करणाऱ्यांना स्थानिक जनतेने थारा दिला नव्हता.
आज कोणताही लष्करी धोका दिसत नाही, परंतु आपण आपल्याच लोकांना धोका म्हणून पाहण्याची दृष्टी निर्माण केली आहे. हा फरक आहे. काश्‍मीरचा भूभाग संरक्षित असला तरी तो भावनिक आणि मानसशास्त्रीयदृष्ट्या आपण वेगाने गमावत आहोत. आता प्रश्‍न उपस्थित होतो की, आपल्याला याची चिंता वाटते का? आणि शेवटी आपण याची चिंता का करावी? पहिल्यांदा एका प्रश्‍नाचे उत्तर थोडक्‍यात देऊ. आपल्याला चिंता वाटत नाही.

याची कारणे छोटी, निर्दयी आणि बहुतांश राष्ट्रवादी असतील. तुमचा द्वेष करणाऱ्या आणि तुमच्याशी निष्ठावंत नसणाऱ्या नागरिकांचे प्रेम जिंकण्याचा प्रयत्न का करावा? तेही पाकिस्तानच्या घोषणा आणि परंपरावादी मुस्लिम विचारसरणीचे हे नागरिक तुमच्या जवानांवर दगड भिरकावत असताना. देशाच्या अन्य भागांत राष्ट्रगीताला चित्रपटगृहात उभे न राहिल्याबद्दल सामान्य नागरिकांना मारहाण तसेच, कारागृहात पाठविले जात असताना उघडपणे द्रोह करणाऱ्या या नागरिकांकडे बदलता भारत कशाप्रकारे पाहणार आहे. आता बस्स झाले! भारत आवडत नाही असे काश्‍मिरी पाकिस्तानमध्ये जाऊ शकतात.

हे उत्तर परिस्थिती स्पष्ट करणारे आहे. काही महिन्यांपासून खोऱ्यात हजारो काश्‍मिरी लाठी, गोळ्या आणि पेलेटची भीती बाजूला टाकून रस्त्यावर येत आहेत. पुढील काही आठवड्यांत लष्कराकडून संरक्षणासाठी बचावासाठी वापरलेल्या काश्‍मिरी तरुणांचा मुलाहिजाही ते बाळगणार नाहीत. पाकिस्तानी दहशतवाद्यांवर कारवाई सुरू असताना ते आता उघडपणे लष्कराचे मार्ग अडवत आहेत. गेल्या चार दशकांतील बलशाली नेत्याचा सहभाग असलेल्या निवडणुकीत मोठ्या प्रयत्नांनंतरही केवळ सात टक्के जनता मतदान करण्यासाठी येत आहे. तुमच्या ताब्यात भूभाग असला तरी काश्‍मीरमधील जनता तुम्ही गमावत आहात यासाठी तुम्हाला आणखी कोणत्या पुराव्याची गरज आहे. आता प्रश्‍न आहे, आपण चिंता करावी का? हा प्रश्‍न अतिशय गुंतागुंतीचा आहे. तुम्ही उच्चरवाने ओरडणारे राष्ट्रवादी असल्यास तुमचे उत्तर द्रोहींनी पाकिस्तानमध्ये जावे असे असेल. त्यानंतर अन्य हिंदू राष्ट्रवाद्यांना कश्‍मीरमध्ये आणून सोडण्याची योजना असेल. काही जबाबदार पक्षांनी सुचविल्यानुसार, काश्‍मिरींना दूर तमिळनाडूमध्ये विस्थापित करावे. अथवा काही निवृत्त लष्करप्रमुखांनी सुचविल्यानुसार त्यातील काहींना गोळ्या घालाव्यात म्हणजे परिस्थिती निवळेल. हा खरेतर काश्‍मीर गमावण्याचा नव्हे तर भारत गमावण्याचा मार्ग आहे. याला वास्तवाचा काही आधार नाही.

आपण इस्राईलच्या सामर्थ्य, धैर्य, गुणवत्ता, लष्करी ताकद आणि निदर्यपणाचे गुणगाण करतो. इस्त्राईलने 50 वर्षांपूर्वी अरब भूभाग जिंकल्यानंतर तेथून लोकांना हाकलून प्रदेश ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. यात ते अपयशी ठरले आहेत. इस्राईलला प्रामुख्याने पश्‍चिमी देशांचा पाठिंबा आहे. इस्राईलला बळाच्या वापराची किंमत मोठ्या प्रमाणात चुकती करावी लागली आहे. याचबरोबर जागतिक पातळीवर देशाची नाचक्की होत आहे. भारतासाठी काश्‍मीरमध्ये ही पद्धत योग्य ठरेल हा तुमचा कल्पनाविलास ठरेल. हे आत्मघाती धोरण असून, भारत म्हणजे इस्राईल नाही. इस्राईलमध्ये अरब नागरिकांना ज्यू नागरिकांसारखे समान अधिकार नाहीत. त्याचवेळी भारतात सर्वधर्मियांना समान अधिकार आहेत. देशाच्या मुख्य भागात एक पद्धत आणि काश्‍मीरमध्ये दुसरी असे धोरण अवलंबता येणार नाही. हुकूमशाही असलेल्या देशातच हे शक्‍य आहे.

टाईम नियतकालिकाचे पत्रकार एडवर्ड 'नेड' डेसमॉंड आणि मी नियंत्रण रेषेवर चकमकी जळवून पाहण्यासाठी 1919 मध्ये गेलो होतो. त्यावेळी 'रॉ'चे माजी प्रमुख गिरीश चंद्र 'गॅरी' सक्‍सेना काश्‍मीरचे राज्यपाल होते. त्यावेळी अंतर्गत बंडखोरी जोरात सुरू होती. आताची पिढी त्याला 'हैदर' (विशाल भारद्वाज यांचा चित्रपट) कालखंड म्हणेल. काश्‍मीर गमावले आहे का, अशी विचारणा मी त्यांना केली. त्यांनी शांतपणे नाही, असे उत्तर दिले. देशात एकत्र राहण्याची ताकद असावी आणि ती आपल्याकडे आहे, असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले होते, 'हा लढा संपल्यानंतर लोकांची मने जिंकण्यासाठी राजकीय योजना आखायला हवी. भारतात तुम्हाला चांगले भवितव्य आहे, हे त्यांच्या मनावर बिंबवायला हवे. त्यामानाने आमचे काम सोपे असून, राजकीय नेतृत्वासमोर खरे आव्हान आहे. यासाठी मोठे मन दाखविण्याची गरज आहे.' मला वाटते की आताही त्यांनी हेच सांगितले असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com