कठोर अन्‌ मुलायम! (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016

कोणे एके काळी मुलायमसिंह यांचे उजवे हात असलेले आणि पुढे त्यांच्याशीच पंगा घेऊन बाहेर पडलेले अमरसिंह हे काही महिन्यांपूर्वी पक्षात परतले आणि त्यांनीच शिवपाल यांच्या महत्त्वाकांक्षेला खतपाणी घालण्यास सुरवात केली.

राजकारणातील सरंजामी प्रवृत्ती आणि आधुनिक प्रवृत्ती यांच्यातील संघर्षाचेच उत्तर प्रदेश हे उत्तम उदाहरण ठरेल. राज्याच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळण्याच्या अपेक्षा संकुचित राजकारणाने झाकोळल्या आहेत. 

उत्तर प्रदेशातील यादव कुळात गेले महिनाभर सुरू असलेल्या शिमग्याने गेल्या आठवड्यात कळस गाठला आणि त्यामुळे दिवाळीच्या लक्ष्मीपूजनास किमान दोन आठवडे अवधी असूनही लखनौतील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात फटाके फुटू लागले. हे फटाके अर्थातच भाजप कार्यकर्ते मनातल्या मनात फोडत होते; कारण या यादव कुलोत्पन्नांनी सुरू केलेला शिमगा कधीही संपू शकतो, याची त्यांना जाणीव होती आणि झालेही नेमके तसेच! या कुळाचे मूळ पुरुष "नेताजी‘ तथा मुलायमसिंह यांनी पुत्र आणि विद्यमान मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या विरोधात उपसलेली शस्त्रे तूर्तास तरी म्यान केल्याचे चित्र सोमवारी उभे राहिले. अखिलेश यांचे एक काका आणि "समाजवादी पार्टी‘चे उत्तर प्रदेश अध्यक्ष शिवपाल यादव; तसेच पक्षात पुनरागमन केल्यानंतर कलागती लावण्यात मशहूर असलेले अमरसिंह यांच्या नादी लागून "नेताजीं‘नी थेट अखिलेश यांच्या विरोधात कडवे युद्ध पुकारले होते. जवळपास महिनाभर ही यादवी सुरू होती आणि त्या लढाईत मुलायमसिंह हे रोजच्या रोज अखिलेश यांना अवमानित करू पाहत होते. खरे तर एका अर्थाने मुलायमसिंह यांना आठवलेली ही अवदसाच होती. अखिलेश यांचा आधुनिक दृष्टिकोन हा एकीकडे उत्तर प्रदेशातील तरुणांना आपलासा वाटत असल्यामुळे देशातील या सर्वात मोठ्या राज्यातील युवक मोठ्या संख्येने त्यांच्या बाजूने उभे असताना, मुलायमसिंह हे शिवपाल आणि अमरसिंह यांच्या कट कारस्थानास बळी पडले आणि ही यादवी सुरू झाली. गेल्या आठवड्यात तर मुख्यमंत्र्यांची निवड हे नवनिर्वाचित आमदारच करतील, असे सांगून मुलायमसिंह यांनी केवळ अखिलेश यांच्या नव्हे तर समाजवादी पार्टीच्याच भवितव्यास सुरूंग लावला होता. त्यानंतर अखिलेश यांचे दुसरे काका -मुलायम यांचे चुलतबंधू- रामगोपाल यादव हे भली मोठी कुमक घेऊन अखिलेश यांच्या दिमतीला आले आणि त्यांनी मुलायमसिंह यांना एक सणसणीत पत्र पाठवून कडक इशारा दिला. त्यानंतरच अखेर मुलायमसिंह यांनी शस्त्रे बाजूला ठेवून मुख्यमंत्रिपदाचे भावी उमेदवार म्हणून अखिलेश यांनाच पाठिंबा जाहीर करणे भाग पडले आहे. 

"समाजवादी पार्टी‘ची स्थापना मुलायमसिंहांनी 1990च्या दशकात जनता दलातून बाहेर पडून केल्यापासून ते उठता-बसता डॉ. राममनोहर लोहिया यांच्या नावाची जपमाळ ओढत असले, तरी प्रत्यक्षात ही पार्टी यादव आणि मुस्लिम यांची वरकरणी दिसत असली, तरी त्यावर मुलायमसिंह यांच्या कुटुंबाचाच वरचष्मा आहे. 2012 मध्ये समाजवादी पार्टीला या जातीपातींचा बुजबुजाट असलेल्या राज्यात निखळ बहुमत मिळाले आणि त्यांनी स्वत: लखनौची "नवाबी‘ न स्वीकारता त्या गादीवर आपले उच्चविद्याविभूषित चिरंजीव अखिलेश यांना बसवले, तेव्हा मुलायमसिंह यांना खरोखरच या राज्याचा आधुनिक दृष्टिकोनातून काही विकास घडवून आणावयाचा आहे, असे चित्र उभे राहिले होते. अखिलेश यांनीही हे राज्य प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी भरीव कामगिरी केली; पण अखिलेश यांच्या हाती राज्याची सूत्रे दिल्यामुळे मुलायमसिंह यांचे बंधू शिवपाल यादव कमालीचे नाराज झाले होते. कोणे एके काळी मुलायमसिंह यांचे उजवे हात असलेले आणि पुढे त्यांच्याशीच पंगा घेऊन बाहेर पडलेले अमरसिंह हे काही महिन्यांपूर्वी पक्षात परतले आणि त्यांनीच शिवपाल यांच्या महत्त्वाकांक्षेला खतपाणी घालण्यास सुरुरवात केली. त्याचे स्पष्ट कारण म्हणजे अमरसिंहांच्या "उद्योगां‘त अखिलेश हे सहभागी होऊ पाहत नव्हते. त्यामुळे अखिलेश यांच्या कारभारामुळे भारून गेलेल्या तरुण पिढीने पुन्हा सत्ता समाजवादी पार्टीकडे सोपवलीच, तर आपल्या हाती पडद्याआडून तरी सूत्रे यावीत म्हणून अमरसिंहांनी शिवपाल यांचे प्यादे पुढे केले होते. अमरसिंहांच्या कलागतींना मुलायमसिंह बळी पडले आणि त्यामुळे उफाळून आलेल्या गेल्या महिनाभरातील यादवीचा मोठा फटका मतदारांनी समाजवादी पार्टीला दिला, तर नवल वाटायला नको. भाजप कार्यकर्त्यांच्या मनात का होईना फटाके फुटू लागले आहेत, ते त्यामुळेच! 

मात्र, आता रामगोपाल यांनी पाठवलेल्या कठोर आणि वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या पत्रामुळे वज्राप्रमाणे कठोर झालेल्या मुलायमसिंह यांना पुत्रप्रेमाचा देखावा उभा करणे भाग पडले आहे. सुंभ जळाला तरी..., या म्हणीनुसार "इतिहास हा अत्यंत क्रूर असतो आणि तो कोणासही दयामाया दाखवत नाही!‘ आदी वचने ते उद्‌धृत करू पाहत आहेत. रामगोपाल यांनी मात्र "या यादवीमुळे गेल्या निवडणुकीत दोनशेहून अधिक जागा जिंकणाऱ्या समाजवादी पार्टीला शंभरीही गाठता आली नाही, तर त्यास तुम्ही स्वत:च जबाबदार असाल,‘ असा रोखठोक इशारा "नेताजीं‘ना दिला आहे. अर्थात, अद्याप निवडणुकीस किमान चार महिन्यांचा कालावधी बाकी आहे. ही यादवी तोपावेतो उत्तर प्रदेशची जनता विसरून जाईल, की त्याचा फायदा मुस्लिमांना आपल्या छावणीत आणण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या मायावतींच्या बहुजन समाज पार्टीचे पारडे जड करेल, की "सर्जिकल स्ट्राइक‘मुळे भारून गेलेली जनता भाजपला यश देऊन जाईल, हे सांगणे तूर्तास तरी कठीण आहे.

Web Title: Politics in Samajwadi Party ahead of UP Elections 2017