तळमळले सागरकिनारे

डॉ. श्रीकांत कार्लेकर
मंगळवार, 27 सप्टेंबर 2016

सागरी किनाऱ्यांच्या प्रदूषणाची वेळीच दखल घेतली नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. त्यामुळे किनाऱ्यांचे पर्यावरण जतन करण्याविषयी नव्याने जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही 17 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिन म्हणून पाळण्यात आला. आपल्या किनाऱ्यावरही दरवर्षी काही ठिकाणी हा दिवस पाळला जातो. स्थानिक संस्था, लोक यांच्यामार्फत किनाऱ्यावरील पुळणी, खाड्या यांच्या स्वच्छतेचे कार्यक्रम राबविले जातात; पण हे प्रयोग आजही या दिवसापुरतेच मर्यादित आहेत. या वर्षी डहाणूपासून वेंगुर्ल्यापर्यंत केलेल्या सर्वेक्षणात हेच वास्तव पुन्हा समोर आले. अजूनही स्थानिकांच्या आणि विशेषतः पर्यटकांच्या दृष्टीने किनाऱ्यांच्या स्वच्छतेचे महत्त्व गौणच आहे. किनाऱ्यावर येणाऱ्या बहुतांश पर्यटकांना वाटते, की स्थानिक याबाबतीत उदासीन आहेत, तर आपल्या गावाजवळच्या किनाऱ्याची नासधूस आणि त्याचे प्रदूषण यासाठी स्थानिक रहिवासी पर्यटकांना दोषी मानतात. स्थानिकांची ही भावना व निरीक्षणे अनेक ठिकाणी योग्य असल्याचे लक्षात आले आहे.

आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता मोहीम ही जगातील नावाजलेली आणि जुनी मोहीम आहे. ही मोहीम अमेरिकेतील "द ओशन कॉन्झरवन्सी'मार्फत चालवली जाते. कॅलिफोर्निया किंवा सिंगापूर इथल्या काही स्वयंसेवी संस्था वगळता या मोहिमेत अजूनही बहुतांश देशांचा सहभाग नाही. भारताने काही वर्षांपूर्वीच या मोहिमेअंतर्गत प्रकल्प हाती घ्यायला सुरवात केली. दरवर्षी या दिवशी जगातील अनेक स्वयंसेवी संघटना आणि स्वयंसेवक किनाऱ्यावर असलेल्या पुळणीवरील अनावश्‍यक वस्तू हटवून किनारे स्वच्छ करतात. याचबरोबर नद्या, सरोवरे, तलाव यांच्या आजूबाजूचा प्रदेश प्रदूषणमुक्त करणे, उथळ समुद्रात विशेषतः प्रवाळ प्रदेशात साठलेला राडारोडा दूर करणे असे कार्यक्रम करतात. भारतात अनेक ठिकाणी नौदल, किनारारक्षक दल, शाळा यांच्यामार्फत किनाऱ्यावरील पुळणीची स्वच्छता करण्यात येते. या मोहिमेअंतर्गत "एखादी पुळण दत्तक घ्या व तिची स्वच्छता करा' असेही उपक्रम जगभरात राबविले जातात. यापूर्वी किनारा स्वच्छतेचे जे उपक्रम राबविले गेले, त्यांची माहिती एकत्र केली जाते. त्या आधारे किनारा संरक्षणाच्या नियम व कायद्यांत सुधारणा सुचविल्या जातात. आपल्याकडे अर्थातच या सगळ्या गोष्टींची वानवाच आहे.

आपल्या किनाऱ्यावर असे प्रयत्न करायला मोठी संधी आहे. किनाऱ्याच्या कोणत्या भागात, कोणत्या प्रदूषित पदार्थांचे कसे एकत्रीकरण करावे व त्याची कशी विल्हेवाट लावावी, अशासारखी माहिती गोळा करता येईल. त्याचबरोबर प्रत्येक किनाऱ्याचे सौंदर्य व नैसर्गिक पर्यावरण अबाधित राहण्यासाठी कोणती काळजी घ्यावी लागेल, याचाही अभ्यास करता येईल. कोकण किनाऱ्यांसाठी किनारा रक्षणाची व स्वच्छतेची वेगवेगळी प्रतिमानेही तयार करता येतील.
आज जगातील सर्वच समुद्रकिनारे मोठ्या प्रमाणावर अस्वच्छ व प्रदूषित झाले आहेत. रासायनिक प्रदूषके, तेलगळती, घरगुती सांडपाणी व मैलापाणी आणि इतर अनेक प्रकारच्या त्याज्य पदार्थांचे तरंगणारे गोळे, सिगारेटची थोटके, प्लॅस्टिकच्या पिशव्या व वस्तू यांचे प्रमाण सगळीकडेच वाढताना दिसते. दवाखाने व इस्पितळे यातून समुद्रात सोडली जाणारी त्याज्य औषधे आणि इतर वैद्यकीय वस्तूंचा कचराही शहरानजीकच्या किनाऱ्याचे प्रदूषण वाढवत असतो. या प्रकारे खाड्या व पुळणी रोजच दूषित होत आहेत. आपल्या किनाऱ्यावर कमी अधिक फरकाने हीच स्थिती दिसून येते.

अनेक पाश्‍चात्त्य देशांत अशी मोहीम न चुकता राबविली जाते. या संदर्भात माहितीचा विस्तृत साठा तयार करणे, हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. किनारी प्रदूषणाचा मूळ स्रोत शोधणे, त्याविषयी माहिती गोळा करणे व किनारी पर्यावरणास बाधा आणणाऱ्या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी प्रयत्न करणे यासाठीही ही मोहीम काम करीत आहे. अनेक देश नद्या, समुद्र व सरोवरे यांच्या किनाऱ्यावरून हजारो टन राडारोडा गोळा करून तो नष्ट करतात. हा कचरा गोळा केला नाही, तर तो समुद्रात जाऊन सागरी जीवांसाठी धोकादायक ठरू शकतो.
 
महाराष्ट्रातील बोर्डी, रेवदंडा, मुरुड, देवगड, मालवण, देवबाग हरिहरेश्वर या व अशा अनेक पुळणींची सध्याची अवस्था बघून इथे अशी मोहीम दरवर्षी राबविण्याची गरज आहे. महाराष्ट्राचा समुद्रकिनारा देशात सर्वाधिक प्रदूषित आहे, असा निष्कर्ष गोव्याच्या राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेने आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यांच्या संयुक्त अहवालात गेल्याच वर्षी काढला आहे. या दोन्ही संस्थांनी भारताच्या पश्‍चिम किनारपट्टीवर सागर जलाचे अकराशे नमुने घेऊन त्याच्या अभ्यासानंतर हे अनुमान काढले. या अहवालानुसार संपूर्ण पश्‍चिम किनाऱ्यापैकी महाराष्ट्राची 720 किमी लांबीची किनारपट्टी सर्वांत जास्त प्रदूषित आहे. त्यातही मुंबई आणि गुजरातच्या किनाऱ्यावर हे प्रमाण लक्षणीय आहे. नदीमुखे आणि खाड्या हे किनाऱ्यावरील प्रदेश प्रदूषणामुळे जास्त बाधित आहेत. या संदर्भात अलीकडेच केलेल्या संशोधनातून किनारी प्रदूषणाची समस्या खूपच तीव्र असल्याचे लक्षात आले. रत्नागिरी, सिंधुदुर्गचा किनारा तुलनेने कमी प्रदूषित असल्याचे या संस्थांनी म्हटले असले, तरी प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही.

महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर बोर्डी, एलिफंटा, रेवदंडा, मुरुड, देवबाग अशा अनेक ठिकाणी किनारी प्रदूषणाचे दुष्परिणाम गेल्या काही दिवसांपासून प्रकर्षाने दिसू लागले आहेत. केवळ लहान मासेच नाहीत, तर डॉल्फिनसारखे मोठे मासे मरून पडल्याच्या घटना समोर येत आहेत. दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी, तरंगणारे प्लॅस्टिक पदार्थ यामुळे कोकणातील खाड्या प्रदूषित झाल्या आहेत. या समस्येची वेळीच दखल घेतली नाही, तर भविष्यात परिस्थिती हाताबाहेर जाईल यात शंका नाही.

मुंबई आणि उपनगरे, तारापूर, वसई , मनोरी, वर्सोवा, वांद्रे, माहीम, वरळी, ठाणे, पाताळगंगा आणि अलिबाग या ठिकाणी घरगुती सांडपाणी, औद्योगीकरण, ऊर्जा प्रकल्प यामुळे प्रदूषणात वाढ झाल्याचे दिसून येते. उर्वरित किनाऱ्यांवर मात्र प्रामुख्याने पर्यटनामुळे, सांडपाण्यामुळे आणि सरकारी व स्थानिक पातळीवरील असंवेदनशीलपणामुळे ही समस्या उग्र रूप धारण करीत आहे. आपल्याला लाभलेल्या सुंदर सागरकिनाऱ्याच्या स्वच्छतेविषयी नव्याने जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे याबाबत दुमत नसावे.

Web Title: pollution in sea beaches