कशाला उद्याची बात?

prajakta kumbhar
prajakta kumbhar

जमिनीवर पाय भक्कमपणे रोवतानाच आकाशात झेप घेण्याची स्वप्नं तरुणाईच्या डोळ्यांत फुलत असतात. ही स्वप्नं प्रत्यक्षात आणण्यासाठी बदलत्या भवतालाचं भान ठेवून पावलं टाकणाऱ्या तरुण पिढीचं मनोगत त्यांच्याच शब्दांत मांडणारं सदर दर शनिवारी.

धा वपळ... गडबड... चिडचिड... डेडलाइन्स... टेन्शन्स... या शब्दांचं आणि माझ्या वयाशी सरासरी असणाऱ्या लोकांचं साटंलोटं आहे. ‘वर्क हार्ड, स्पेंड मोअर’ हा लाइफस्टाइल फंडा जगताना हे शब्द नेहमी रिंगण धरूनच असतात आमच्या आजूबाजूला. सकाळी उठल्यापासून स्वतःला अपडेट ठेवण्याची, वर्तमानाशी सुसंगत राहण्याची, जमलंच तर दोन पावलं पुढे जाऊन विचार करण्याची धडपड सुरू असते, ती खरंतर जगणं समृद्ध करण्यासाठी. ‘फार काही अपेक्षा नाहीयेत आयुष्याकडून,’ अशी वाक्‍यं आमच्या आसपासही फिरकत नाहीत. ‘उद्या काय?’ हा विचार डोक्‍यात सुरू असतानाच ‘आज’चं जगणंही बॅलन्स करायचं असतं आम्हाला. आयुष्य मनसोक्त जगताना, ते सगळ्याच पातळ्यांवर उत्तम जुळून आलेलं, परफेक्‍ट असलंच पाहिजे असा थोडासा अट्टहास असतो म्हणा ना या धावपळीमागं. सर्वोत्तमाची भूक रंध्रांमध्ये रुजवून; इतरांशी नाही, स्वतःशीच सुरू असते स्पर्धा आणि काहीही झालं तरी आम्हाला रोजच जिंकायचं असतं.

तसंही देशानं उदारीकरणाचं धोरण स्वीकारल्याच्या काळात जन्माला आलेली आमची पिढी... त्यामुळं आम्हाला स्पर्धाबिर्धा रूटीन असल्यासारखंच असणं अपेक्षित आहे. त्यातच पुन्हा दूरदर्शन ते वेबसीरिज, सरकारी नोकरी ते स्टार्टअप, ॲरेंज्ड मॅरेज ते फ्रेंड्‌स विथ बेनिफिट्‌स अशी अनेक स्थित्यंतरं अनुभवणाऱ्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारी मी... त्यामुळं हे बदल स्वीकारणं आणि स्पर्धेत टिकून राहणं हे तर बाय डिफॉल्ट. खरंतर हे बदल स्वीकारणं, त्या बदलांप्रमाणं स्वतःला अपग्रेड करणं हे सोप्पं नाहीये आणि या स्वीकारामागं कोणतीही बंडखोरी किंवा स्वतःचं वेगळेपण मिरवण्याची हौसही नाहीये. आहे ती फक्त गरज... काळाशी सुसंगत असण्याची. त्यामुळंच असेल कदाचित; पण ही सुसंगती साधताना आजचं जगणं कुठंही मागं पडत नाही. उत्तम नोकरी, सुखवस्तू राहणीमान आणि चांगलं अर्थार्जन ही भविष्याची प्रायोरिटी असताना; आज नेमकं काय मिळवलंय याचा ताळेबंदही मेंदूच्या एका कोपऱ्यात सुरू असतो.

...पण मग वर्तमानात जगायची समज आणि जाणीव असतानाही का असते ही सतत स्पर्धेत असण्याची हौस? हे असं प्रत्येक वेळी कोणत्या-ना-कोणत्या बदलाच्या मागं धावताना दमायला होत नाही का? किमान ‘थांबूया... जरा स्वतःसाठी वेळ देऊया...’ असलं काही डोक्‍यात येत नाही का आमच्या? येतं... हे आणि असे सगळेच विचार डोक्‍यात असतात; पण तरीही ही स्पर्धेची हौस असते ती स्वतःतलं सर्वोत्तम शोधण्यासाठी, स्वतःला नव्यानं आजमावून पाहण्यासाठी.
कसंय नाऽ अगदी सर्वच क्षेत्रांतले उपलब्ध असणारे पर्याय वाढले आमच्यासाठी... त्यामुळं निवडीचं स्वातंत्र्य मिळालं. शिक्षण, करिअर, नोकरी; झालंच तर कमिटमेंट, लग्न या गोष्टींचे सिक्वेन्स स्वतःच्या मर्जीप्रमाणं बदलण्याची मुभा मिळाली. ‘अमुक एका वयात सेटल झालं पाहिजे’ ही स्टिरिओटाइप सेटलमेंट जरा बाजूला ठेवता आली... त्यामुळं वीकेंडच्या भोज्याला शिवताना आठवडाभर किती धावपळ झाली या हिशेबापेक्षा, #वीकएंडइजहिअर ही जगण्याची सकारात्मकता जास्त आपलीशी वाटायला लागली.

खरंतर भविष्याच्या विचारात अडकलेले असलो तरी वर्तमान जिंदादिलीनं अनुभवण्याची उत्सुकताही असतेच आम्हालाही. डिप्रेशन, एकटेपणा, अधूनमधून डोकावणारी आयुष्याबद्दलची नकारात्मकता, ‘नक्की हवंय काय’ हे कन्फ्युजन हे सगळं असतंच की... ते तसंही कोणत्या पिढीला चुकलंय? फरक हा आहे, की ‘हे सगळं असणारच सोबतीला’ हे स्वीकारलंय आम्ही.

माझ्या बाबतीत तर हे अनेकदा होतं. मुळात ज्या क्षेत्रात मी काम करते, इट्‌स अ बिझनेस ऑफ सेलिंग आयडियाज... त्यामुळं काम करताना सतत संवाद, चोवीस तास कनेक्‍टेड राहणं आणि उत्तम श्रोता असणं मस्ट आहे... पण या चोवीस तास कनेक्‍टेड राहण्यातही मी किती मनापासून संवाद साधते? क्वचित. मी जे काम करते; त्यात मी आनंदी आहे का? नक्कीच आहे... पण म्हणून आयुष्यभर हेच करायचंय असंही नाही. मी आज हे करतीये आणि त्यात समाधानी आहे; हा वर्तमानाचा स्वीकार आहे, त्यामागे बाकी काही नाही.

कधी कधी गंमत वाटते मला. ‘आजची युवा पिढी’ वगैरे शब्द आले की दोन टोकांची मतं असतात आपल्याकडे. एकतर ‘हेच देशाचं उज्ज्वल भविष्य आहेत’ किंवा ‘नैराश्‍येच्या गर्तेत अडकलेले बिच्चारे... कसं होणार यांचं?’ ही मतं खरीही असतील; पण या दोन्ही टोकांमधल्या फळीत माझ्यासारखे अनेक जीव असतात जे भविष्यात काहीतरी भव्यदिव्य करण्याचे प्लॅन्स तर आखतात... पण येणारा प्रत्येक दिवसही नव्या ऊर्मीनं जगू पाहतात; ज्यांनी ‘जाणिजे यज्ञकर्म’ म्हणून वर्तमानाला स्वीकारलेलं असतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com