ना‘राजमान्य’... ना‘राजश्री’!

प्रकाश अकोलकर
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

राजकारणात एकाच वेळी मित्राची भूमिका बजावणारा शत्रू आणि शत्रू असूनही सतत मदतीसाठी हात पुढे करणारा मित्र, या दोहोंनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच वेळी राजी केले आहे.

‘अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक व्हायलाच हवे; पण त्यास असलेल्या कोळी बांधवांच्या तीव्र नाराजीचाही विचार व्हायला हवा!’ ‘महाराजांच्या स्मारकाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायलाच हवे, नव्हे राहणारच! मात्र, त्यासाठी सन्मानाने निमंत्रण यायला हवे!’

येत्या शनिवारी मुंबईत गिरगाव चौपाटीला सामोरे ठेवून अरबी समुद्रात उभारावयाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्यदिव्य स्मारकाचे भूमिपूजन आणि महत्त्वाकांक्षी, तसेच अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या पुणे मेट्रो रेल्वेच्या कामांचा प्रारंभ साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा घाट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातला आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या दोन दिवसांत काढलेले हे जाज्ज्वल्य उद्‌गार आहेत. शिवाय, नेमका हा शनिवारचाच मुहूर्त साधून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शहापूर येथील शेतकऱ्यांना तेथे जाऊन भेटण्याचेही जाहीर करून उद्धव मोकळे झाले आहेत! त्याशिवाय जाहीरपणे व्यक्‍त न केलेली उद्धव यांची ‘मन की बात’ही लपून राहिलेली नाही आणि ती म्हणजे त्यांना मुंबईतील कार्यक्रमात मोदी यांच्याबरोबरीने व्यासपीठावर स्थान हवे आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे तर नुकत्याच संपलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातच तशी मागणीच करून मोकळे झाले होते!

तर पुणे मेट्रोच्या समारंभात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही सन्मानित करून त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून मोदी यांच्यासमवेत व्यासपीठावर स्थान न दिल्यास या प्रकल्पाच्या कामांचा शुभारंभ एक दिवसआधीच करण्याचे पुण्यातील पवार निष्ठावंतांनी जाहीर केले होते. अखेर या दोन्ही धमक्‍या फुकाच्याच आहेत, हे सत्तेत सहभागी असलेला तथाकथित ‘मित्र’ शिवसेना आणि सरकार स्थापनेच्या वेळी पाठिंबा द्यायला उत्स्फूर्तपणे पुढे आलेली राष्ट्रवादी काँग्रेस या दोहोंतील ‘नाराजमान्य नाराजश्रीं’चे रूपांतर ‘राजमान्य राजश्रीं’मध्ये करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठीच बाजी मारली आहे! अर्थात, हे दोन्ही कार्यक्रम काही मुख्यमंत्र्यांनी जनतेला नववर्षाची भेट देण्यासाठी बिलकुलच आयोजित केलेले नव्हते. मुंबई-पुणे-नाशिक अशा काही प्रतिष्ठेच्या महापालिकांच्या निवडणुका आता अगदीच तोंडावर येऊन ठेपल्या आहेत आणि त्याच्या प्रचारमोहिमेचा शुभारंभ करण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी ही खेळी केली आहे, हे राज्यातील आम जनतेला पक्‍के ठाऊक आहे; मात्र मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या या दोन्ही कार्यक्रमांच्या रंगांचा बेरंग करण्याचा डाव एकाच वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस यांनी घातला होता. 

त्या बेरंगाची रंगीबेरंगी रंगपंचमी करण्याची ही चतुराई मुख्यमंत्र्यांनी नेमकी दाखवली तरी कशी?

पहिली गोष्ट ही, उद्धव ठाकरे यांना मनवण्याची होती. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेबरोबर भारतीय जनता पक्ष युती करणार की नाही, हे गूढ अद्याप गुलदस्तातच असल्यामुळे सध्या तरी त्यांना स्वत:ला शिवसेनेला अंगावर घेण्याची इच्छा नाही. युती झाली नाही, की मग फडणवीस हे पुन्हा ‘वाघाच्या जबड्यात घालूनी हात, मोजतो दात... अशी ही जात!’ असे वाग्बाण सोडायला मोकळे होतीलच; मात्र तोपावेतो तरी त्यांना सामोपचारानेच घ्यायचे आहे, हे ‘मातोश्रीं’वर चंद्रकांत पाटील, तसेच विनोद तावडे यांना धाडले गेल्यामुळे स्पष्ट झाले आहे. अर्थात या आवतणामागेही एक गूढ आहेच! आता उद्धव हे गिरगाव चौपाटीवरून मोदी यांच्यासमवेत होडीत बसून शिलान्यासासाठी थेट अरबी समुद्रात उतरणार आहेत! मग जाहीर सभेत मोदी यांच्याशेजारी बसावयाच्या बालहट्टाचे काय झाले? ते तर आपल्याला शनिवारीच समजणार! जाहीर सभा आहे ती वांद्रे-कुर्ला संकुलातील विस्तीर्ण मैदानावर म्हणजे ‘मातोश्री’पासून हाकेच्या अंतरावर! आठवते ना, तिथंच मोदी यांची एक सभा झाली होती आणि त्या वेळी ‘मातोश्री’ला हिंग लावूनही विचारण्यात आले नव्हते. अर्थात, मोदींसमवेत व्यासपीठावर विराजमान होण्याची ही प्रबळ इच्छा उद्धव यांच्या मनी बऱ्याच पूर्वीपासून आहे आणि त्यास अटलबिहारी वाजपेयी यांनी ते पंतप्रधान असताना ‘प्रोटोकोल’चे सारे जाळे तोडून बाळासाहेब ठाकरे यांना शेजारी बसवल्याच्या घटनेची पार्श्‍वभूमी आहे; मात्र त्या वेळी या दोन्ही पक्षांचे संबंध ‘अतिमधूर’ तर होतेच; शिवाय युतीच्या राजकारणात बाळासाहेबांचाच शब्द अंतिम मानला जात होता. आता बदलत्या परिस्थितीत आणि शिवसेना थेट विरोधी पक्षाच्या भूमिकेत गेलेली असताना मोदी हे ‘प्रोटोकोल’चे जाळे तोडतात की उद्धवच त्या जाहीर सभेला दांडी मारतात, हे शनिवारीच बघायला मिळणार आहे!

तिकडे पुण्यातील पेच सोडवताना मात्र फडणवीस यांची मोठी कसोटी होती. ‘शरद पवारसाहेबांचे बोट धरूनच आपण राजकारण शिकल्याची’ मन की बात मोदी यांनी अलीकडेच उघड केल्यामुळे फडणवीस यांचा स्वत:चा पवारसाहेबांना मोदी यांच्यासमवेत व्यासपीठावर बसवण्यास काहीच आक्षेप नव्हता; मात्र पुण्यातील भाजप कार्यकर्ते हे त्याच्या जबर विरोधात होते. अखेर फडणवीस यांनी हाही पेच सोडवला आणि आता पवारसाहेब या पुण्यातील कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे असणार आहेत!

राजकारणात एकाच वेळी मित्राची भूमिका बजावणारा शत्रू आणि शत्रू असूनही सतत मदतीसाठी हात पुढे करणारा मित्र, या दोहोंनाही फडणवीस यांनी एकाच वेळी राजी केले आहे. त्यांची ही कामगिरी आता यापुढे महाराष्ट्राच्या राजकारणात ‘फडणवीस नीती’ म्हणून ओळखली जाणार, यात शंकाच नाही! 

अखेर नेमक्‍या पुण्यातील कार्यक्रमाच्या निमित्तानेच फडणवीस यांना आपले आडनाव सार्थ करून दाखवण्याची संधी मिळाली आणि त्यांनी ती यशस्वीरीत्या साधली, हेच खरे!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prakash akolkar article