मानापमान आणि संशयकल्लोळ!

प्रकाश अकोलकर
गुरुवार, 2 मार्च 2017

शिवसेनेला मुंबईचं महापौरपद मिळू दिलं नाही, तर शिवसेना अन्य पक्षांबरोबर जाण्याचा धोका आहे आणि पुढच्या राजकारणाचा विचार करता तो भाजपला परवडणारा नाही. त्यामुळेच आता हे सुप्रतिष्ठित महापौरपद शिवसेनेला देऊन मोकळं व्हावं, असा विचार भाजपनं केला तर त्यात आश्‍चर्य वाटण्याजोगं काहीच नाही.

महाराष्ट्रात गेले महिनाभर सुरू असलेल्या ‘मानापमान’ नाटकाच्या प्रयोगावर अखेर पडदा टाकला, तो गेल्या आठवड्यात राज्यातील २५ जिल्हा परिषदा, तसंच १० महापालिकांच्या निकालांनी! या निकालांत कोण जिंकलं आणि कोण हरलं, यापेक्षाही महत्त्वाची बाब अर्थातच होती ती मुंबईच्या महापौरपदाच्या शर्यतीची... पण रंगदेवतेनं भलताच कौल दिला आणि खरोखरच ‘निक्‍काल’ लागला तो शिवसेनेचा! मुंबईत शिवसेना हा सर्वांत मोठा पक्ष ठरला खरा; पण त्यापाठोपाठ अवघ्या दोन जागांच्याच फरकानं भारतीय जनता पक्षानं मुंबईत बसवलेलं बस्तान बघून, मुंबईकरांच्या नावानं बोटं मोडण्यापलीकडे शिवसेनेकडं काहीच उरलं नाही. त्यामुळेच आता या ‘मानापमान’ नाटकाच्या प्रयोगावर पडदा पडला, तरी ‘संशयकल्लोळ’ नावाच्या दुसऱ्या नाटकाच्या प्रयोगात सध्या तीच पात्रे गुंतून गेली आहेत!

राज्यभरातील निवडणूक प्रचाराच्या ‘मानापमान’ नाटकाची नांदी ही उद्धव ठाकरे यांनीच जातीनं प्रजासत्ताकदिनीच गायली होती आणि त्याचं ध्रुवपद होतं : ‘गेली २५ वर्षं शिवसेना युतीमध्ये सडली!’ पुढे प्रचाराची रणधुमाळी हळूहळू तापत गेली, तसं हेच ध्रुवपद उद्धव अधिक त्वेषानं गात राहिले आणि देवेंद्र फडणवीसही त्या पदाला तितक्‍याच ताकदीनं उत्तर देणारी पदं शोधत राहिले. त्यांच्या गीतांचा मुखडा हा ‘पाणी पाजेन!’ असा होता. पूर्वीची नाटकं ही रात्र रात्र चालणारी असायची आणि त्यात बालगंधर्वांसारखे मातब्बर कलावंत असले की ‘वन्स मोअर’च्या आरोळ्यांनी नाट्यगृह दणाणून जायचं. बालगंधर्वांच्या अंगीही मग भलताच उत्साह यायचा आणि ‘मायबाप सरकार’ म्हणजेच प्रेक्षकांच्या मिनत्यांना मान देऊन तेही तीच ती पदे आळवून आळवून गात राहायचे. फडणवीसांनीही नेमकं तेच केलं. त्यांच्या पदांनाही ‘वन्स मोअर’ मिळत राहिला आणि तेही पाणी पाजण्यात गुंतून गेले, अगदी स्वत:च्या घशाला कोरड पडेपर्यंत! 

मात्र, निकाल स्पष्ट झाले आणि दिसलेलं चित्र हे फडणवीसांनी खरोखरच शिवसेना नव्हे, तर राहुल गांधींची काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्वांनाच हातात पाण्याचा पेला घ्यायला लावणारं होतं! मग आकड्यांची जुळवाजुळव सुरू झाली. तरीही केवळ राज्याचंच नव्हे, तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मुंबईत आकड्यांची जुळवाजुळव ही शिवसेनेलाच करावी लागणार होती. त्यामुळेच थेट गडावर जाऊन ‘रायगडाला जेव्हा जाग येते...’ या नाटकाचा एकच प्रयोग पार पाडल्यावर तूर्तास तरी फडणवीस हे कारभारात गुंतून गेले आहेत. दिल्लीवारी करून कुठं मुंबईतील सागरीमार्गाला केंद्राची मंजुरी मिळवून आण, गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा प्रकल्प मार्गी लाव आणि त्याच वेळी मध्यंतरात ‘पेपिस्को’च्या ‘सीईओ’ इंद्रा नुयी यांच्याशी चर्चा कर, अशी कामं त्यांनी सुरू केली आहेत.

फडणवीसांना दिल्लीश्वरांकडून म्हणजेच साक्षात नरेंद्र मोदी यांच्याकडून काय ‘मेसेज’ मिळणार, ते खरं तर सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ होतं. मुंबईच्या महापौरपदावरून शिवसेनेबरोबर ‘राडा’ करण्यात अर्थ नाही, हे तर फडणवीस यांना स्वत:लाही निकाल जाहीर होत असतानाच उमजलं होतं. त्यामुळेच त्यांचे उजवे हात चंद्रकांतदादा पाटील यांनी निकाल पुरते जाहीर होण्याआधीच ‘आम्ही शिवसेनेबरोबर जायचं नाही, तर काय काँग्रेसबरोबर जायचं काय?’ असा जाहीर सवाल टीव्हीवरूनच पत्रकारांना विचारला होता. शिवाय, त्यानंतरच्या २४ तासांतच नितीन गडकरी यांनीही ‘आम्हा दोघांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही!’ असं सांगून टाकलं. त्याचं कारणही थेट होतं. मुंबईत शिवसेनेशी पंगा घेणं म्हणजेच किमान अर्ध्या डझनाहून अधिक जिल्हा परिषदा हातातून गमावणं होतं. ससा-कासवाच्या या शर्यतीत भाजप सतत कासवाची भूमिका पार पाडत आला आहे. मुंबईच्या महापौरपदापेक्षा भाजपला राज्यभरात बस्तान बसवण्यासाठी या जिल्हा परिषदा अधिक महत्त्वाच्या आहेत. मात्र, यापेक्षाही आणखी एक बाब आहे आणि ती अधिक महत्त्वाची आहे. शिवसेनेला आता मुंबईचं महापौरपद मिळू दिलं नाही, तर त्यातून शिवसेना अन्य पक्षांबरोबर जाण्याचा धोका आहे आणि पुढच्या राजकारणाचा विचार करता तो भाजपला परवडणारा नाही. शिवसेना आणि अन्य कोणत्या पक्षाची आघाडी झाली, तर ती भाजपची काही प्रमाणात तरी नाकेबंदी करू शकते. त्यामुळेच आता हे सुप्रतिष्ठित महापौरपद शिवसेनेला देऊन मोकळं व्हावं, असा विचार भाजपनं केला तर त्यात आश्‍चर्य वाटण्याजोगं काहीच नाही. त्यामुळेच आता ‘संशयकल्लोळ’ नाटकाचा प्रयोग हा दोन्ही पक्ष करत असले, तरीही हे लगीन लावण्यावाचून दोघांनाही पर्याय नाही. प्रश्‍न फक्‍त त्यासाठी पहिले पाऊल कोण उचलणार, हा आहे आणि ते जो कोणी उचलेल त्यास लग्नाचा संपूर्ण खर्चही करावा लागणार आहे. त्यामुळेच ‘संशयकल्लोळ’ नाटक रंगत चाललं आहे!

या साऱ्या पार्श्‍वभूमीवर प्रेक्षकांनी थेट विंगेत फेकून दिलेले अन्य पक्ष काय करणार, हीदेखील कुतूहलाचीच बाब आहे. शिवसेनेचा प्राण जसा मुंबई महापालिकेत गुंतलेला आहे, तसाच राष्ट्रवादी काँग्रेसचा जीव पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन महापालिकांमध्ये अडकलेला आहे. मात्र, या दोन्ही महापालिका ‘राष्ट्रवादी’च्या हातून भाजपनं हिसकावून घेतल्या आहेत. केवळ नशीब म्हणूनच पुणे जिल्हा परिषद ‘राष्ट्रवादी’च्या हाती आली. काँग्रेसला राज्यभरात गटबाजीनं पोखरलेलं आहे. मुंबईत तर चार नेत्यांची तोंडं चार दिशांना होती. मात्र, या दोन्ही पक्षांनी ‘संशयकल्लोळ’ प्रयोग न लावता आणि ‘मानापमाना’च्या भानगडीत न पडता जिल्हा परिषदांमध्ये एकत्र येण्याचं ठरवलं आहे. 

महाराष्ट्रात बऱ्याच वर्षांपूर्वी बालगंधर्व, तसंच केशवराव भोसले यांच्यातील स्पर्धा सुपरिचित होती. तरीही लोकमान्यांच्या निधनानंतर ‘टिळक फंडा’साठी त्या दोघांनी एकत्र येऊन ‘संयुक्‍त मानापमाना’चा प्रयोग लावला होता! असाच प्रयोग शिवसेनेबरोबर भाजप आणि शिवसेना कधी लावते, ते बघायचं!

Web Title: prakash akolkar article