विधायक राजकारणाचा पुरस्कर्ता

 प्रकाश पाटील
Thursday, 29 August 2019

पालघर जिल्ह्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नवनीतभाई शहा यांची समाजवादी विचारसरणीवर निष्ठा होती. राजकारणात सक्रिय असलेल्या भाईंचा मूळ पिंड होता विधायक राजकारणाचा, समाजपरिवर्तनाचा आणि वंचितांना न्याय देण्याचा. त्यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कारकिर्दीविषयी...

पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यात पालघर तालुका (आता जिल्हा) होता. मच्छीमार, आदिवासी, कोळी, आगरी, भंडारी  आदी जाती-जमातींचा तालुका म्हणून ओळख असलेल्या या तालुक्‍याचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार आणि सामाजिक कार्यकर्ते, अशी नवनीतभाई शहा यांची ओळख. भाईंनी आपला व्यवसाय सांभाळतानाच संपूर्ण आयुष्य सार्वजनिक जीवनात खर्ची केले. पालघरसारख्या दुर्गम भागात शिक्षणाची ज्ञानगंगा यावी म्हणून त्यांच्यासह काही मंडळींनी सोनोपंत दांडेकर महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. भाई त्या वेळी आमदार होते आणि राज्यात काँग्रेसची सत्ता होती. महाविद्यालयाला जागा मिळावी म्हणून भाई तत्कालीन गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांना भेटले. त्यांनी महाविद्यालयासाठी पाच एकर जागेची मागणी केली. त्यावर बाळासाहेब म्हणाले, ‘‘अरे नवनीत, पाच एकराने काय होणार आहे? कला, वाणिज्य महाविद्यालय सुरू करतो आहेस, तर अधिक जागा माग.’’ तशी मागणी करण्यात आली आणि सरकारने पाच नव्हे, तर एकवीस एकर जागा दिली. सोनूमामांच्या नावाने लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. भाईंचे या महाविद्यालयाशी शेवटपर्यंत घट्ट नाते होते.

राजकारणाबरोबर शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात भाई नेहमीच अग्रेसर होते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीशीही त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. भाई १९५७ मध्ये आमदार झाले. या निवडणुकीत ते संयुक्त महाराष्ट्र समिती या सर्वपक्षीय संघटनेचे उमेदवार होते. भाषिक अभिमानावर उभ्या राहिलेल्या या चळवळीत भाईंसारख्या गुजरातीभाषक उमेदवाराला मराठी जनतेने घसघशीत मतांनी निवडून दिले. संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे भाई हे एकमेव बिगरमराठी आमदार होते. त्यानंतर १९६२ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी पंचायत समितीची निवडणूक लढविली आणि ते सभापती झाले. पुढे १९६७ मध्ये ते पुन्हा आमदार बनले. आदिवासी, मच्छीमारांबरोबरच रेल्वे प्रवाशांच्या प्रश्‍नांवर त्यांनी नेहमीच आवाज उठविला. पंचायत राज व्यवस्थेवर त्यांचा विश्वास होता. या व्यवस्थेच्या विविध पैलूंवर त्यांनी अभ्यासपूर्ण लिखाण केले. त्याचाच एक भाग म्हणून भाईंनी खासदारांना निधी देण्यास विरोध केला. गटारे, रस्ते बांधणे हे संसदसदस्यांचे काम नाही, असे त्यांचे ठाम मत होते. पंचायत राज व्यवस्था खिळखिळी करण्याचे उद्योग करू नयेत, यासाठी ते आग्रही होते. ज्येष्ठ पत्रकार माधव गडकरी आणि नवनीतभाईंनी खासदार निधीविरोधात सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई लढली. त्यात त्यांचा पराभव झाला. पण, या मागणीवर ते ठाम होते. नवनीतभाईंची समाजवादी विचारसरणीवर निष्ठा होती. ‘मी एसेम’ या एस. एम. जोशींच्या आत्मचरित्राचा त्यांनी गुजरातीत अनुवाद केला. असे भाईंचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. भाईंनी स्वातंत्र्यलढ्यातही भाग घेतला. ते सरपंच, आमदार, सभापती बनले; पण मंत्री व्हावे, पदे मिळावीत, सत्ता आपल्याकडेच असावी, असा त्यांचा पिंड नव्हता. त्यांचा मूळ पिंड होता विधायक राजकारणाचा, समाजपरिवर्तनाचा आणि वंचितांना न्याय देण्याचा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prakash patil aticle navneetbhai shah