आधुनिक, समावेशक राष्ट्रवादाकडे...

pramod talgeri
pramod talgeri

भविष्यदर्शी, आधुनिक आणि घटनात्मक राष्ट्रवाद, की वांशिक कल्पनांच्या सहाय्याने तयार होणाऱ्या सामूहिक अस्मितेचा राष्ट्रवाद या दोन ध्रुवांवर अद्यापही राष्ट्रवादाची कल्पना हेलकावे खात आहे. अगदी प्रारंभी "राष्ट्र-राज्य' अस्तित्वात आले, त्याला वांशिक ओळख हा मुख्य आधार होता, हे खरेच. एक धर्म, एक भाषा, एक वांशिक वारसा किंवा समान ऐतिहासिक स्मृती यांच्या आधारावर समाजाची ओळख तयार होते आणि त्या आधारावर 18 व्या शतकात युरोपीय राष्ट्रे जन्माला आली. तशा प्रकारच्या राष्ट्रांत ऐक्‍याला भावनिक आधार असतो. पण आजच्या आधुनिक काळात असा वंशाधारित राष्ट्रवाद कालबाह्य होत आहे, हे लक्षात घ्यायला हवे. काळाच्या ओघात त्या त्या समाजातील बहुसंख्य आणि विविध अल्पसंख्य समूह यांच्यातील सांस्कृतिक आदानप्रदानातून एक बहुसांस्कृतिक वारसा तयार होतो आणि त्यांच्या एकत्र येण्याला घटनात्मक अधिष्ठान दिले जाते. या प्रवासात वांशिक ओळख हा मुद्दा हळूहळू लोप पावत जातो आणि "घटनात्मक राज्या'तून प्राप्त होणारी मूल्ये नवी राजकीय ओळख तयार करतात. भारत या ऐतिहासिक स्थित्यंतरातून जात आहे. या वाटचालीत खीळ निर्माण करणाऱ्या, सामाजिक, राष्ट्रीय ऐक्‍याची वीण उसविणाऱ्या घटना त्यामुळेच चिंतेचा विषय ठरतात. गेल्या काही वर्षांत आपल्याकडे भूतकाळाचे गौरवीकरण करणे, आधुनिक विज्ञानाने लावलेले अनेक शोध आमच्या पूर्वजांनी केव्हाच लावले होते, असे दावे करणे, शहरे-गावे किंवा संस्था यांची नावे बदलणे किंवा बदलण्याची मागणी करणे, असे अनेक प्रकार सुरू आहेत. काही ऐतिहासिक शहरांची नावे बदलण्याच्या मागण्या केल्या जातात आणि त्यासाठी आंदोलनेही होतात. यासंदर्भात दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्याशी संबंधित एका घटनेकडे लक्ष वेधावेसे वाटते. ही महत्त्वाची घटना असूनही त्याची फारशी चर्चा झाली नाही. काही तरुणांच्या गटाने डॉ. मंडेला यांच्याकडे मागणी केली, की जोहान्सबर्गचे नाव बदलून ते "नेल्सन मंडेलानगर' असे करण्यात यावे. मंडेला यांनी ती मागणी स्पष्ट शब्दांत धुडकावून लावली. ते म्हणाले, "नावे बदलून इतिहास बदलता येणार नाही'. हा विचार महत्त्वाचा आणि डोळ्यात अंजन घालणारा आहे.

इतर सामाजिक गटांकडे दुर्लक्ष करणारा, त्यांची उपेक्षा करणारा राष्ट्रवादविचार पुढे येणे ही त्यामुळेच एक आपत्ती आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काही वर्षांपूर्वी पाकिस्तानातील राजदूताचे व्याख्यान झाले. "आद्य व्याकरणकार पाणिनी याचे जन्मस्थान पाकिस्तानातील अटक जिल्ह्यातील गावात आहे आणि आम्ही त्याबद्दलही अभिमान बाळगू शकतो', असे काहीशा मिश्‍किलपणे ते म्हणाले. खरे म्हणजे, आज कोणतीही भारतीय व्यक्ती या महान संस्कृत व्याकरणकाराचे कार्य हा भारतीय संस्कृतीचाच भाग आहे, याबद्दल अगदी स्वाभाविकपणे अभिमान बाळगू शकते; जरी त्याचे जन्मस्थान पाकिस्तानात असले तरी. अर्थात पाकिस्तानी राजदूताने केलेले विधान प्रातिनिधिक असेल असे नाही. पाकिस्तानी लोक पाणिनीला त्यांच्या संस्कृतीचा भाग म्हणून स्वीकारतील की नाही, याविषयी खात्रीने सांगता येणार नाही. याउलट नझरूल इस्लाम किंवा कवी इक्‍बाल हे मात्र आधुनिक भारतीय बहुपेडी संस्कृतीचे भाग राहू शकतात. याचा नेमका अर्थ काय? हा फरक काय सांगतो? याचा अर्थ असा, की भारत आपली राष्ट्रीय ओळख व्यापक करीत गेला आहे आणि जात आहे. नागरी ऐक्‍यासाठी "बहुसांस्कृतिक अवकाश' निर्माण करणे ही आधुनिक राष्ट्र-राज्याची फार मोठी कामगिरी आहे. लोकशाही व्यवस्थेतील लोकांच्या आकांक्षा विविध संस्थांच्या मार्फत पूर्ण करण्यासाठीची खरे म्हणजे ही पूर्वअट असते. त्यातून राजकीय ऐक्‍याची प्रक्रिया पूर्णत्वाला जाते. प्रश्‍न आहे तो काळाची ही चक्रे उलटी फिरविण्याच्या प्रयत्नांचा. त्यामागचा धोका ओळखायला हवा. बहुसांस्कृतिकतेचा वारसा टिकवणे आवश्‍यक आहे. ते भारताचे वेगळेपण आहे. कोणी राजा किंवा राणी हे आपले राज्यकर्ते नाहीत. आजचा भारत हे लोकशाही, धर्मनिरपेक्ष, आधुनिक राष्ट्र राज्य आहे. त्यात बहुसंख्याकांच्या संस्कृतीला जसे स्थान आहे तसेच विविध अल्पसंख्य समाजांच्या सांस्कृतिक योगदानाचाही लक्षणीय वाटा आहे, याचा मनोमन स्वीकार करणे आवश्‍यक आहे. तशी मनोधारणा तयार होणे हे आधुनिक भारतीय राष्ट्राच्या हिताचे ठरेल. विद्यमान राज्यकर्त्यांनीही तशा प्रकारच्या मानसिकतेलाच बळ द्यायला हवे. गुरुवारी दिवंगत झालेले नेते अटलबिहारी वाजपेयी यांचा वैचारिक वारसाही तोच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com