
- वैभव चाळके
प्रसाद भिडे यांची दोनच शब्दांत ओळख करून द्यायची, तर ती ‘संस्कृतचा नवनाट्यकर्मी’ अशी करून देता येईल. त्यांच्या संस्कृत नाट्यशास्त्रातील कामगिरीची दखल घेत केंद्राच्या संस्कृत विद्यापीठाच्या भोपाळ येथील ‘नाट्यशास्त्र अनुसंधान केंद्रा’त अलीकडेच त्यांची ‘असोसिएट प्रोफेसर’ म्हणून नियुक्ती झाली आहे.
त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाला नवे आभाळ मोकळे झाले आहे. प्रसाद मूळचे देवगडचे. डोंबिवलीत त्यांचे बालपण गेले. वडील ‘नाट्यसंपदा’ संस्थेत होते. तो वारसा आणि शाळा-महाविद्यालयातून मिळालेले प्रोत्साहन यामुळे संस्कृतकडील त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण प्रवास सुरू झाला.
१९९९ हे केंद्र सरकारने ‘संस्कृत वर्ष’ जाहीर केले होते. रुईआ महाविद्यालयातील संस्कृत विभागाच्या डॉ. मंजूषा गोखले यांनी ‘अखिल भारतीय कीर्तन महाविद्यालया’च्या संयुक्त विद्यमाने शिवाजी मंदिर नाट्यगृहात दोन संस्कृत नाटके सादर केली. त्यात प्रसाद यांना काम करण्याची संधी मिळाली.
पुढे ‘युथ फेस्टिवल’मध्ये त्यांनी संस्कृत नाटक सादर करायला सुरुवात केली. त्यांनी ‘भगवदज्जुकीयम्’ हे संस्कृत प्रहसन सादर केले. या नाट्यप्रयोगाला द्वितीय पारितोषिक मिळाले. दिले. २००५ मध्ये त्यांनी लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले ‘को न याति’ हे नव्या समस्यांना नव्या पद्धतीने सामोरे जाणारे संस्कृत नाटक चांगलेच दाद मिळवून गेले.
प्रभाकर भातखंडे हे प्रसाद यांचे गुरू. त्यांनी २४ नवी संस्कृत नाटके केली. गुरूचे बोट धरून प्रसाद यांनी तीन एकांकिका, तीन लघुनाटके लिहून त्याचे प्रयोग केले. नववर्षाच्या स्वागतयात्रेत चौकाचौकांत संस्कृत पथनाट्ये केली. त्यांनी लिहिलेल्या ‘देवशूनी’ या नाटकाला २०१८ मध्ये सर्वोत्कृष्ट लेखनाचा शासनाचा पुरस्कार मिळाला.
याच काळात ते प्रायोगिक रंगभूमीवरही कार्यरत होते. ‘एका गुराख्याचे महाकाव्य’ हे महाकवी कालिदासाच्या जीवनावरील नाटक त्यांनी २०१३ मध्ये सादर केले. हौशी नाटक स्पर्धेत त्याला प्रथम क्रमांक मिळाला. प्रसाद यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचाही पुरस्कार मिळाला. २०१६ मध्ये या नाटकाचा अमेरिकेतही प्रयोग झाला. भारतातील तीन कलावंत आणि अमेरिकेतील सात कलावंत घेऊन ऑनलाईन तालीम करून हे नाटक सादर केले गेले.
प्रसाद यांनी आयआयटी मुंबईतून भाषाशास्त्रात पीएचडी मिळवली. नाटकांचे लेखन, दिग्दर्शन, संशोधन आणि प्रत्यक्ष अध्यापन अशी त्यांची आजवरची कारकीर्द आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी सात शोधनिबंध सादर केले आहेत. रुईया, सोमय्या महाविद्यालयांत ते प्राध्यापक होते.
आता केंद्रीय संस्कृत विद्यापीठात कार्यरत झाले आहेत. भविष्यातील योजनांबद्दल प्रसाद यांची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. संस्कृत भाषा देशात सर्वदूर पसरलेली आहे. ज्या ज्या प्रांतात संस्कृत नाटके सादर होतात, तिथे तिथे तिथला तिथला रंग घेऊन ती सादर होतात, हे लक्षात घेऊन पुढील काळात विविध प्रांतांतील नाटक आणि लोककलांच्या माध्यमातून अभिजात संस्कृत नाटके सादर करावी, असा त्यांचा मानस आहे.
यक्षगान, रामलीला या पद्धतीतून संस्कृत नाटकांचे सादरीकरण करणे, हे त्यांचे ध्येय आहे. त्यासोबतच वर्षातून एक तरी नव्या विषयावरील नवे नाटक लिहून नव्या पद्धतीने सादर करणे आणि आजच्या पिढीला संस्कृतशी जोडून घेणे हे आपले ध्येय असल्याचे ते सांगतात. अध्यापनासोबत संशोधन करता करता साहित्यातील टीका परंपरा पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला.