बेशरमपणाची हद्द (मर्म)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

भोसे (ता. पंढरपूर) येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित प्रचार सभेत विधान परिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक यांचे असेच झालेले दिसते. त्यांनी जी काही मुक्ताफळे उधळली, ती आपल्या शूर जवानांचा अवमान करणारी तर आहेतच; परंतु स्त्रियांविषयीच्या किती कोत्या जाणिवा घेऊन हा माणूस सार्वजनिक जीवनात वावरतो आहे, याचा प्रत्यय देणारी आहेत.

निवडणुकीच्या रणधुमाळीत एकूणच प्रचाराचा स्तर कमालीचा खालावल्याची खंत व्यक्त होत असतानाच आमदार प्रशांत परिचारक यांनी त्याचा नीचांकी तळ गाठला. हातात ध्वनिक्षेपक आणि समोर श्रोतृवर्ग पाहिल्यानंतर काहींना इतका चेव चढतो, की ते अक्षरशः बरळायला लागतात.

भोसे (ता. पंढरपूर) येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित प्रचार सभेत विधान परिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक यांचे असेच झालेले दिसते. त्यांनी जी काही मुक्ताफळे उधळली, ती आपल्या शूर जवानांचा अवमान करणारी तर आहेतच; परंतु स्त्रियांविषयीच्या किती कोत्या जाणिवा घेऊन हा माणूस सार्वजनिक जीवनात वावरतो आहे, याचा प्रत्यय देणारी आहेत. त्यांनी सांगितलेला तद्दन भिकार "विनोद' हा त्यांच्यात संवेदनशीलतेचा संपूर्ण ठणठणाट असल्याचे दाखवितो. त्या भाषणाने सोलापूर जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यात सगळीकडे संताप व्यक्त झाल्यानंतर त्यांनी क्षमायाचना केली आहे. 

परिचारक हे विधान परिषदेतील भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. अलीकडे या पक्षाला कुणाकुणाचा "सहयोग' हवाहवासा वाटायला लागला आहे, याचे हे आणखी एक उदाहरण. "पंजाबमधील जवान वर्षभर सीमेवर असतो. एकदाही तो घरी येत नाही. तरीही त्याला मूल होते. तो सीमेवर पेढे वाटून त्याचा आनंद साजरा करतो', असली अश्‍लाघ्य बडबड करताना तिथल्या तिथे उपस्थितांनी परिचारक यांना खडसावयाला हवे होते. दुर्दैवाने हे घडलेले दिसत नाही. वास्तविक पंढरपूरचे परिचारक घराणे सुसंस्कृत अशी ख्याती असलेले. कॉंग्रेसचे आमदार म्हणून सुधाकरपंत परिचारक यांनी तब्बल 25 वर्षे काम केले असून, त्यांच्याच पठडीत तयार झालेले नव्या दमाचे नेते म्हणविणारे प्रशांत परिचारक यांनी अशी वक्तव्ये करावीत, याचे अनेकांना आश्‍चर्य वाटले. प्रशांत हे सोलापूरच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून आले. विधान परिषद निवडणुकीपूर्वीच त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक निर्माण झाली. सोलापुरात सहकारमंत्री व पालकमंत्री अशी दोन ताकदीची पदे असतानाही परिचारक हे फडणवीस यांच्या निकटच्या वर्तुळात होते. पंढरपूरचे कुणालगीर गोसावी हे काश्‍मीरमध्ये हुतात्मा झाल्यानंतर त्यांच्या उत्तरक्रियेची संपूर्ण जबाबदारी परिचारक यांनीच सांभाळली; पण कुठला तरी ऐकीव किस्सा सांगण्याच्या नादात क्षणात त्यांनी आपली प्रतिष्ठा धुळीला मिळविली. नंतर त्यांनी पश्‍चातबुद्धीतून माफी मागितली असली, तरी त्यांची वैचारिक दिवाळखोरी झाकली जाण्याची शक्‍यता नाही.

Web Title: Prashant Paricharak controversial statement on jawans