पूर्वपरीक्षेची पहिली फेरी (अग्रलेख)

पूर्वपरीक्षेची पहिली फेरी (अग्रलेख)

लोकसभा निवडणुकीच्या पंचवार्षिक परीक्षेच्या आधी पाच राज्यांतील निवडणुकीच्या निमित्ताने होऊ घातलेल्या पूर्वपरीक्षेच्या पहिल्या पेपरची उत्तरे छत्तीसगडच्या 18 मतदारसंघांतील जनता आज (सोमवारी) मतपेटीतून देणार आहे! नेमका हाच परिसर नक्षलवाद्यांच्या दहशतीखालील भाग म्हणून ओळखला जातो आणि त्यामुळे या मतदारसंघांत नेमके किती मतदान होते, हा तेथील निकालांमधील कळीचा मुद्दा बनला आहे. मतदानावर बहिष्कार टाकावा अशी धमकी नक्षलवाद्यांनी नेहमीप्रमाणे दिली आहेच.

शिवाय, मतदानाच्या आदल्या दिवशी काही ठिकाणी स्फोट घडवून आणि हल्ले करून मतदारांमध्ये दहशत निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या पार्श्‍वभूमीवर जनतेला मतदानाचा हक्क निर्भयपणे बजावता यावा म्हणून या परिसरात सुरक्षा दलांचे एक लाखाहून अधिक जवान तैनात करण्यात आले आहेत. दुसरीकडे, या राज्यातील प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी जातीने रणधुमाळीत उतरले आणि महिनाभर सुरू असलेल्या आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी अधिकच टोकदार करून गेले! 

छत्तीसगडमध्ये गेली 15 वर्षे भारतीय जनता पक्षाचे राज्य आहे आणि ते हिसकावून घेण्यासाठी कॉंग्रेसने आपली सारी ताकद पणाला लावली असली, तरी अजित जोगी यांच्याशी हातमिळवणी करून बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी कॉंग्रेसला अपशकुन केला आहे. 

छत्तीसगडच्या या परिसरात नक्षलवाद्यांच्या विध्वंसक कारवाया गेली काही दशके सुरू असल्यामुळे तोच मुद्दा प्रचारात अग्रभागी राहिला, यात नवल नव्हते. त्यातच कोरेगाव भीमा प्रकरणानंतर "शहरी नक्षलवाद' असा शब्दप्रयोग वापरात आला आणि मोदी यांनी या राज्यातील सारा प्रचार त्याभोवतीच गुंफला. "शहरी नक्षलवादी हे महानगरांत वातानुकूलित घरांत राहतात, त्यांची मुले परदेशांत शिकतात आणि तुम्हाला मात्र हातात शस्त्रे देऊन लढायला लावतात,' अशी टीका मोदी यांनी केली.

राहुल यांनी मात्र "नोटाबंदी', तसेच "जीएसटी' या मोदी सरकारने घाईघाईने आणि पुरेशा तयारीविना घेतलेल्या निर्णयांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कसा बोजवारा उडाला आहे, याकडे मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. नेमक्‍या याच मुहूर्तावर रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सरकारच्या याच दोन निर्णयांमुळे विकासाला खीळ बसल्याचे कॅलिफोर्निया विद्यापीठातील भाषणात स्पष्ट केल्यामुळे राहुल यांच्या टीकेला बळ प्राप्त झाले. 

अर्थात, आरोप- प्रत्यारोपांच्या फैरींनी त्यापलीकडले टोक गाठले आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाचा जाहीरनामा प्रसृत करताना, नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यात राज्य सरकारला यश आल्याचा दावा तर केलाच; पण त्याचवेळी "कॉंग्रेस नक्षलवाद्यांना पाठिंबा देत आहे,' असा गंभीर आरोपही केला. मात्र, पाच वर्षांपूर्वी 2013 मध्ये याच परिसरातील नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात कॉंग्रेसच्या नेत्यांची एक फळी गारद झाली होती, याचा त्यांना विसर पडल्याचे दिसते. कॉंग्रेसनेही आपल्या जाहीरनाम्यात आश्‍वासनांची खैरात केली असून, त्यात दारूबंदीपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपर्यंत अनेक बाबींचा समावेश आहे. 

नक्षलवाद, नोटाबंदी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून भाजप आणि कॉंग्रेस यांनी प्रचारात आरोप- प्रत्यारोपांचा धुराळा उडविला असला, तरी छत्तीसगडमधील सर्वसामान्य जनतेसाठी खरा प्रश्‍न हा विकासाचा आहे. एकविसाव्या शतकाचे दुसरे दशक संपत आले आणि सरकारकडून "स्मार्ट सिटी'च्या गप्पा मारल्या जात असताना, 15 वर्षे सत्ता हातात असूनही या भागात साधे रस्ते का तयार होऊ शकले नाहीत, असा प्रश्‍न मतदारांच्या मनात येणे स्वाभाविक आहे. या साऱ्या पलीकडली बाब म्हणजे नेमक्‍या या पाच राज्यांतील प्रचारमोहिमेच्या पार्श्‍वभूमीवर राममंदिराचा मुद्दा संघपरिवाराने जोमाने उचलून धरला आहे. 

मध्य प्रदेश, तसेच मिझोराममध्ये 28 नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानाच्या नेमके तीन दिवस आधी म्हणजे 25 नोव्हेंबरला अयोध्या, नागपूर आणि बंगळूर येथे "हुंकार सभा' घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. छत्तीसगड असो की मध्य प्रदेश की राजस्थान, तेथील भाजप सरकारच्या कारभाराविषयी बोलण्यासारखे फार काही नसल्यामुळे आता संघपरिवाराने भाजपविजयासाठी "रामरक्षा' म्हणावयाचे ठरविलेले दिसते!

अर्थात, त्याचा परिणाम मतदारांवर नेमका किती होतो, ते बघण्यासाठी किमान एक महिना थांबावे लागेल; कारण या पाच राज्यांतील मतदारांनी कोणता कौल दिला आहे, हे 11 डिसेंबरला स्पष्ट होणार आहे. छत्तीसगडमधील उर्वरित 72 मतदारसंघांत 20 नोव्हेंबर रोजी मतदान आहे. राजस्थानात मात्र सात डिसेंबर या एकाच टप्प्यात मतदान होईल. तोपावेतो आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी अधिकच गोळीबंद होत जातील आणि "रामरक्षे'चे पठणही अधिक जोरात केले जाईल, यात शंका नाही! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com